सुट्टी म्हणजे मौज-मजा, मस्ती. आपल्यापैकी अनेकांची आनंदाची समीकरणं सुट्टीशी जोडली गेलेली आहेत. पण तरीही सुटीत जरा वेगळा आनंद, समाधान मिळवणारेही इथे आहेतच. स्वत:ला ‘पॉझिटिव्हली सेल्फिश’ म्हणवून घेणारी आमची पिढी, स्वत:च्या आनंदासाठीच समाजाचा-निसर्गाचा कॉन्शसली विचार करताना दिसतेय. त्यातीलच ही काही बोलकी उदाहरणं..
शहरात लहानाचे मोठे झालेल्या अनेकांना ग्रामीण जीवनाची आणि त्यांच्यासमोर असणाऱ्या प्रश्नांची जाणीव नसते असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे. परंतु शहरात लहानाचा मोठा होऊनदेखील, अतिग्रामीण भागातील लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून फर्स्ट इयरला असणारा प्रतीक पोरे ‘सह्य़ाद्री नेचर फाऊंडेशन’ सोबत यंदाच्या सुट्टीत रुरल अँड टूरिझम डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी साताऱ्यातील एका गावात जाणार आहे. ‘आजही अनेकांपर्यंत शिक्षण, आरोग्य, वीज या सोयी पोहोचल्या नाहीत हे खूप निराशाजनक आहे. या प्रोग्रॅमच्या मदतीने आम्ही आम्हाला शक्य होतील तितके मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याचे उपक्रम हाती घेणार आहोत’, असे प्रतीकने सांगितले. बऱ्याच जणांकडून ऐकलेल्या ‘आनंदवन’च्या श्रमशक्ती शिबिरासाठी यंदा पुण्याचा भूषण राऊत त्याच्या मित्रांसोबत जाणार आहे. यामागे श्रमदानाच्या महत्त्वासोबतच वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या मुलांशी संवाद होईल आणि आपल्या चौकटीतून बाहेर पडून, लोकांचे प्रश्न आणि समाजजीवन समजावून घेता येईल या उद्देशाने भूषण शिबिरात सहभागी होतोय.

viva11आनंदवनात श्रमशक्ती शिबिराला जाणार. तिथल्या लोकांचे प्रश्न आणि समाजजीवन समजावून घेता येईल – भूषण राऊत, पुणे

शासनाच्या अनेक स्कीम राबवण्यासाठी गरजेचा असणारा सव्‍‌र्हे करण्यासाठीदेखील अनेक तरुण सुट्टय़ांमध्ये मदत करतात. आपण फार सुरक्षित वातावरणात वाढत असतो आणि आपल्या आजूबाजूला जे काही चांगले-वाईट घडत असते त्याची तीव्रता आपल्याला बऱ्याचदा कळतच नाही, हे जाणवून गेल्या वर्षी सुट्टीत गुंजन रोहितकुमार ही नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यात सहभागी झाली होती. तिथल्या अनुभवांनी तिच्यात आमूलाग्र बदल झाला आणि यंदा ती राजस्थान सरकारच्या मजदूर किसान संघटनेच्या कार्यात मदत करण्यासाठी जाणार आहे.
अनेकांना आपली चौकट मोडून काही तरी वेगळं करू पाहायचंय, तर काहींना खऱ्या अर्थाने समाजाचं चित्र समजावून घ्यायचंय. रोहन बंदपट्टे हा तरुण यंदाच्या सुट्टीत तुळजापूर येथे होणाऱ्या ‘भटक्या व विमुक्त विकास परिषदे’च्या कार्यात सहभागी होणार आहे. तो सांगतो, ‘शहरात मोठा होऊनदेखील अनेकदा मला माझ्या जातीमुळे काही प्रमाणात भेदभाव सहन करावा लागला. सुशिक्षित असून सहन करावे लागत असेल तर अडाणी लोकांचंअवघड आहे हे जाणून मी या कार्यात सहभागी झालो.’
काही जण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुट्टीत प्रयत्नशील आहेत. पुण्याच्या मोहम्मद सैफ या तरुणाने ‘आय-केअर’ नावाची स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे आणि त्याद्वारे बाहेरगावाहून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न सोडवण्यावर यंदा भर देण्यात आला आहे. ‘भाडय़ाने घर घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या ब्रोकरेजची रक्कम खूप मोठी असते. म्हणूनच ब्रोकरेज न देता घर भाडय़ाने देऊ  शकतील अशा घरमालकांची लिस्ट बनवली आहे. या सुट्टीत आम्ही सर्व डीटेल्सची खातरजमा करणार आहोत. पुढच्या वर्षी अ‍ॅडमिशन घेणाऱ्या परदेशी तसंच परगावच्या विद्यार्थ्यांना या लिस्टची मदत होईल’, असं सैफने सांगितलं.
असे अनेक जण आपल्या आजूबाजूला समाजाप्रति काही ना काही करताना आपल्याला दिसतात परंतु या सगळ्यांशी बोलताना ‘आम्ही काही तरी भारी करतोय’ यापेक्षाही ‘आम्ही जे काही करतोय त्यामुळे आम्हाला भारी वाटतंय’ ही भावना प्रकर्षांने जाणवली. आपला वेळ कसा घालवायचा हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु सुटी खऱ्या अर्थानं सत्कारणी लावणारी ही मंडळी खरंच इतरांना प्रेरणा देणारी आहेत, हे खरं.