आपापल्या ‘मन की बात’ सांगायला आजची ही पिढी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करते. डीपी आणि स्टेटसचा वापर यासाठी केला जातो. स्वत:मध्ये मश्गूल असलेले तरुण मनातल्या भावना अशा जाहीरपणे कशा व्यक्त करतात?

असं म्हणतात की अन्न, वस्त्र आणि निवारा या किमान गोष्टी माणसाला जगण्यासाठी महत्त्वाच्या असतात. पण आताचा काळ ज्या वेगाने बदलत चाललाय त्याचप्रमाणे बदलत आहेत, या पिढीच्या गरजा आणि त्या गरजांचं स्वरूप. आजच्या पिढीची ओळख टेक्नोसॅव्ही म्हणून करून देण्यात येते. याच टेक्नोसॅव्ही पिढीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सोशल नेटवìकग साइट्स. कारण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी सोशल साइट्सवर तरुणाईच्या तासन्तास रेंगाळत असते. त्यांच्यासाठी या सगळ्यात अत्यंत लक्षवेधी भाग म्हणजे डीपी (अर्थात डिस्प्ले प्रोफाइल पिक्चर) आणि स्टेटस.
स्वत:च्या चेहऱ्याची ओळख सोशल साइट्सवरील मित्रांना व्हावी एवढा काय तो ‘डीपी’चा प्राथमिक उद्देश असावा. पण खरंच एवढाच उद्देश असतो का? कारण तसं असेल तर तो सारखा.. अगदी तासातासालाही बदलण्यात काय हशीर आहे? व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुकचे प्रोफाइल पिक्चर्स तरुणाई सतत बदलते ठेवते. डीपी लावताना नेमकं मनात काय चाललेलं असतं, काय उद्देश असतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही वेगळी आणि मजेशीर उत्तरं मिळाली. पुण्याची अमृता म्हणते की, तिला ‘डीपी’ म्हणून ग्रुप फोटो लावायला आवडतो, कारण त्या फोटोसोबत भूतकाळात जगलेल्या आठवणी ताज्या होत असतात आणि मग त्या डीपीच्या निमित्ताने का होईना मत्रीतील तुटलेला किंवा काही कारणास्तव कमी झालेला संवादही पुन्हा सुरू होतो.
मस्ती, मजा, फ्लर्टिग आणि काहीसं प्रेम हे सगळं तरुणाईला हवं असतं. हे सगळं या वयात हवंच, असा फंडा असलेली तरुणाई या सगळ्यासाठी ‘डीपी’चा पुरेपूर वापर करून घेते. मनातली प्रेमाची भावना असो अथवा द्वेषाची, निव्वळ धमाल म्हणून किंवा कुणाला चिडवायला म्हणून.. हे सगळं ‘डीपी’ आणि ‘स्टेटस’च्या माध्यमातून दाखवायला आम्हाला आवडतं.. असं ही पिढी सांगते. ‘डीपी’च्या माध्यमातून वाढदिवसांच्या शुभेच्छाही देण्यात येतात आणि सणही साजरा केला जातो. एखाद्या राजकारण्याच्या प्रसिद्धी किंवा समर्थनार्थ कुणी स्टेटस मेसेज लिहितो तर मनातल्या भावना योग्य व्यक्तीपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने कुणी स्टेटस लिहितो. मोबाइल स्क्रीनच्या छोटय़ाशा भागातला हा इवलासा चौकोन तसं पाहिलं तर अनेकांचं फार मोठं काम करून जातो.
स्टेटसमध्ये कधी कधी क्रिएटिव्हिटीचा भडिमार असतो. कधी गाण्याची ओळ, कधी स्वरचित कविता तर कधी सिनेमाचा डायलॉगदेखील असतो. सुविचार, शायरी, चेक इन हे तर नेहमीचं झालं. काही जण आज काय खाणार आहेत, कुठे जाणार आहेत, काय पाहणार आहेत हे सारंच थोडक्याच अख्खा दिनक्रमच स्टेटस म्हणून ठेवत असतात. भंडाऱ्याचा शुभम सांगतो की, डीपी किंवा स्टेटस लावताना त्याची प्रोफाइल इतरांपेक्षा उठून दिसावी अशी त्याची अपेक्षा असते. मग एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणी काढलेला सेल्फी डीपी म्हणून लावतो आणि त्यालाच उद्देशून काहीसं वेगळं पण साजेसं स्टेटस ठेवतो. स्टेटसच्या दोन ओळी बऱ्याच लोकांसाठी अर्थहीन असतात पण त्याबरोबर ज्या व्यक्तीसाठी होत्या फक्त त्यालाच कळूनही येतात. असं आजच्या पिढीचं म्हणणं आहे. मी आज आनंदी आहे, दु:खी आहे, उत्साही आहे अशा अनेक भावनांना स्टेटसमधून प्रसिद्धी देण्यात येते. काही जण मात्र याबाबतीत फार रिझव्‍‌र्ह असतात. त्यांचं स्टेटस मग फक्त एखादा ‘डॉट’च असतो. मग त्या डॉटचा अर्थ ज्याचा त्याने लावायचा. अनेक जण चित्रविचित्र चेहऱ्यांचे स्माइलीज, इमेजिस स्टेटस म्हणून ठेवत असतात. माणसाच्या स्वभावानुसार ही स्टेटस बनत आणि बदलत असतात. प्रेमासारखी नाजुक भावनाही या स्टेटसच्या माध्यमातून मांडता येते तर दुसरीकडे प्रेमभंगाची, जेलेसीची कठोरताही अनुभवता येते. यासाठीच मग सेंटी गाण्याच्या ओळींनी रकानेच्या रकाने भरले जातात. स्टेटसच्या आड कोणाला तरी डिवचण्याचे, दुखावण्याचे प्रयत्नही सर्रास होतच असतात.
आजच्या पिढीतली तरुणाई व्हच्र्युअल जगात कितीही ‘सोशल’ दिसत असली, तरी आत कुठे तरी एकटेपणाची शिकार असते. मनाच्या कप्प्यातल्या आक्रोश, दु:ख, वेदना, आनंद असं जाहीरपणे व्यक्त करताना ते एकटेपणा विसरतात. कधी स्पष्टपणे भावना व्यक्त करायला जमत नाही म्हणून की काय या डीपी, स्टेटससारख्या माध्यमांचा आधार घेतात. लोकांनी आपल्या फोटोला चांगलं म्हणावं, अशीही त्यांची अपेक्षा असते. किती लाइक्स येताहेत आणि किती वेळात यावरून ते स्वतचं महत्त्व जोखत असतात. थोडक्यात स्वत:मध्ये मश्गूल असलेली आजची पिढी भावना जाहीरपणे व्यक्त करते तेव्हा तो विरोधाभास नसतो तर!