बंगलोरच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअर मुलीनं स्वत:च तयार केलेलं ‘मॅरी मी इंदुजा’ या वेबपेजने गेल्या महिन्यात सोशल नेटवर्किंगवर चर्चा घडवली.  ‘आय अ‍ॅम नॉट अ‍ॅट ऑल अ मॅरेज मटेरिअल’ असं म्हणवणाऱ्या इंदुजानं अनेक तरुण मुलींच्या मनातला विषय बोलून दाखवला. तिच्या या पेजची दखल परदेशी माध्यमांनीही घेतली.
नाव : इंदुजा के ऊर्फ इंदुजा पिल्लई
जेंडर : टॉमबॉय
रीलिजिअस व्ह्य़ू : एथिइस्ट (नास्तिक)
मॅरिटिअल स्टेटस : मॅरिड टू सेल्फ.
नॉट अ‍ॅट ऑल अ मॅरेज मटेरिअल. मी चष्मा लावते. केस आखूड आहेत आणि मला ते कधीच लांब वाढवायचे नाहीत.
ही माहिती आहे २३ वर्षीय इंदुजा पिल्लई हिच्या मॅट्रिमोनी प्रोफाइलमधली. बंगलोरला राहणारी आणि पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असणाऱ्या इंदुजाने टिपिकल शादी प्रोफाइलच्या सगळ्या संकल्पना मोडून काढत स्वत:बद्दल  खरीखुरी माहिती आणि नवऱ्या मुलाकडून असलेल्या तिच्या अपेक्षा मांडत स्वत:ची मॅट्रिमोनी साइट तयार केली. काही तासांत या पेजला दोन लाखांवर पेजव्ह्य़ूज मिळाले. ११ हजारांवर लोकांनी फेसबुकवर पोस्ट लाइक केली आणि अक्षरश: हजारो कमेंट्स आल्या. बघता बघता इंदुजा जगभर पोचली. भारतीय मुलीकडून असलेल्या टिपिकल अपेक्षा आणि परफेक्ट मॅरेज मटेरिअल होण्यासाठीच्या खटपटी याबद्दल त्यानिमित्ताने चर्चा झाली.
त्याचं झालं असं.. इंदुजाच्या आईवडिलांनी तिची नावनोंदणी एका मॅट्रिमोनी साइटवर केली. त्यासोबत तिचं टिपिकल प्रोफाइल तयार केलं. इंदुजा म्हणते, ‘मी फक्त २३ वर्षांची आहे आणि लग्नासाठी अजिबात डेस्परेट झालेली नाहीय. मला अजून खूप हिंडायचंय, फिरायचंय, काम करायचंय. हे काहीच माझ्या त्या प्रोफाइलमधून कळणार नव्हतं. कुणी तरी लग्नाळू मुलींसाठी टेम्पलेट बनवावं आणि त्यात आपलं नाव घालावं, असं सगळं ते प्रकरण वाटलं मला. मी अशा कुठल्या टेम्प्लेटमध्ये बसणारी नाहीचे मुळी.’ खरं तर आपल्या पालकांच्या कृतीविरोधातलं बंड म्हणून तिने स्वत:चं मॅट्रिमोनी प्रोफाइल वेबपेज तयार केलं. स्वत:चं खरंखुरं वर्णन नि स्पष्ट, रोखठोक अपेक्षा तिने त्यात मांडल्या. ‘कुंटुबाच्या गोतावळ्यात रमणारा नवरा नको. एक्स्ट्रा पॉइंट्स टू द वन हू हेट्स किड्स’, असंही इंदुजानं अपेक्षांमध्ये लिहिलं होतं आणि त्यावरच अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं गेलं. ‘मला प्रवासाची आवड असल्यामुळे कुटुंब आणि मुलं यात रमणारा नवरा नको’, असं ती स्पष्ट करते.
इंदुजाच्या पेजवर आलेल्या कमेंट्समध्ये अनेक स्त्रियांनी तिच्या परखड विचारांचं कौतुक केलंय. ‘आम्हालाही असंच वाटतं’, ‘जे आम्ही केवळ आमच्या पालकांना सांगतो ते तिने जगासमोर  सांगितले’, असं म्हणणाऱ्याही बऱ्याच जणी होत्या. पण याहून जास्त खरा वाटला तो तिचा प्रामाणिकपणा आणि आपण जसे आहोत तसं स्वीकारावं ही इच्छा. काहींना मात्र हा पोरखेळ वाटला. ‘हिला लग्नच करायचं नाही म्हणून कारण देतेय’, ‘हल्ली कोणत्याही गोष्टीला प्रसिद्धी मिळते..’, ‘वेगळी..? नाही ही तर विचित्र आहे!’ अशाही प्रतिक्रिया आल्या. त्या वेबपेजवर असल्याने त्यावर जाहीरपणे चर्चा झडली. पण त्यासोबत तिला ४० जणांनी लग्नाची मागणीसुद्धा घातली.
अरेंज मॅरेज करताना गोरा रंग, लांब केस, पारंपरिक कपडे घालणारी, उच्चशिक्षित तरीही घरातली कामं करणारी, कमी मित्र अथवा मित्रच नसणारी, गृहकृत्यदक्ष मुलगीच सगळ्यांना अपेक्षित असते. थोडक्यात सांगायचं तर सोशिक, संस्कारी, सुंदर अगदी एखाद्या मालिकेत शोभेल अशी नायिकाच जणू हवी असते. पण सगळ्या जणी या साच्यात बसणाऱ्या नसतात. आपण आहोत तसं व्यक्त होता आलं पाहिजे, इंदुजानं हेच नेमकं दाखवून दिलं आहे आणि त्यामुळेच तिचं प्रोफाइल हिट झालं. लग्न ही दोघांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट मग त्यात मुलीच्या अपेक्षा, इच्छा यांना महत्त्व द्यायला नको का? आदर्शवादाच्या चौकटीत अडकवण्यापेक्षा तिला तिच्या आवडीनिवडीसकट स्वीकारणंच दोघांचं आयुष्य सुखकर करेल. ‘पीपल वाँट टू सरव्हाइव्ह, आय वाँट टू लिव्ह. मला जगायचं आहे. जिवंत राहायचं नाहीय..’ असं सांगणाऱ्या प्रांजळ, मुक्त, स्वच्छंद इंदुजा आपल्या आसपासही दिसतील. पण त्यांना टिपिकल मॅरेज मटेरिअल बनवायच्या नादात आपल्यापैकी अनेकजण त्यांना मनाविरुद्ध जगायला लावतो.