माझा पाकिस्तानी मित्र शाकाहारी आहे. माझ्या पॅलेस्टेनियन फ्रेण्डला शाहरूख खान आवडतो, अमेरिकन फ्रेण्ड ‘फॅब इंडिया’चे कपडे घालते.. बहुसांस्कृतिक वातावरणात स्वतची मूल्य जपण्याविषयी सांगतेय ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये अँथ्रॉपॉलॉजीचा अभ्यास करणारी श्वेता..
श्वेता दाभोलकर, लंडन

लंडनमध्ये सूर्याचं दर्शन कधीच होत नाही पण आज सूर्यदर्शन होत आहे, म्हणून खूपच छान दिवस आहे. समोर बशीमध्ये स्वत:च बनवलेले कांदेपोहे, पुढय़ात कॉम्प्युटर स्क्रीन आणि एका बाजूला पुस्तकांची चळत घेऊ न बसले आहे. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल सायन्स’(LSE) या शिक्षण संस्थेची मी विद्यार्थिनी आहे व इथे मास्टर्स इन अँथ्रोपोलॉजी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटचा अभ्यास करत आहे. बाबासाहेब आंबेडकरही येथून शिकले आहेत. या संस्थेबद्दल खूप जणांचं असं मत आहे की, LSE मध्ये प्रवेश मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. पण मला वाटतं की, प्रवेशापेक्षाही येथील अभ्यासक्रम कठीण आहे. येथील वातावरण खूपच स्पर्धात्मक आहे आणि अभ्यासक्रम अतिशय खोलवर अभ्यास करण्याचा व वैविध्यपूर्ण आहे. माझे कॉलेज फ्रेंड्स जगातील विविध देशांतून, भागांतून आलेले आहेत की ज्या ठिकाणांची नावेही आपण ऐकली नसतील.
LSE चं वैशिष्टय़ हे की येथील विद्यार्थ्यांच्या भाषेत, आचारांत, विचारांत विविधता आहे. येथील कॅम्पसमध्ये वावरताना अनेक भाषांतील संभाषण माझ्या कानावर पडतं. या सर्व विद्यार्थ्यांकडून मी नक्की एक शिकलेय की, त्यांना आपल्या मातृभाषेचा अतिशय अभिमान आहे. मग ती जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, अरेबिक वगैरे. भारतात मात्र बऱ्याचदा असा अनुभव येतो की जे लोक आपल्या मातृभाषेत बोलतात किंवा ज्यांना उत्कृष्ट इंग्रजी येत नाही, त्यांना कमी लेखलं जातं, याचं मला नेहमीच वैषम्य वाटत आलंय. मी LSEचा प्रवेश अर्ज त्यांच्या संकेतस्थळावर भरला. मला त्यासोबत ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ आणि माझ्या गुणपत्रिका जोडायच्या होत्या. मी स्टेटमेंट ऑफ पर्पजवर जवळजवळ दोन महिने काम करत होते. स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना हे अतिशय महत्त्वाचं आहे की, तुम्ही तुमच्या निवडलेल्या अभ्यासक्रमाबाबत किती दृढनिश्चयी आहात व त्याबरोबर तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला आहे. तो पुढील अभ्यासक्रमाशी कसा निगडित आहे आणि तुमची त्या अभ्यासक्रमातील विषयांची आवड व पुढे त्याचा कसा उपयोग तुम्हाला होणार आहे. LSE ला प्रवेश घेण्यापूर्वी मी ‘बीबीसी वर्ल्ड वाइड’मध्ये असिस्टंट प्रोडय़ुसर म्हणून हिस्ट्री आणि कल्चरशी निगडित डॉक्युमेंटरीमध्ये काम करत होते. मी विल्सन कॉलेजमधून बी.एम.एम. आणि एम.ए. (इंग्लिश लिटरेचर) मुंबई विद्यापीठातून केलं.
सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणं माझ्याही कुटुंबात डॉक्टर्स, इंजिनीअर्स, सी.ए. होते. म्हणून मिठीबाई महाविद्यालयातून बारावी सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मीसुद्धा अशीच दिशा निवडावी, अशी सर्वाची अपेक्षा होती. मी मात्र माझी पुढील शिक्षणाची दिशा बदलायचं ठरवलं. आयआयटी मुंबईमधून इंजिनीअर झालेला मोठा भाऊ घरात असताना बी.एम.एम. हा अभ्यासक्रम निवडणं, म्हणजे प्रवाहाविरोधात एक मोठं पाऊ ल उचलणं होतं. माझी आई माझ्या या निर्णयामुळं दु:खी झाली होती. एक दिवस मी दादाशी गावाच्या- कुडाळच्या गप्पा मारताना म्हटलं की, ‘दादा बघ, गावात शेती करण्यापेक्षा लोक शहरात नोकरी करणं किंवा दुकानात काम करणं हे उत्पन्नाचं साधन म्हणून योग्य समजतात. म्हणून शेतीचा विचारच हद्दपार होत आहे. राहणीमान सुधारण्याच्या नावाखाली सगळे आपलं मूळ गाव व संस्कृती विसरत चालले आहेत. याचा परिणाम काय होईल?’ लगेच दादा नेहमी चिडवतो तसा चिडवत म्हणाला, ‘मग तू अँथ्रोपोलॉजीचा अभ्यास कर.’ झालं .. माझ्या डोक्यात एक किडा वळवळला. मी त्याला विचारलं, ‘अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय रे?’ तर तो म्हणाला, ‘तूच शोधून काढ.’ मी लगेच त्यावर संशोधन सुरू केलं आणि असा मला माझा परदेशातील शिक्षणाचा मार्ग सापडला. अँथ्रोपोलॉजीबद्दल माहिती वाचल्यावर मला ते शास्त्र खूप आवडलं आणि मी ते शिकायचा निर्णय घेतला. छरएमध्येच प्रवेश अर्ज भरला, कारण जगातील ती सर्वात चांगली युनिव्हर्सिटी आहे. मला LSEमधून ‘ऑफर लेटर’ आल्यावर आई अजून काळजीत पडली. तिचा पहिला प्रश्न होता की, ‘त्यामुळं नोकरी मिळेल का?’ मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंब जगावेगळय़ा खडतर वाटा निवडण्याच्या भीतीतच दबून गेलेली असतात. मी ब्रिटिश काऊ न्सिल चे IELTS अ‍ॅवार्ड मिळवून भारतातील टॉप टेन मुलांमध्ये स्थान मिळवलं, तेव्हा माझ्या आईचं माझ्याबद्दल मतच बदललं.
मुंबईतील व्यक्तींसाठी लंडन हे खूप शांत शहर आहे. विविध देशांतील विविध भाषा बोलणारे लोक इथं राहतात. हे एक शिस्तबद्ध शहर आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी एका ठिकाणी बसले किंवा उभे असले तर स्टेशन येईपर्यंत ते हलत नाहीत आणि उतरणाऱ्या लोकांना बाजूला होऊन वाट देतात. उतरणारे प्रवासी उतरेपर्यंत कोणीही चढत नाही. जणू काही येथील लोकांना घाई नसते. सगळं कसं शांत शिस्तबद्ध. कधी कधी ट्रेनमध्ये थोडंसं सरकलं तरी जागा होऊ शकते, पण येथील लोक तसा आग्रह धरत नाहीत की रागही मानत नाहीत. कित्येकदा तर अगदी दादर स्टेशनसारखी गर्दी प्लॅटफॉर्मवर असते. तेव्हा येथील लोक स्टेशनबाहेर शांतपणं रांगेत उभे राहतात ते अगदी आत जाईपर्यंत. इथल्या गर्दीचा कोणालाही त्रास होत नाही. मुंबईत ट्रेनमध्ये चढण्यासाठी आपण धावत जातो, सर्व शक्ती पणाला लावून जागा मिळवायचा प्रयत्न करतो. लोकल ट्रेनमध्ये चौथ्या सीटसाठी भांडणही करतो. इथं मी ट्रेन किंवा बसमध्ये धावत जाऊन जागा पकडते, तेव्हा सहप्रवासी माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहतात. मी मुंबईकर असल्यामुळं मला जागा मिळाल्यावर मी मात्र खूश असते.
मी सेन्ट्रल लंडनमध्ये हॉस्टेलवर राहते. माझे शेजारी फ्रेंच, साउथ आफ्रिकन, स्विस, जर्मन, कोरियन आणि ब्रिटिश क्लासमेट्स आहेत. हॉस्टेलचं किचन आम्ही सर्व जण शेअर करतो. सांस्कृतिक देवाणघेवाण खूपच आहे. माझ्यासारख्या भारतीय मुलीला इथल्या खाद्यपदार्थाशी जुळवून घेणं खूपच कठीण. म्हणून मी स्वत:चा स्वयंपाक- नाश्ता स्वत:च करते आणि माझ्या फ्रेंड्सबरोबर शेअर करते. त्यांना माझे इंडियन पदार्थ खूप आवडतात. कुकरच्या शिटीचा आवाज म्हणजे मी किचनमध्ये असल्याचा संदेश असतो. हॉस्टेलमधील सगळ्यांना माझी फ्रेंच मैत्रीण मार्गोट लंडनमधील इंडियन हॉटेल्सपेक्षा मी किती छान पदार्थ बनवते, ते मलाच कौतुकाने सांगते. माझा गोल मसाल्याचा डबा आणि कुकरची शिट्टी यांची तिला गंमतच वाटते. ती भारतीय पदार्थाबरोबर गोल चपातीही बनवायला शिकली आहे आणि मी तिच्याकडून फ्रेंच सूप, किशेल्स, सलाड्स शिकले. माझे कांदेपोहे ती खाते व तिचं फ्रेंच सलाड मी खाते.
8

अजूनही माझ्या काही नातेवाईकांना वाटतं की, मी सायकॉलॉजी किंवा आर्किओलॉजीचा अभ्यास करत आहे. अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र. म्हणजे काय? तर विकास संकल्पना, देशाची अर्थव्यवस्था, राजकारण, जागतिकीकरण, अंतर्देशीय स्थलांतर या सर्वाचा लोकांच्या राहण्यावर, संस्कृतीवर आणि व्यक्तिमत्वावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास. LSEची अगदी आखीव-रेखीव अभ्यासपद्धती आहे. त्यांची लायब्ररी पाच मजल्यांची आहे. टेक्स्टबुक किं वा अभ्यासक्रमासारखं इथं काही नाही. शंभर पुस्तकांपेक्षा मोठी लिस्ट प्रत्येक विषयासाठी दिली जाते. मी गेल्या आठ महिन्यांत पन्नासपेक्षा जास्त पुस्तकं वाचली आहेत. इथं शिकवण्यावर प्रेम करणारे आणि शिकवण्याची छाप पाडणारे प्रोफेसर आहेत. लेक्चरसोबत इथं प्रत्येक विषयासाठी सेमिनार असतो. ज्यामध्ये दहा विद्यार्थी आपल्या प्रोफेसर व सहविद्यार्थ्यांसोबत शिकवलेल्या मुद्दय़ावर चर्चा करतात. प्रोफेसरना आपल्या शंकाही विचारू शकतात.
मागचं वर्ष माझ्या आयुष्यातील सगळ्यात संस्मरणीय वर्ष होतं. मी डेव्हलपमेंट स्टडीज इन्स्टिटय़ूटची स्टुडंट युनियन प्रेसिडेंट म्हणून निवडून आले आणि जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्र कार्यालयाला भेट देण्याची संधी मिळाली. मी एप्रिलमध्ये तिथं गेले होते. मी अनेक यू.एन. ऑफिसेस आणि स्टेशन इन-चार्जना भेटले. नव्यानं आखलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि त्यांची व्हेटो पॉवर, अलीकडील सीरियन स्थलांतर संकट आणि आण्विक शस्त्रास्त्र वाटाघाटी, त्याची अंमलबजावणी या संदर्भात मीटिंग्ज झाल्या. माझे माझ्या क्लासमेट्सबरोबर संभाषणही अशा अनेक विषयांवर असतं.
मी एक प्रशिक्षित व्यंगचित्रकार आणि कथक नृत्यांगना आहे. मी लंडन केंद्रामध्ये माझ्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची कथकची (लेखी) परीक्षा दिली. कारण ती माझ्या कॉलेजच्या टर्ममध्ये होती. डिसेंबरमध्ये ख्रिसमस सुट्टय़ांदरम्यान मुंबईत आले आणि कथकची प्रॅक्टिकल परीक्षा दिली. माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी त्याच वेळी Instituto Hispaniaमधून स्पॅनिश भाषेचा डिप्लोमा पूर्ण केला. मी माझ्या मित्रांकडून काही फ्रेंच आणि कँटोनीज शिकण्याचा प्रयत्न केला. माझे ब्रिटिश सहविद्यार्थी म्हणतात की, तुम्हा भारतीयांना पटकन भाषा शिकण्याचा वरदहस्त आहे.
पुढं माझी पीएच.डी. करण्याची इच्छा आहे. मला माझा प्रबंधाचा विषय भारतातील ग्रामीण विकास, त्याचा शेती व्यवसायावर होणारा परिणाम व अंतर्गत स्थलांतर राजवट हा घ्यायचा आहे. मी माझ्या देशाच्या विकासासाठी माझ्या शिक्षणाचा उपयोग करू शकले नाही तर त्याचा काय उपयोग? मी पीएच.डी. सुरू करण्यापूर्वी विकास क्षेत्रात कार्य करू इच्छिते. मी परदेशात राहून हे शिकले आहे की सर्व प्रकारचे लोक जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहेत. जसे आपल्याकडच्या सिनेमांमध्ये दाखवतात तसे छोटे कपडे परिधान करून माझी एकही वेस्टर्न फ्रेण्ड फिरत नाही. माझा पाकिस्तानी मित्र शाकाहारी आहे. माझ्या पॅलेस्टेनियन फ्रेण्डला शाहरूख खान आवडतो आणि माझी एक अमेरिकन फ्रेण्ड ‘फॅब इंडिया’चे कपडे घालते. मला हे उमजलंय की, कुठेही गेलात तरी तुम्ही तुमची ओळख, तुमची मूल्यं, तुमची संस्कृती जपली पाहिजे. कारण हेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाशी-मूल्यांशी ठाम ठेवतं. तुम्ही आपल्या मूल्यांशी ठाम नसाल, तर प्रगती कशी होईल? प्रत्येकानं आपण जसे आहोत, जिथून आलो आहोत त्याबद्दल स्वाभिमानी असलं पाहिजे. हेच कारण तुमचा स्वत:वरचा ठाम विश्वास इतरांना तुमच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडेल.

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com