आदिती केळकर हाटे
दुबई
आत्ता पुढय़ात आहेत अभ्यासाची पुस्तकं. मधूनच नजर टाकतेय नुकत्याच झोपलेल्या महिन्याच्या छोटीवर. बाळंतपणासाठी म्हणून मुंबईत आले असले तरी मन दुबईच्या आठवणींनी भरून गेलंय. छोटीसह तिथं परतल्यावर साकारायचाय करिअरच्या स्वप्नांच्या बंगला.. आठवताहेत ते मुंबईतले दिवस.. मी पाल्र्याच्या साठय़े कॉलेजमध्ये होते. मायक्रोबायोलॉजीत बी.एस्सी. केलंय. त्यानंतर लगेच
‘परफेक्ट रिएजन्ट्न्स अॅण्ड बायोलॉजिकल्स.’ जॉबच्या तीन वर्षांच्या काळात कॉर्पोरेट लाइफ अनुभवायला मिळालं. मी हेड ऑफ मॅन्युफॅक्चिरग ऑफ केमिकल म्हणून काम केलं. कंपनी छोटी असल्यानं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. जॉबनंतरचा वेळ फुकट न घालवता पाचवी ते दहावी गणिताच्या टय़ूशन घेतल्या. दरम्यान, अमेयशी ओळख झाली. तेव्हा तो पाच र्वष दुबईत जॉब करत होता. लग्नानंतर तिथं गेल्यावर आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची खरी जिद्द होती. तीच प्रेरणा बनली.
अनेकांच्या मनात दुबईची एक टिपिकल प्रतिमा असते, तशी माझ्याही मनात होती. पण प्रत्यक्षात चित्रं खूपच पालटलेलं होतं. तिथल्या शेख महंमदच्या मते, ‘दुबईत कॉस्मोकल्चर निर्माण करून सगळ्या देशांतल्या लोकांनी दुबईचा उत्कर्ष साधावा. आम्ही तुम्हांला सगळ्या सुविधा पुरवतो.’ त्यामुळं राजेशाही असली तरी वातावरण लिबरल आहे. हे चित्र पाहिल्यावर मुंबईतच असल्याचा फिल आला. विमानानं अवघं तीन तासांचं अंतर असल्यानं भारतात वर्षांतून दोन-तीन वेळा येता येतं. आता मी इथं सेट झाल्येय. सुरुवातीला उंचच उंच इमारती, लांबलचक रस्ते, कमालीची शिस्त यात आपला निभाव कसा लागणार असं वाटलेलं. आता दुबईबद्दल आपुलकी वाटायला लागलेय. भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असून महाराष्ट्र मंडळ, मराठी कला मंच वगैरेंमुळं सांस्कृतिक भूकही भागते. पर दुबई आणि करामा या सर्वाधिक दाटीवाटीच्या भागांतल्या इमारती लहान असून सगळ्या धर्माची प्रार्थनास्थळं आहेत. चाट-वडापावपासून सगळं तिथं मिळतं.
दुबईत राहून मला मास्टर्स करायचं होतं. मुळात मला डॉक्टर व्हायचं होतं. ते न जमल्यानं लोकांना आहाराचं महत्त्व विशद करण्यासाठी आहारशास्त्राकडं वळायचं ठरवलं. इग्नूच्या कॉरसपॉण्डण्ट कोर्सपैकी  Dietetics and food Service Management हा पाच वर्षांचा कोर्स निवडला. या निर्णयाला नवरा आणि माहेर – सासरच्यांकडून खूप छान पाठिंबा मिळाला. या काळात दुबईतलं घर-नोकरी सांभाळून मी भारतात परीक्षेसाठी यायचे. इथं सगळे जण माझ्या मदतीला तत्पर असायचे. काही काळानं नवऱ्याचा विचार आहे फूड बिझनेस करायचा. त्याला पूरक असावा म्हणून मी Food Service Management Systemsचा कोर्स केला. त्याचं स्टॅण्डर्ड करड २२०००:२००५ आहे. या कोर्समध्ये मी पहिली आलेय. आता दुबईला परतल्यावर डाएट कन्सल्टेशनसाठी चांगली संधी उपलब्ध होईल. भारतात मेडिकल किंवा पॅरामेडिकल क्षेत्रात पदवी घेतली तरी परदेशात त्यांच्या नियमांनुसार परीक्षा द्यावी लागते. त्यानुसार दुबई हेल्थ ऑथॉरिटीची मेडिकल एक्झाम असते. ती दिल्यावर लायसन्स मिळू शकेल आणि डाएटेशियन म्हणून काम करण्याचा परवाना मिळाल्यास मी काम करू शकते. त्यासाठीचा अभ्यास वेळ मिळेल तसा चालू आहे.
सुरुवातील दुबईला गेल्यावर पहिले पाच महिने माझ्या हातात काहीच नव्हतं. मग आली मीडिया क्षेत्रातली जॉब ऑफर. त्यांच्या प्रशिक्षणानंतर परफॉरमन्स चांगला झाल्यास जॉब मिळतो. वाटलं, या जॉबमुळं आपलाही घरखर्चात हातभार लागेल. तो जॉब मिळालादेखील. Ipsos  या मल्टिनॅशनल कंपनीचं काम ८५ देशांत चालतं. त्यांच्या वेगवेगळ्या विभागांपैकी माझं पोस्टिंग मीडिया अनालिस्ट म्हणून रेडिओ विभागात झालं. रेडिओवर मोठय़ा ब्रॅण्ड्सच्या जाहिराती लागतात, ते कंपनीचे क्लाएंटस् आहेत. सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी १० पर्यंत रेडिओवर लागणाऱ्या जाहिरातींच्या क्लिपिंग्ज एका मशीनवर रेकॉर्ड होतात. त्या ऐकून त्यांचं मॉनिटिरग केलं जातं. टेलिपॅड सॉफ्टवेअरवर त्याची एन्ट्री घेऊन ती क्लाएंटला पाठवली जाते. ते त्याची पडताळणी करून अप्रूव्ह करतात. अप्रूव्ह न झाल्यास काम पुन्हा आमच्याकडं येतं. त्यातला मिसिंग भाग पुन्हा एन्ट्री करून पाठवला जातो. हे काम मी करत गेले. कामाला सुरुवात केल्यावर थोडं चाचपडायला झालं. नंतर मात्र माझ्या लिखाणाचा स्पीड वाढला. मग मी एवढी तरबेज झाले की, सीनिअर नसूनही ज्युनिअरना प्रशिक्षण दिलं. माझ्याकडून एकदाच अॅड मिस झाली होती. त्या वेळी ओव्हरटाइम करून ते काम पूर्ण करून दिलं होतं. प्रेग्नन्सीसाठी भारतात यायचं ठरल्यावर तीन वर्षांनी हा जॉब सोडला. त्या वेळी एक सीडी रेकॉर्ड करून त्याद्वारे इराणमधल्या ज्युनिअर्सना ट्रेनिंग दिलं गेलं.
योग्य आहारासोबत शारीरिक क्षमता वाढणं गरजेचं आहे. माझा योगाकडं अधिक कल आहे. लहानपणी मी जिम्नॅस्टिक, रोप मल्लखांब वगैरे करायचे. सांताक्रूझच्या योग संस्थेत मी योग शिकले होते. माझ्या निरीक्षणानुसार भारतापेक्षा परदेशांत योगाभ्यास अधिक केला जातो. योगाबद्दल अरबी लोकांना प्रचंड उत्सुकता आणि आत्मीयता वाटते. मी दुबईच्या लाइफस्टाइल योगा सेंटरमध्ये गेली चार र्वष जातेय. या सेंटरमधला योग ऱ्हिदमवर केला जातो. सेंटरचं रिलॉन्चिंगसाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या ऑडिशनमध्ये माझी निवड होऊन शूट झालं. त्यांच्या पोस्टरवर झळकले.
अरबी लोक शिस्तप्रिय, गुणवत्तेला महत्त्व देणारे आहेत. शुक्रवार – शनिवार सुट्टीचे दिवस असून त्यातल्या फॅमिली टाइमचं महत्त्व खूप असतं. स्त्रिया फिटनेसप्रेमी आहेत. भारतीय खाद्यपदार्थ दुबईकरांना आवडतात. त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथल्या माझ्या पहिल्या वाढदिवसाला बुर्ज खलिफाच्या गगनचुंबी इमारतीवरून दुबईदर्शन घडलं. अफाट जिद्दीच्या जोरावर शेखनी केलेल्या वाळवंटाच्या कायापालटाला आणि दूरदृष्टीला मी मनोमन सलाम केला. दुबईत मिश्र संस्कृती असून हिंदी भाषिक खूप आहेत. इंग्रजी सर्रास बोलतात. आपण राहतो त्या देशाची भाषा शिकायला हवी, म्हणून अरेबिकच्या क्लासला जायला लागले. अरेबिकची एक लेव्हल पूर्ण झालेय. अरबी-हिंदी भाषेतले काही शब्द खूप सारखे आहेत. उदाहरणार्थ-खुर्सी, मौजुद, बटाटा, बाबा वगैरे. ते शिकताना खूप मज्जा आली. आता अरबी आवडायला लागलेय. दुबईतलं स्त्रीविश्व अगदी सुरक्षित आहे. कारण दुबईतली कायदा आणि सुव्यवस्था खूप कडक आहे. शिक्षण क्षेत्र, बँका आणि सरकारी सेवांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे.
आम्ही दुबईत चिक्कार भटकंती केलेय. अॅटलांटिस या मोठय़ा हॉटेलात बऱ्याच हिंदी चित्रपटांचं शूटिंग होतं. दुबई मॉल जगातला सगळ्यात मोठा मॉल आहे. अजूनही मी तो पूर्ण बघू शकलेले नाही. मॉल ऑफ एमिरेट्स आवर्जून बघण्यासारखा आहे. मिरॅकल गार्डनमध्ये जगभरातली लाखो प्रकारची फुलं फुलतात. दुबई शॉपिंग फेस्टिव्हल प्रसिद्ध आहे. ग्लोबल व्हिलेजमधल्या पॅव्हेलियनमध्ये प्रत्येक देशाची खासियत उपलब्ध असते. डान्सिंग फाउंटन आणि बुर्ज खलिफा आदींच्या उभारणीत भारतीय इंजिनीअर्सचा खूप मोठा वाटा आहे. बुर्ज खलिफाच्या जवळच्या पोस्टरवर त्याच्या उभारणीतील सहभागींच्या नाव आणि फोटोपैकी ऐंशी टक्के लोक भारतीय असल्याचा मला फार अभिमान वाटला. दुबईच्या उभारणीत इंजिनीअर्सचा मोठा वाटा असल्यानं त्यांना फार मान दिला जातो. मी आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय केलंय. त्यासाठी कोचिंग क्लासला जाऊन थिअरी नि प्रॅक्टिकल शिकावं लागतं. लेखी परीक्षेसह विविध परीक्षांच्या चक्रव्यूहातून पार पाडावं लागतं. मगच ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं. कारण तिथले वाहतुकीचे नियम फारच कडक आहेत.
दुबईत शिस्तपालन मनापासून करता आलं. आत्मविश्वास वाढला. दिवस खूप आखीवरेखीव हवा, असं वाटायला लागलंय. छंद जोपासायला फारसा वेळ मिळाला नाही. तरी टेराकोटा ज्वेलरीचा कोर्स केला. तिथं मित्रमंडळी आणि सोशल व्हायला खूप वेळ लागतो. शेजार आहे, हे जाणवायला वेळ लागतो. आपण स्वत:हून बोलायला जाणार नाही, तोपर्यंत ते बोलणार नाहीत. आता माझं फ्रेण्ड सर्कल अरेबिक नि भारतीय झालंय. अरबी संस्कृती आणि इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय.. चला, गप्पाष्टक आवरतं घेते. अभ्यासाचा वेळ वाया नाही घालवायचा. विश मी लक..
(शब्दांकन – राधिका कुंटे)