कायद्याचा अभ्यास करताना मिळालेल्या सोन्यासारख्या संधी, त्यासाठी केलेला प्रवास आणि प्रवासादरम्यान भेटलेल्या माणसांविषयी सांगतेय, लंडनला राहून आलेली मेघा गावडे. हा प्रवास प्रेरणादायी आहे.
मेघा गावडे
लंडन

भूतकाळाच्या आठवणींत थोडंसं डोकावलं की, वर्तमानात राहून भविष्यात पावलं टाकायची प्रेरणा नक्कीच मिळते. आत्ताही आठवतोय, तो सारा प्रवास.. मी बाबांची लाडकी. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतेय. बाबांच्या समाजाला मदत करण्याच्या दृष्टिकोनामुळं मला माझ्या भविष्याकडं पाहण्याची संधी मिळाली. मुंबई महापालिकेच्या शाळेतील शिक्षणानंतर डी. जी. रुपारेल कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. मुळातच लहानपणापासून इंग्रजीचं महत्त्व घरातल्यांनी सांगितल्यामुळं पाचवीनंतर आम्ही भावंडांनी इंग्रजी बोलण्याचा सराव करायला सुरुवात केली. पुढं लंडनमध्ये हे इंग्रजी शिक्षण उपयोगी पडलं. मराठी माध्यमात शिकलेल्यांचे इंग्रजी उच्चार आम्हाला आवडतात, असा अभिप्राय स्थानिक ब्रिटिशांनी मला दिला होता. रुपारेलमधून मराठी साहित्यात पदवी घेतल्यानंतर पुन्हा प्रवेश घेतला रिझवी लॉ कॉलेजमध्ये. कायदा शाखेच्या शेवटच्या वर्षांत असताना जाणवायला लागला की, आपणही लोकांसाठी काहीतरी वेगळं करू शकतो. त्यासाठी राजकारणात उतरण्याची गरज नाही. तर त्यांच्या हक्कासाठी लढून, त्यांच्या पाठीशी उभं राहूनदेखील ते करता येईल. वडिलांना ही कल्पना सांगताना ‘फक्त लढ म्हणा’ एवढीच माझी अपेक्षा होती. कारण ही खिंड खूपच मोठी होती. वडिलांनी मला तेव्हाच पुढच्या अडीअडचणींची ओळख करून देत ते माझ्यापाठीशी खंबीरपणं उभे असल्याचा दिलासाही दिला.
‘रिझवी’त तिसऱ्या वर्षांला असताना मुंबईतल्या ‘सिंघानिया लॉ फर्म’मध्ये मी तीन महिने इंटर्नशिप केली. तेव्हा उमगलं की, मुंबईतल्या आपल्या वकिलीचं अवकाश थोडं सीमित असेल, पण त्या वेळी आंतरराष्ट्रीय कायद्यांची ओळख झाली. त्यात रस वाटल्यानं ‘सिंघानिया’तल्या सीनिअर्सशी चर्चा केली. रिझल्टनंतर पुढल्या शिक्षणासाठी लंडनला जायचा बेत आखून त्या तयारीला लागले. दरम्यान युनिव्हर्सिटी शोधण्याचं काम सुरू होतं. मग ‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’मध्ये LLM In International Human Rights law & International Criminal Law या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याचं उअर CAS Letter आलं. त्यावेळी थोडंसं मनावर दडपण आलं होतं.
माझ्या युनिव्हर्सिटीत प्रवेश परीक्षा नव्हती, पण ‘स्टेटमेंट ऑफ परपज’ची तयारी केली. मी ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हेगारी कायद्या’च्या शिक्षणासाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’ची निवड का केली, हे त्यांना मोजक्याच शब्दांत लिहून पाठवायचं होतं. माझ्या कोर्सला त्यावर्षी भारतातून कुणीच नव्हतं. लंडनला जाण्याआधीच वडिलांनी ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ची वेबसाइट पाहिली होती. तिथल्या बाप्पाचं दर्शन घेऊन माझ्या ११ महिन्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ गणेशोत्सवातच झाला. लंडनच्या प्रवासातला मोठा हॉल्ट आबुधाबीला होता, तिथं कसेबसे ८ तास काढले. हिथ्रो विमानतळावर पहिलं पाऊल टाकल्यावर मन भरून आलं. माझ्या आदर्शापैकी एक असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण प्रकर्षांनं झाली. लंडनमध्ये राहण्यासाठी आधीच युनिव्हर्सिटी हॉस्टेलची कॅप्सुल बुक केली होती. सगळा धीर एकवटून एकटीच मजल दरमजल करत हॉस्टेलला पोहचले. तिथं नायजेरियन मित्रानं छान ‘वेलकम’ केलं. नंतर ग्रीस, थायलंड, स्कॉटिश, नायजेरिया, आर्यलड आदी ठिकाणची मित्रमंडळी झाली. इतर कोर्सेससाठी आलेल्या काही भारतीयांशीही मैत्री झाली. हॉस्टेलच्या किचनमध्ये मी स्वयंपाक करायचे. इथं भारतातल्या सगळ्याच गोष्टी मिळतात. हॉस्टेलचं ९ महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर एका मराठी कुटुंबात पीजी म्हणून राहिले.
युनिव्हर्सिटीच्या डंकन हाऊसमध्ये आमचे वर्ग भरायचे. सुदैवानं मानवाधिकार विषयावर काम करणारे आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध कमिटय़ांवर काम करणारे मान्यवर मार्गदर्शक म्हणून लाभले. पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळे विषय आठवडय़ातून फक्त दोन दिवस २ तास चालायचे. आपल्यासाठी हे नवीनच. कारण आपल्यासाठी शाळा कॉलेज हे ५-६ तासांचं असतं. तर त्यांच्यासाठी प्रयोग, विषय, थिसीस हे महत्त्वाचे असतात. आठवडय़ाच्या त्या दोन तासांसाठी दिवसाचे १५ तास खूप अभ्यास करायला लागायचा. खूप आंतरराष्ट्रीय राजकीय-सामाजिक विषयांचं वेगवेगळ्या पैलूंनी निरीक्षण करता आलं. मित्रमैत्रिणींसोबतच्या चर्चामध्ये त्यांच्या देशांतल्या राजकीय-सामाजिक प्रश्नांची तोंडओळख झाली. प्रसंगी काही मुद्दय़ांवर घमासान चर्चाही व्हायची. केवळ अभ्यास एके अभ्यास न करता युनिव्हर्सिटीची निवडणूक लढवायला मिळाली. तिथल्या विद्यापीठीय निवडणुकीचा प्रचार पोस्टरबाजीपेक्षा अधिकांशी इंटरनेटवरून होतो. तिथं मॅच्युअर स्टुण्डटना (वय र्वष २०+) मार्गदर्शक म्हणून असलेल्या पोस्टसाठी मी उभी राहिले होते. आपले व्हिडीओ तयार करून, नाईटआऊटच्या वेळी किंवा मतदान करायला जात असतानाही तिथं उमेदवारांचा प्रचार चालतो. मूळचा बांगलादेशी पण येमेनहून आलेल्या मित्रानं मला प्रचारात खूप मार्गदर्शन आणि मदत केली. आमची टीम वरचढ ठरून सगळ्या पोस्टसाठी आम्ही निवडून आलो. अजूनही आम्ही संपर्कात आहोत. त्यावेळी झालेला आनंद घरी फोन करून शेअर केला होता. जिंकल्यानंतर तिथल्या बऱ्याच स्थानिक आणि परदेशात शिक्षणासाठी वास्तव्य करण्यासाठी येणाऱ्या विद्यर्थ्यांचे प्रश्न सोडवता आले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंग्लंडमधील महिलांसाठी काम करणाऱ्या कमिटीला मी जॉइन झाले होते. त्यामुळं मला अनेक कॉन्फरन्समध्ये सहभागी होता आलं. इतर देशांतील महिलांशी संबंधित प्रश्न आणि अत्याचारांची जाणीव या चर्चासत्रांमधून झाली. तसंच संयुक्त राष्ट्रसंघाच्या तरुणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या गटात काम करण्याची संधी मिळाली. हा गट स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या विविध अडीअडचणी सोडवायला मदत करतो. तिथं आफ्रिकेतील महिलांच्या सुंतेचा (circumcision) महत्त्वाचा प्रश्न मी कळकळीनं मांडला होता. प्रत्येक देशांतील शस्त्रास्त्रांचा प्रश्न, सीरियाचा प्रश्न आदी विषयांवर काम केलं होतं. जागतिक बार असोसिएशनशी मी जोडलेली आहे. मानवाधिकाराच्या विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्सही अटेंड केल्यात. लंडनमध्ये राहिल्यानं ब्रिटिश म्युझियम, ब्रिटिश लायब्ररी, किंग्ज कॉलेज आदी ठिकाणी रोज जाणं व्हायचं. शिवाय ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, मॅंचेस्टर, ग्लॅक्सगो युनिव्हर्सिटीच्या लायब्ररींत अभ्यासासाठी जाण्यासाठी त्या शहरांमध्ये प्रवास केला. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्यासाठी किती कष्ट घेतले असतील, ते समजलं. लंडन, स्वित्र्झलड या ठिकाणी नव्या गोष्टी स्वीकारण्यासोबतच जुनी संस्कृती टिकवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि मेहनत जाणवते. जिनिव्हा शहरातल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात जगातल्या काही महत्त्वाच्या राजनैतिक माणसांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करायला मिळाली. तिथल्या ह्य़ुमन राइट कौन्सिलचं काम पाहायला मिळालं.
मला मुळातच प्रवासाची खूप आवड. अभ्यास आणि कामानिमित्तानं गेल्यावर हाती असणाऱ्या खूप कमी वेळात बरंच काही एक्सप्लोर करता येतं, हे मी शिकलेय. त्यासाठी वेळेचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. लंडनसह स्वित्र्झलड, जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेम्बर्ग, इटली आदी ठिकाणी प्रवास करता आला. तेथील सामाजिक आणि राजनैतिक प्रश्न खूप बघता आले. लंडनच्या महाराष्ट्र मंडळातल्या केदार लेले यांनी मला सांगितलं की, ‘कुठल्याही देशात फीर, प्रामाणिकपणा जपलास, संवाद साधलास तर मदत आणि माहिती मिळेल’. हा मूलमंत्र लक्षात ठेवला तर सगळे जण आपल्याला मदत करतात. मीही काही मित्रमंडळींना आर्थिक मदत केल्येय आणि त्यांनीही प्रामाणिकपणे ते पैसे वेळेत परत केलेत.
लंडनमधल्या आठवणींपैकी काही प्रकर्षांनं लक्षात राहिल्यात. पदवीदान समारंभाच्या वेळी युनिव्हर्सिटी चान्सलरशी शेकहॅण्ड करून आणि त्यांच्याकडून पदवी स्वीकारणं, हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्याच रात्री वडिलांशी स्काईपवर चॅट करताना त्यांचे भरून आलेले डोळे अनमोल होते. माझ्या जिद्दीचं घरीदारी कौतुक झालं. लंडनपासून दूर टेंटरडन गावातली स्टीम रेल्वे अजूनही चालू आहे. तेव्हा मुंबई-ठाणे या पहिल्या रेल्वेची आठवण झाली. आधुनिकतेची कास धरूनही त्यांनी जुन्या गोष्टींचं केलेलं जतन जाणवलं. लंडनमध्ये असताना तिसऱ्या सावरकर विश्व संमेलनात सच्चिदानंद शेवडे आणि वासुदेव गोडबोलेंच्या भाषणांतून सावरकरांविषयी खूप अभ्यासपूर्ण माहिती कळली. आंबेडकर-सावरकरांची स्मृती असलेल्या लंडनमधल्या सगळ्या ठिकाणी मी गेले होते.
लंडनहून परतल्यावर मी आणखीच समजूतदार झालेय. लंडनहून परतायचा निर्णय खूप धाडसी होता. समाजासाठी काम करायचा वडिलांचा विश्वास जपतेय. सामान्य लोकांसाठी खूप काही करून त्यांना न्याय मिळवून द्यायचाय. सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून स्वत:ची प्रॅक्टिस करतेय. काही काळानं सॉलिसिटरची परीक्षा द्यायचा विचार चालू आहे. त्यासाठी लंडनला जावंच लागेल मला. लंडन आजही बोलावतंय, पण कामांमुळं वेळ मिळत नाहीये. बघूया कसं काय जमतंय ते..
(शब्दांकन – राधिका कुंटे)
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com