कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी संबंधित संशोधन करतानाची वाटचाल आणि वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोर करताना आलेल्या अनुभवांविषयी सांगतेय ‘अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रीसर्च’चा वुमेन इन कॅन्सर रीसर्च हा पुरस्कार मिळालेली मनाली फडके.

मनाली फडके,
टेम्पा (फ्लोरिडा)

हाय फ्रेण्ड्स,
शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला विज्ञान विषयाची गोडी होती. तेव्हा जेनेटिक्सचं फिल्ड नवीन होतं नि लोकप्रिय होत होतं. त्यामुळं वाटलेलं जेनेटिक्समध्ये करिअर करावं का.. करिअरसाठी मेडिसिन आणि फार्मसीचे पर्याय होते. वैद्यकीय क्षेत्रातली स्पर्धा आणि बाहेर राहाणं, लक्षात घेऊन मी पॅरामेडिकल पर्याय शोधल्यावर कळलं, फार्मसीतही चांगल्या संधी आहेत आणि परदेशी जाऊन संशोधन करण्यात रस असल्यास हे चांगलं क्षेत्र आहे. मला पहिल्यापासून संशोधनात रस होता. कारण मला वाटतं की, आपण केलेल्या संशोधनाचं फळ सगळ्यांना मिळतं. संशोधक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.. नॉन-मेडिकल फिल्डमध्येही. पुढं ‘यूडीसीटी’मधून बीफार्म केलं. ते करतानाच फार्माकोलॉजीत अधिक रस वाटू लागला. एकीकडं विचार चाललेला अमेरिकेत शिक्षण घ्यायचा.. इथं खूप ग्लोबल आहे. वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधता येतो. इंडिपेण्डन्स वाढतो आणि महत्त्वाचं म्हणजे संशोधक आणि शास्त्रज्ञांसाठी इथं खूप संधी आहे. फण्डिंग चांगलं आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. त्या दृष्टीनं परदेशी जाण्यासाठीच्या परीक्षांची तयारी केली. मला अ‍ॅडमिशन मिळालेल्या युनिव्हर्सिटीजपैकी फिलाडेल्फिया टेम्पल युनिव्हर्सिटीमधला फार्मसी प्रोग्रॅम चांगला होता. सुरुवातीला थोडा फण्डिंगचा प्रॉब्लेम होता आणि मला स्वत:च्या क्षमतेवर इथं यायचं होतं. त्यामुळं पहिल्या सहा महिन्यांसाठी कर्ज घेऊन मी इकडं आले. इथल्या प्रोफेसर्सशी चर्चा करून मग मला जेनेटिक्स लॅबमध्ये मुलांना शिकवण्याचा जॉब मिळाला.
मास्टर्सच्या दुसऱ्या वर्षांला असताना, माझ्या डिपार्टमेंटच्या डिरेक्टरनी मला ‘पीएच.डी’विषयी विचारलं. कुठं तरी माझ्याही मनाशी होतंच ते, कारण मला संशोधनात रस होताच आणि त्यासाठी पीएचडी हा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यांना म्हटलं की, पीएचडी करायचेय, पण आधी मास्टर्स करून जॉब करेन, कर्ज फेडेन आणि मग करेन. त्यांनी सल्ला दिला की, यात पीएचडी मागं पडू शकते. ‘पीएच.डी’ खरोखरच करायची असेल तर व्यावहारिक अडचणींवर तोडगा निघेल, कारण पीएचडी करताना पार्टटाइम जॉब आणि स्टायपेंड वगैरे मिळू शकतं. या गोष्टींवर विचार करून त्या प्रत्यक्षात आणल्या. ‘फार्माकोजिनॉमिक्स लॅब’मध्ये पर्सनलाइज्ड मेडिसिन तयार केलं जातं. तिथल्या माझ्या संशोधनाचा फोकस कॅन्सरवरील संशोधनावर होता. तेव्हा वाचन-अभ्यास करताना लक्षात आलं की, हा एक किचकट आजार आहे आणि कुणालाही होऊ शकतो. त्यामुळं आपण संशोधन करून या रोगाच्या निवारणात खारीचा वाटा उचलावा, असं मनाशी ठरवलं. पीएचडी पूर्ण व्हायला साडेपाच र्वष लागली. दुसरीकडं मी नोकरी शोधत होते. मला टेम्पा, फ्लोरिडामध्ये मॉफ्फिट कॅन्सर रीसर्च सेंटरमध्ये नोकरी लागली. तिथं एक्सक्लुजिव्ह कॅन्सर रीसर्च होतं आणि ‘एन.आय.एच.’ अर्थात अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थनं या संस्थेला स्पॉन्सर केलंय. तिथं मी ‘कॅन्सर रीसर्च सायंटिस्ट’ या पदावर काम करतेय. माझ्या संशोधनाचा मुख्य अभ्यासविषय मेलेनोमा हा एक प्रकारचा स्किन कॅन्सर आहे. सध्या आमचा अभ्यास ड्रग रेसिस्टन्स आणि टार्गेटेड थेरपीज फॉर मेलेनोमा या विषयांवर सुरू आहे.
फिलाडेल्फियाला असताना माझा बॉस रशियन होता. त्यामुळं फक्त अमेरिकनच नव्हे तर इतर देशांतल्या नागरिकांशीही संवाद साधता आला. माझ्या संपर्कातली इथली माणसं खूप वेलकमिंग, फॉरवर्ड माइंडेड आणि स्ट्रेटफॉरवर्ड आहेत. त्यामुळं आपल्याही विचारांना चालना मिळते. आताचा माझा बॉस ब्रिटिश असून तो खूप हेल्पफुल नि स्ट्रेटफॉरवर्ड आहे. इथं महाराष्ट्रीय लोक खूप आहेत. आम्ही सणवार साजरे करतो. गणेशोत्सव-दिवाळीच्या सुमारास मी अभारतीय मित्रमंडळींना आवर्जून बोलावते. त्यामुळं आपसूकच त्यांना आपल्या संस्कृतीची माहिती होते. मी एकुलती एक असल्यानं खूप प्रोटेक्टिव्ह होते. चांगल्या करिअरसाठी परदेशी जाऊन शिकण्याच्या निर्णयामुळं माझ्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक झाला. मी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाले. व्यावहारिक जगाशी थेट संबंध येऊन सगळ्या अडीअडचणींना स्वत: तोंड द्यावं लागतं. आईबाबांचा मला कायमच सपोर्ट होता. भारतात असताना थोडी लाजरीबुजरी असल्यानं इथलं पहिलं वर्ष थोडं कठीण गेलं. पुढं युनिव्हर्सिटीतलं फ्रेण्ड्सर्कल वाढलं. माझी पर्सनालिटी स्ट्राँग झाली. करिअरमधल्या चढउतारांना धैर्यानं सामोरी गेले. सुट्टीत भारतात दरवर्षी जायचे. मध्यंतरी आईबाबा पहिल्यांदा इथं आल्यावर त्यांना माझ्यातला बदल प्रकर्षांनं जाणवला. मी स्वत: ड्राइव्ह करून त्यांना फिरायला घेऊन गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की, त्यांना माझा किती अभिमान वाटतोय ते.. तो क्षण माझ्या अ‍ॅकॅडमिक आणि करिअर अचिव्हमेंट्सपेक्षा फारच मोलाचा होता.. माझा निर्णय योग्यच होता यावर शिक्कामोर्तब झालं.
डान्सची खूप आवड असल्यानं आठ र्वष भरतनाटय़म शिकलेय. मात्र दहावीच्या अभ्यासामुळं अरंगनेत्रम राहून गेलं. ग्रॅज्युएशन संपत आलं होतं, तेव्हाची गोष्ट. टेम्पल युनिव्हर्सिटीच्या कल्चरल फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या देशांतल्या संस्कृतींचं दर्शन नृत्यातून घडवायचं होतं. वाटलं, करून तर बघू या.. पाच जणींच्या आमच्या ग्रुपनं भरतनाटय़म, फोकडान्स आणि फ्यूजन नृत्य प्रकार बसवले. आमच्या डिपार्टमेंटकडून खूपच सपोर्ट आणि फंड मिळाला. त्यामुळं खूप प्रोत्साहन मिळालं. इतरांची नृत्यं छान झाली. बाकीच्यांहून आमचा ग्रुप छोटा होता. त्यामुळं आम्हाला पहिला पुरस्कार घोषित झाल्यावर आधी विश्वासच बसला नाही. परीक्षकांसह सगळ्यांनीच आमच्या नृत्याचं, कॉश्च्युम्सचं फार कौतुक केलं. त्यानंतर टेम्पामधल्या मराठी मंडळात मी ‘नटरंग’च्या गाण्यांवर शास्त्रीय नृत्य केलं. इथं आल्यावर स्वयंपाक करायला आवडायला लागलं. मी ऑनलाइन रेसिपीज, कुकरी शोज बघायचे. इंडियन, अमेरिकन, मेक्सिकन, इटालियन अशा वेगवेगळ्या डिशेस करायला शिकलेय. मजा म्हणजे कधी स्ट्रेसफुल असले की, नवीन रेसिपी करायला आवडते. एका अर्थी ते माझ्यासाठी स्ट्रेसबस्टरसारखं झालंय. इथं खूप रेस्तराँ आहेत. फिलाडेल्फियात बऱ्याचदा आम्ही घरीच स्वयंपाक करायचो. मुळात मला खाण्याची खूप आवड आहेच आणि इथं अनेक देशांच्या डिश ट्राय करायला मिळाल्या.
मला आणि नवऱ्याला बाइकिंग- ट्रेकिंगची खूप आवड आहे. त्यामुळं आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो. कधीकधी फिलाडेल्फियाच्या ग्रुपसोबतही जातो. मध्यंतरीची ग्रॅण्ड कॅननची ट्रिप एकदम मस्त झाली. तिथं आम्ही हायकिंग केलं. मागच्या वर्षीचा हवाईचा अनुभव युनिक होता. तिकडं हालियाकाला नावाचा व्होलकॅनिक माऊंटन आहे. हवाईमधल्या माऊ आयलंडवर हायकिंगचा अनुभव घेतला. फिलीच्या ग्रुपसोबत यलो स्टोनला छान वाइल्ड लाइफ बघता आलं. लाँग वीकएण्ड मिळाल्यावर आम्ही बाहेर पडतोच. फ्लोरिडात कधीकधी बीच बाइकिंगही करतो.
कॉन्फरन्सच्या निमित्तानं मला फिरायला मिळतं. पीएच.डी. करतानाच्या पहिल्या कॉन्फरन्सची आठवण भारी आहे. तेव्हा बॉसनं सॅन दिएगोला जाऊन कॉन्फरन्समध्ये माझ्या संशोधनाबद्दल सादरीकरण करायला सांगितलं. त्यानं सांगितलेलं की, अमेरिकेत तुम्ही स्वत: विचारणार नाही, तोपर्यंत कुणी तुम्हाला आपणहून काही सांगणार नाही. पुढं हे मला अनुभवानं कळलं. ही पहिली कॉन्फरन्स होती ए.ए.सी.आर. अर्थात अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रीसर्च या संस्थेची. ही कॉन्फरन्स अंदाजे वीस-तीस हजार लोक अटेंड करतात. एवढय़ा मोठय़ा समुदायासमोर मला सादरीकरणाची संधी मिळाली. खूप काही शिकायला मिळालं. माझ्या कामाचं कौतुक होऊन आपुलकीनं पुढच्या करिअर प्लॅनिंगबद्दल विचारलं गेलं. कॉन्फरन्सनंतर फिरण्याची मुभा बॉसनं दिली होती. तेव्हा बुजरी असल्यानं फारशी फिरले नाही. त्यानंतर मला वॉशिंग्टन डीसी, डेन्व्हर आदी ठिकाणी ए.ए.सी.आर.च्या वार्षिक कॉन्फरन्सना जायला मिळालं. कोलोरॅडोच्या कॉन्फरन्सनंतर आम्ही स्कायडायव्हिंगला गेलो. मला खूप एक्सप्लोर करायला आवडतं, पण मी कधी स्कायडाव्हिंग वगैरे करेन, असं वाटलं नव्हतं. त्या एक्सायटिंग अनुभवाबद्दल आईबाबांना कळवल्यावर ते चाटच पडले.
घर आणि कामाचं व्यवधान सांभाळताना कधी तरी तारेवरची कसरत होते, पण माझा नवरा खूप सपोर्टिव्ह आहे. ऑफिसमध्ये बॉस आणि सहकारी समजूतदार आहेत. इथं लोकांना कामाच्या आणि कौटुंबिक वेळेचं फार महत्त्व आहे. ‘ए.ए.सी.आर.’चा वुमेन इन कॅन्सर रीसर्चचा पुरस्कार मिळणं, ही माझ्यासाठी फारच गौरवाची बाब होती. त्यांच्या वार्षिकोत्सवातल्या पुरस्कारांसाठी आपण अप्लाय करायचं असतं. साधारणपणं हजार अ‍ॅप्लिकेशन्सपैकी तेरा जणांची निवड केली जाते. या पुरस्कारासाठी निवड झाल्यावर अत्यानंद झाला आणि आपल्या कामाची योग्य दखल घेतली गेल्याचं समाधान वाटलं. जंगी सत्कार समारंभ होता तो. माझं सध्याचं काम स्किन कॅन्सर रीसर्चमध्ये चाललंय. मला मिळालेला पुरस्कार Kelly Gollat Memorial Fund for Melanoma Research  तर्फे होता. छोटय़ा गोलातचं नाव फाऊंडेशनला दिलं गेलंय, ती याच प्रकारच्या कॅन्सरनं गेली. मला तिच्या कुटुंबीयांना भेटता आलं. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांत माझ्या कामाविषयी खूप सारे आशेचे किरण दिसले. आपलं डोंगराएवढं दु:ख बाजूला सारून या कुटुंबानं सकारात्मकतेनं इतरांसाठी झटायचं ठरवलंय.. त्यामुळं मला संशोधनासाठी आणखीन प्रेरणा मिळालेय.. जबाबदारी वाढलेय.. करिअरच्या दृष्टीनं विचार करता फार्माबायोटेक इंडस्ट्रीमध्ये जायचा आणि सध्या काही र्वष अमेरिकेतच राहायचा विचार आहे. कॅन्सरचं संशोधनात्मक काम चालूच राहणार आहे.
(शब्दांकन : राधिका कुंटे )

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com