या बेटांच्या देशात नारळासारख्या पदार्थाचा जेवणात भरपूर वापर करतात. आपल्यासारखं इथलं जेवणही मसालेदार असतं. इथला फ्राईड राईस म्हणजे नासी गोऱ्यांग जगभर लोकप्रिय आहे. इंडोनेशियाच्या या ‘नॅशनल डिश’ विषयी..
इंडोनेशियाचा फ्राइड राइस (नासी गोऱ्यांग) किंवा फ्राइड नूडल्स (बामी गोऱ्यांग) जगभरात फारच लोकप्रिय आहे. २०११ मध्ये ‘सीएनएन’ने एक पब्लिक सव्‍‌र्हे केला होता, त्यामध्ये इंडोनेशियन फ्राइड नूडल्स/राइस ही दोन नंबरची सगळ्यात लोकप्रिय डिश ठरली होती. या ‘नासी गोऱ्यांग’चे अगणित प्रकार इंडोनेशियन बेटांच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला खायला मिळतील. इतका टेस्टी प्रकार आहे, हा आणि पोटभरीचा पण की, खाणाऱ्याचा दिल खूश होऊन जातो. म्हणूनच ही इंडोनेशियाची ‘नॅशनल डिश’ समजली जाते.  ही डिश जर पारंपरिक इंडोनेशियन पद्धतीने सव्‍‌र्ह करायची झाली, तर सोबत काकडीचे तुकडे किंवा सॅलड, सांबल (तिखट मिरचीचा सॉस) आणि क्रोपेक म्हणजेच प्रॉन्सच्या फ्लेवरचे पांढरे पापड (पोहय़ाच्या पापडासारखे दिसतात) सव्‍‌र्ह करतात. खरं तर या रेसिपीत ‘केजाप मानिस’ (स्वीट सोया सॉस) वापरतात. पण मी ही रेसिपी देताना आपल्याकडे सहज उपलब्ध असलेले घटक वापरलेले आहेत.
आपल्याला सगळय़ांनाच माहिती आहे, २००४ मध्ये इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे महाकाय सुनामी आली होती. या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड बेटांवर अपरिमित जीवितहानी झाली. लाखो लोक बेघर झाले. ही निसर्गिक आपत्तीची टांगती तलवार सतत ह्य़ा बेटांवरच्या रहिवाशांच्या डोक्यावर असते. जगातील सर्वात जास्त जिवंत ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये आहेत. या देशाला राजकीय अनिश्चितता आणि निसर्गाचा कोप या दोन्हीही गोष्टींना नेहमीच सामोरे जायला लागले आहे. पण अशाही परिस्थितीवर मात करण्याची असाधारण क्षमता इथल्या माणसांमध्ये आहे.
आपल्या देशामध्ये त्यामानाने निसर्ग खूप उदार आहे, खूप शांत आहे. सहज मिळालेल्या गोष्टी कधी कधी गृहीत धरल्या जातात. असो, आजचा इंडोनेशियन माणूस, मस्त-मौला, रांगडा आणि जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगणारा आहे. त्याला माझा सलाम !

इंडोनेशियन सलाड (गाडो गाडो)  
सलाड साहित्य : अंडी – तीन (उकडून, सोलून स्लाइस केलेले) (ऐच्छिक),  कोबी (चिरलेला) – पाऊण कप, फरसबी (चिरलेली) – पाऊण कप, गाजर (चिरलेले) – पाऊण कप, फ्लॉवर (चिरलेला) – पाऊण कप, मोड आलेले मूग – अर्धा कप, स्नो पीज – एकतृतीयांश कप, काकडी  (स्लाइस) – अर्धी, छोटे बटाटे – पाच ते सहा
पिनट ड्रेसिंग : नारळाचे  दूध – पाऊण ते एक कप, पीनट बटर – अर्धा कप, रेड करी पेस्ट किंवा चिली पेस्ट – १ टीस्पून (किंवा टबास्को सॉस), साखर – १ टेबलस्पून, लिंबाचा रस – १ टेबलस्पून, फिश सॉस – २ टी स्पून (हा नसल्यास  सोया सॉस – १ टेबलस्पून)
कृती : काकडी सोडून सर्व भाज्या धुवून घ्या. उकळत्या पाण्यात सर्व भाज्या टाकून थोडय़ा उकडून घ्या. नंतर थंड पाण्यात टाका. सर्व्हिंग डिशमध्ये भाज्या अरेंज करा. बाहेरच्या बाजूने सुरुवात करून आतपर्यंत लावून घ्या. कलरफुल पॅटर्नमध्ये भाज्या अरेंज करा. सर्वात वर स्लाइस केलेले अंडे ठेवा. ड्रेसिंगकरिता एका छोटय़ा सॉस पॅनमध्ये नारळाचे दूध उकळवून घ्या. उरलेले ड्रेसिंगचे साहित्य त्यात टाकून हलवून घ्या. ५ मिनिटे किंवा पिनट बटर वितळल्यानंतर मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजवा. सॅलडवर हे ड्रेसिंग घालून सव्‍‌र्ह करा.

नासी गोऱ्यांग (इंडोनेशियन फ्राइड राइस)
साहित्य : लांब दाण्याचा तांदूळ – दोन कप, अंडी – दोन, तिळाचं तेल – दोन टीस्पून, मीठ – अर्धा चमचा,  बोनलेस चिकन थाय (अर्धा इंचाचे तुकडे केलेले) – दोनशे ग्रॅम, कोळंबी – शंभर ग्रॅम, तेल – दोन टेबलस्पून, बारीक केलेले लसूण – दोन टेबलस्पून, बारीक केलेला कांदा – एक मध्यम, बारीक चिरलेले आलं – दोन टेबलस्पून, ड्राइड झिंग पेस्ट – एक टेबलस्पून (रेडीमेड मिळते), काळीमिरी पूड – अर्धा टीस्पून, चिली बिन सॉस – एक टेबलस्पून (चिली बिन पेस्ट रेडीमेड मिळते पण नसेलच तर आपली साधी चिली पेस्ट वापरा), ऑइस्टर सॉस – एक टेबलस्पून (ऐच्छिक), डार्क सोया सॉस, टोमॅटो केचप – एक टेबलस्पून.
गार्निशिंग करिता : कांदापात – ३ टेबलस्पून, कोथिंबीर बारीक चिरलेली – अर्धा कप
कृती : मीठ टाकून भात शिजवून घ्या आणि थंड करीत ठेवा. (डिश तयार करण्यापूर्वी दोन तास आधी भात तयार करा.) अंडी, तिळाचे तेल आणि मीठ एकत्र करा आणि बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात कांदा, आलं, ड्राइड झिंग पेस्ट, लसूण, काळीमिरी पूड घाला आणि दोन मिनिटे परतून घ्या. नंतर चिली बिन पेस्ट किंवा चिली पेस्ट टाका. नंतर त्यात चिकन आणि कोळंबी टाका आणि दोन मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात भात टाकून आणखी तीन मिनिटे परतून घ्या. आता त्यामध्ये ऑइस्टर सॉस, सोया सॉस आणि केचप टाका. आणि दोन मिनिटे परतून घ्या. सर्वात शेवटी एक पॅन गरम करून त्यामध्ये अंडय़ाचे मिश्रण टाका आणि मिनीटभर परतून पातळ ऑम्लेट तयार करून घ्या. सर्व्हिंग  प्लेटमध्ये तयार राइस, कांदापात, कोथिंबीर आणि ऑम्लेटचे स्लाइस, असं गाíनश करून गरमागरम सव्‍‌र्ह करा.
viva.loksatta@gmail.com