शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. आपला सध्याचा स्टॉपओव्हर आहे इंडोनेशिया. इंडोनेशियाच्या संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचाही प्रभाव आहे. तिथले काही सण हिंदू परंपरेप्रमाणे आहेत. पण साजरे करण्याची पद्धत मात्र अनोखी आहे. इंडोनेशियाची खाद्यसंस्कृती मात्र सर्वस्वी भिन्न आहे. कुत्रा, माकड, मांजर, उंदीर, साप असे प्राणीदेखील तिथल्या मार्केटमध्ये दिसतात.

इंडोनेशियात सध्या बहुसंख्य समाज मुस्लीम धर्मीय असला तरीही हिंदू संस्कृतीचाही या देशावर चांगलाच प्रभाव आहे. इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे जगभरात १ जानेवारीला न्यू इयरचा जल्लोष असतो. पण बालीमध्ये मात्र आपल्या हिंदू संस्कृतीशी जवळ जाणारा नववर्ष दिन दिसतो. आपल्या संस्कृतीप्रमाणं आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. त्या दिवशी गुढी उभारून आपण नववर्षांचं स्वागत करतो. बालीमधले हिंदू नवीन वर्ष वेगळ्या प्रकारे साजरे करतात. आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशीच त्यांचा ‘न्यायपी’ हा नववर्ष सण असतो. हा सण अत्यंत शांततेने घालवला जातो. आपल्या पूर्वजांची आठवण आणि चिंतन या दिवशी केलं जातं. या सणाच्या दिवशी बालीमध्ये पूर्ण शुकशुकाट असतो. अगदी टी.व्ही., रेडिओ पण बंद ठेवले जातात. मला वाटतं, येणाऱ्या वर्षांमधले उपक्रम, झालेल्या गोष्टी आणि करायच्या गोष्टी याचा शांतपणे विचार व्हावा हे कदाचित यामागचं कारण असावं. क्या बात है! मला वाटतं असा एखादा सण (किंवा तो सण साजरा करायची पद्धत) आपल्याकडे असायला हवा होता.
इंडोनेशिया हा बेटांचा प्रदेश असल्यामुळे सागराकाठची नसíगक संपत्ती या देशाला लाभली आहे. हे लक्षात घेता मासेमारी हा तिथला खूप मोठा व्यवसाय आहे, याचं नवल वाटायला नको. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलात तर थोडी काळजी घ्या बरं का, कारण इथल्या किनारपट्टीवर दीडशेहून अधिक शार्कच्या जाती राहतात! पण मला असं वाटतं, जोपर्यंत आपण त्यांच्या वाटेला जात नाही, तोपर्यंत हे प्राणी (खरं तर कुठलाच प्राणी) आपल्याला काही करत नाही. ते जाऊ द्या, पाय सांभाळा म्हणजे झालं!
इंडोनेशियामधली मला आवडलेली खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथले ‘कमोडो बेट’. या बेटांवर राहणारे ‘कमोडो ड्रॅगन’ (महाकाय सरडय़ाचाच प्रकार) इथलं विशेष. या एकेकाची लांबी दोन मीटर असू शकते. पूर्ण जगात फक्त इंडोनेशियात ही जात आढळते. इथल्या रेनफॉरेस्टमध्ये असंख्य प्रकारचे प्राणी आढळतात आणि ते प्राणी बऱ्याच ठिकाणी खाल्ले जातात. इंडोनेशियन मार्केटमध्ये कुत्रे, माकडं, उंदीर, मांजरी पायथन साप असे प्राणी विकण्यासाठी असतात. आपल्या खाद्यसंस्कृतीचा तो भाग नाही. म्हणून आपल्याला विचित्र वाटतं पण त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा तो एक भाग आहे.
viva.loksatta@gmail.com

चिकन रँडँग  
साहित्य : चिकन – सहा पीस, लाल कांदा – एक (बारीक केलेला), लसूण पाकळ्या – सहा (बारीक केलेल्या), आलं – दोन सेंमी, गवती चहा – दीड टेबलस्पून, हळद – दोन चिमूट, गालंगल (आल्याचा एक प्रकार आहे. हा नसल्यास नेहमीचे आले वापरावे) – तीन सेंमी, लाल मिरच्या – पाच, चिली पेस्ट – चार टेबलस्पून, भाजलेलं सुकं खोबरं पेस्ट – दोन टेबलस्पून, नारळाचे दूध – १ कप, हळदीची पाने – ३, साखर  -२ टेबलस्पून, मीठ चवीनुसार, तेल.
कृती : कढईमध्ये थोडे तेल टाकून चिली पेस्ट परतून घ्या. तेल वर येईपर्यंत परता. आता त्यामध्ये इतर सर्व साहित्य टाका. नारळाचे दूध घाला. साखर घाला. मिश्रण उकळायला लागल्यावर त्यात सुक्या खोबऱ्याची पेस्ट, हळदीची पानं आणि मीठ टाका. आवश्यकतेनुसार घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. भाताबरोबर सव्‍‌र्ह करा.

ओटक ओटक  (इंडोनेशियन फिश केक)
साहित्य : पांढरे मासे /बेकटी/ प्रॉम्प्रेट  – २५० ग्रॅम, नारळाचे दूध – एक तृतीयांश कप, कॉर्नफ्लॉवर – ४ टेबलस्पून, अंडे पांढरे बलक – एक, साखर – एक टीस्पून, चिरलेली कांदा पात – दोन टेबलस्पून, मीठ – दीड टीस्पून, सफेद मिरीपूड – अर्धा टीस्पून, केळीची पाने – धुऊन ४ बाय ६च्या आकारात कापून घ्या, भाजलेले शेंगदाणे – अर्धा कप, लाल मिरच्या – दोन ते तीन, मीठ – अर्धा टीस्पून, साखर – एक टेबलस्पून, लिंबाचा रस – दोन ते तीन टेबलस्पून (किंवा राइस व्हिनेगर)
कृती : मासे मिक्सरमधून फिरवून पेस्ट तयार करून एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यामध्ये नारळाचे दूध, कॉर्नफ्लॉवर, अंडय़ाचा सफेद भाग, साखर, कांदा पात, मीठ, मिरीपूड टाका आणि नीट मिक्स करा. केळीच्या पानावर मध्यभागी दोन टेबलस्पून मिश्रण ठेवा. आता पानाचा घट्ट रोल करा आणि दोन्ही टोकं टुथपीकने बंद करा. अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे रोल बनवून घ्या. प्रिहीट केलेल्या ग्रीलवर पंधरा मिनिटे शिजवून घ्या. हे रोल एका बाजूने झाले की उलटवून पुन्हा सहा मिनिटे शिजवा. (ओव्हन वापरल्यास दोनशे डिग्रीवर शिजवून घ्या.) हा केक स्पायसी शेंगदाणा सॉसबरोबर सव्‍‌र्ह केला जातो. या सॉससाठी भाजलेले शेंगदाणे आणि मिरची मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यामध्ये पाणी, साखर, लिंबाचा रस, मीठ टाकून एकत्र मिक्स करा आणि सॉसबरोबर गरम गरम केक सव्‍‌र्ह करा.

आजची  सजावट
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
कृती : गाजराचे पातळ स्लाइस कापून घ्या. आणि चित्रात दाखविल्याप्रमाणे वेगवेगळे कटर्स वापरून वेगवेगळी डिझाइन करू शकता. आणि गाíनशिंगसाठी वापरू शकता.