जाहिरात क्षेत्रात एखादी जाहिरात करताना स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून दाखवले जाते. आपण या क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करत ९० हून अधिक जाहिरातपट बनवले आहेत. पण अशा प्रकारे स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून दाखवण्यास आपला नेहमीच विरोध राहिला आहे. गोरेपणा किंवा बाह्य़ सौंदर्यामुळे स्त्रिया यशस्वी होतात, असे दाखवणे अत्यंत चूक आहे. आपल्याला स्वतला बाह्य़ सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य नेहमीच मोठे वाटत आले आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या अनेक जाहिराती आपण नाकारल्याही आहेत..
‘लोकसत्ता’ आयोजित ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात एका प्रश्नाचे उत्तर देताना दिग्दर्शिका गौरी शिंदेने हे मत व्यक्त केले आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये जमलेल्या सगळ्याच वयोगटांतील स्त्रियांनी टाळ्यांच्या कडकडाटात गौरीचे कौतुक केले.
‘व्हिवा लाऊंज’च्या सातव्या पर्वात मंगळवारी ‘व्हिवा’ची सेलिब्रिटी संपादिका सोनाली कुलकर्णी यांनी गौरी शिंदेची मुलाखत घेतली आणि ‘इंग्लिश विंग्लिश’सारख्या एका संवेदनशील चित्रपटाची दिग्दर्शिका ‘व्हिवा’च्या मैत्रिणींसमोर मोकळी झाली. या कार्यक्रमासाठी, गौरीला ऐकण्यासाठी आलेल्या विविध वयोगटांतील स्त्रियांनीही तिला अनेक प्रश्न विचारत तिच्याशी संवाद साधला. कार्यक्रमासाठी आलेल्या मध्यमवयीन स्त्रियांनी, ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि त्यातील शशी गोडबोले हे पात्र पाहून त्यांना आलेल्या अनुभवांचीही गौरीसोबत देवाणघेवाण केली.
पुण्यात लहानाच्या मोठया झालेल्या गौरीने आपले शिक्षण वाणिज्य शाखेतून पूर्ण केले. त्यानंतर तिचाही सरळधोपट मार्गाने नोकरी करण्याचा विचार होता. पण तिच्या वडिलांनी तिच्यातील कल्पकता आणि सृजनशीलता ओळखून तिला जाहिरात क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्याचा मार्ग सुचवला. त्यासाठी ती मुंबईत आली. त्यानंतर चित्रपट आणि जाहिरात निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी ती न्यूयॉर्कला गेली.
तिचे न्यूयॉर्कमधील दिवस, जाहिरात क्षेत्रातील दिवस, लहानपणापासून आईबरोबरच्या अनुभवांतून सुचलेली ‘इंग्लिश विंग्लिश’ची कथा, आर. बल्कीचा पाठिंबा अशा अनेक गोष्टींबद्दल गौरी भरभरून बोलली.कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणींनी आणि स्त्रियांनीही तिला अनेक प्रश्न विचारत, तिच्यावर कोडकौतुकांचा वर्षांव करत गौरीला विविध विषयांवर बोलते केले. ‘इंग्लिश विंग्लिश’साठी श्रीदेवीची निवड कशी आणि का केलीस’, अशा प्रश्नापासून ते ‘मराठीत चित्रपट कधी करणार’ या प्रश्नापर्यंत विविध प्रश्न गौरीला विचारण्यात आले.
 काहींनी तर तिच्यावर, तिच्या कर्तृत्त्वावर केलेल्या कविताही वाचून दाखवल्या. विशेष म्हणजे गौरीनेही एकही प्रश्न न टाळता खूपच मनमोकळेपणे या सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली.     

आर. बल्कीपेक्षा मी चांगली दिग्दर्शिका आहे, असे वक्तव्य माझ्या तोंडी एका दैनिकात छापून आले होते. पण मी असे कधीच बोलले नव्हते. माझ्या मनातही अशा प्रकारची तुलना येऊ शकत नाही. तो माझा स्वभावच नाही. बल्की काय, मी कोणाशीच माझी तुलना करू शकत नाही. प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या परीने मोठा असतो. प्रत्येकाचे वेगळेपण असते. त्यामुळे अशा प्रकारे तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही.
– गौरी शिंदे