6मोबाइलवर सगळ्यात जास्त मेसेजिंग अॅप्स वापरली जातात. इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सचा अर्थात चॅटिंग अॅप्लिकेशन्सचा वापर पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया चौपटीनं अधिक करतात, असं नेल्सननं केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झालंय. स्त्रियांची आवडती अॅप्स कोणती, मुली याचा किती खुबीनं वापर करतात, त्याविषयी सांगताहेत ‘ब्लॅकबेरी इंडिया’च्या एक संचालक.

मुलींचं न थकता अखंड गप्पा मारणं आणि शॉपिंग यावर नेहमीच विनोद होत असतात. आता तर आपल्या हातात स्मार्टफोन आलाय. त्यासोबत त्याची खूप सारी फीचर्स आली आहेत. शॉपिंगची सोय मोबाइलवरूनही झाली आहे. स्त्रियांच्या खर्चाबाबत मला काहीही टिप्पणी इथे करायची नाही, मात्र या खर्चात मोबाइल आणि स्मार्टफोन तंत्रज्ञानाने भर घातलीय हे निश्चित. स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत इन्स्टंट मेसेंजर अॅप्स अर्थात चॅटिंग अॅप्लिकेशन्स. इन्स्टंट मेसेजिंग या बहुआयामी अशा अॅप्लिकेशनचा वापर सगळ्यात जास्त स्त्रियाच करतात. त्याची अनेक वैशिष्टय़ं त्या खुबीनं वापरतात, असं एका पाहणीत दिसून आलंय. या मुलींच्या लाडक्या अॅप्सविषयी आणि त्यातल्या फीचर्सविषयी मी सांगणार आहे.
नेल्सनने केलेल्या एका पाहणीनुसार इन्स्टंट मेसेंजिंग अॅप्लिकेशन्सवर (चॅटिंग अॅप्स किंवा आयएम्स) महिला पुरुषांच्या तुलनेत चौपट अधिक वेळ खर्च करतात. ‘आयएम्स’मुळे महिलांना अधिक फायदा होताना दिसतो. प्रत्येक स्तरातील महिला वेगवेगळ्या कारणांसाठी या अनोख्या फीचर्सचा उपयोग करताना दिसतात.
१. स्क्रीन शेअरचा उपयोग – स्क्रीन शेअरसारखं वैशिष्टय़ विशेषत: संभाषणासाठी उपयुक्त साधन आहे. स्क्रीन्स शेअर करणे याचा अर्थ असा की आता परस्परांना तुमच्या फोनवर स्टोअर केलेले रेफरन्स पिक्चर्स, व्हिडीओ किंवा माहिती दाखवताना तुम्ही संभाषण करू शकता. कामावर जाणाऱ्या महिलांकरता प्रेझेन्टेशन, फाइल्स, स्लाइड शो शेअर करणं अत्यंत उपयुक्त आहे.

२. खासगी चॅट ग्रुप – इन्स्टंट मेसेंजिंगमधील सर्वसाधारणपणे आढळणारे मात्र लक्षवेधक वैशिष्टय़ म्हणजे समविचारी लोकांचा परस्परांशी संपर्क साधून प्रायव्हेट ग्रुप तयार करण्याची क्षमता. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे एकाच शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आयांचा ग्रुप. हे पालक चॅट ग्रुपच्या मदतीनं एकमेकांच्या संपर्कात असतात. यावर बुडलेला अभ्यास विचारण्यापासून आणि गृहपाठाचं वेळापत्रक तयार करण्यापासून वीकेण्डला गंमत म्हणून पार्टी आयोजित करण्यापर्यंत अनेक गोष्टी पालक ठरवताना दिसतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा ग्रुप तयार करता येतो. ज्यामध्ये शिक्षक तसंच पीटीए सभासदांना सामावून घेता येतं आणि पालकांना सखोल आणि अर्थपूर्ण पद्धतीनं एकूण शिक्षण व्यवस्थेविषयी चर्चा करता येते.

३. रिमोट शॉपिंग – हल्लीचं कुटुंब संपूर्ण जगभरात विखुरलेलं असतं. आपले आप्तजन लांब लांब राहत असतात. त्यांना वेळोवेळी भेटवस्तू पाठवणं किंवा त्यांच्याकरता खरेदी करणं खूपच कठीण होऊन जातं. पण ‘आयएम’वर पिक्चरच्या फाइल्स शेअर केल्याने ही समस्या हल्ली खूपच सोपी झाली आहे. अनेक स्त्रिया या फीचरचा वापर करतात. माझ्या ओळखीत एक नवीन लग्न झालेल्या मुलीने आपल्या आईला भाज्यांची चित्रं पाठवली आणि यातलं काय खरेदी करू, अशी विचारणा केली.

४. नेटवर्कबांधणी आणि प्रोफायिलगवर आधारित अॅप बेस – व्यावसायिक जगतात योग्य वेळी योग्य माणसं भेटणं कठीण आहे. नेटवर्क कनेक्टेड अॅप्स तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टशी जोडता येतात आणि त्यातल्या कोणी तरी वापरत असलेलं प्रत्येक अॅप त्यांचे िलक्ड इन प्रोफाइल पाहता येतं. म्हणजेच तुमच्याकरता महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींशी तुम्ही संपर्कात राहू शकता. तुमचा पर्सनल अॅप बेस वाढण्यासाठी हेच तंत्रज्ञान अवलंबण्यात येतं. उदाहरणार्थ तुमच्या मुलाचा वर्गमित्र जर बीबीएम कनेक्टेड अॅप वापरत असेल आणि त्याची शिकण्याकरता मदत असेल तर तुम्हीही ते वापरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते.

५. व्हॉइस आणि व्हिडीओ चॅट – व्हॉइस आणि व्हिडीओ चॅट ही आज सामान्य गोष्ट बनली आहे. पण परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता किंवा नोकरी करणाऱ्या विशेषत: मुलींकरता हे अॅप खास उपयुक्त आहे. असं माझं निरीक्षण सांगतं. नव्याने आई होणाऱ्या महिलांकरताही हे उपयुक्त साधन आहे. कारण येणाऱ्या जबाबदाऱ्यांनी वाढणारा तणाव आणि एकटेपणाची भावना यामुळे कमी होऊ शकते.
इन्स्टन्ट मेसेंजिंगमधल्या स्त्रियांशी निगडित अशा अनेक बाबी निरीक्षण केल्यास तुमच्याही लक्षात येतील. यातून अनेकींची आयुष्यं जोडली जातात. यातून कनेक्टिव्हिटी तर मिळतेच पण आपलेपणाची एक जाणीवही निर्माण होते. स्त्रिया या सुविधा वापरत असल्यामुळे त्यांच्या आधुनिक जीवनाचं संतुलनही साधलं जातं.
viva.loksatta@gmail.com

(अॅनी मॅथ्यू ‘ब्लॅकबेरी इंडिया’च्या ‘अलायन्सेस अॅण्ड बिझनेस डेव्हलपमेंट विभागा’च्या संचालक आहेत. )