सारं जगच या इंटरनेट नावाच्या जाळ्यात असं काही गुंतलं आहे, ‘के अब नेटसे बचना मुशकिल ही नही नामुमकिन है’. हातात स्मार्टफोन असणारी कुणी व्यक्ती कधी ‘मित्रा, वायफायचा पासवर्ड दे ना..’ म्हणेल सांगता येत नाही. ‘ए मला इथे ओपन वायफाय मिळतंय..’, ‘धत् तेरी, प्रोटेक्टेड आहे’.. असे संवाद कानावर पडले तर यात नवल काहीच नाही. हे कशाबद्दल चाललंय हे कळत नसेल तर मग मात्र नवलच, अशी परिस्थिती ! परीक्षेचा अभ्यास झाला नाही तरी नो टेन्शन पण, नेट पॅक संपला तर मात्र फसतात सगळीच इक्वेशन. अनेक सोशल साइट्सवर आपले सोशलाईट्स अगदी मनसोक्त सìफग करत असतानाच एक मेसेज येतो आणि झटका देऊन जातो. ‘युअर इंटरनेट पॅक इज एक्सपायर्ड’. बस्स्स्स्सस्स..या एका मेसेजने मोबाईल विश्वात काही वेळासाठी का असेना, पण शांतता पसरते. आम्ही ‘नेट’खुळे या इंटरनेटपॅकसाठी काय काय करू शकतो, याची झलक..

सोशल नेटवर्किंग साइट्सवर अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी धडपड सुरू असते ती नेट रिचार्ज करण्याची. अगदी पाच रुपयांपासून ते ३५०, ५००, १००० रुपयांपर्यंत प्रत्येकाच्या बजेटमध्ये येणारे नेट पॅक्स अनेक कंपन्या नेट युजर्ससाठी बाजारात आणत आहेत. सध्याचे हे जग डाऊनलोड, अपलोड, ब्राऊज, सब्सक्राइब, सर्च याशिवाय अपूर्णच आहे. प्रोफेशनल, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन आपला इंटरनेट नावाचा मित्र क्षणार्धातच करतो. इंटरनेटची अनेक ठिकाणी लागणारी गरज पाहता बऱ्याच कॉलेज, ऑफिस आणि प्रमुख ठिकाणी ‘वायफाय’ सव्‍‌र्हिस सुरू करण्यात आली आहे. काही महाविद्यालयांमध्ये या वायफायचा पासवर्ड मिळवण्यासाठी मग कुरापती, शकला लढवल्या जातात, कारण ‘ये तो नेट का सव्वाल है बॉस्स!’ पासवर्ड मिळाला तर चेहऱ्यावर काहीतरी मौल्यवान वस्तू मिळाल्याचे भाव, पण जर का पासवर्ड मिळाला नाही, तर मात्र सारेच हिरमुसतात राव! या ‘वायफाय’शी एकाच वेळी अनेकजण कनेक्ट होऊन बेसुमार नेट सर्फिगची मज्जा घेऊ शकतात. वायफाय नसेल तर मग ‘हॉटस्पॉट’ च्या नावाखाली कोणाकडून तरी नेट उधार घेण्याचा ट्रेंडही मित्रांच्या अड्डय़ावर पाहायला मिळत आहे.

नेटपॅक करण्यासाठी पॉकेटमनीतूनच पैसे वेगळे काढून त्या पैशांची जमवाजमव करताना अनेकांची तारांबळच उडते. नेटपॅक घेतानाही त्यात किती ‘केबी’, ‘एमबी’ची नेट सर्विस आहे, २ जी, ३ जी आणि आता तर ४ जी नेट सेवेचे पर्याय या साऱ्याची कसून चौकशी करूनच मग ही नेटखुळी मंडळी इंटरनेट पॅक विकत घेतात. शेजाऱ्यांच्या वायफायची रेंज मिळते म्हणून तासन्तास गॅलरीत बसून घालवणाऱ्या आणि मित्राकडे/ मैत्रिणीकडे वायफाय आहे म्हणून उगाचच कारणं शोधून त्यांच्या घरी जाणाऱ्या पात्रांची संख्यासुद्धा काही कमी नाही; तर हक्काने पासवर्ड मागणाऱ्या दोस्तांची मज्जाही काही वेगळीच. ‘तिचा’ किंवा ‘त्याचा’ मेसेज येणार असला आणि नेमकं त्याच वेळी नेट पॅकने हातावर तुरी दिली की मग, नशिबाच्या नावाने असंबद्ध बोंबा ठोकणाऱ्या मंडळीचा वेगळाच ‘नेटखुळा’अवतार बहुतेकांनी अनुभवला असेलच.

आता तर अनेक कंपन्यांनी इंटरनेट सेवा पुरवण्याच्या दरात हळुहळू वाढ करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे इंटरनेटशिवाय एक क्षणही न राहू शकणाऱ्यांसाठी ही एक वाईट बातमीच म्हणावी लागेल. इंटरनेट दरवाढीला पर्याय म्हणून काही कंपन्यांनी ‘फ्री नेट’ ही संकल्पना नव्याने सादर केली आहे, ज्याअंतर्गत काही ठरावीक अ‍ॅप्स, वेबसाइट्स अगदी मोफत वापरता येणार आहेत. त्यामुळे या फ्री अ‍ॅप्स व साइट्स कोणत्या हे जाणून घेण्यातही बरेचजण उत्सुक आहेत. आधुनिकतेच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी इंटरनेट नावाची एक सुंदर गोष्ट आपल्या हाती लागली, पण कालांतराने ‘आम्ही नेटखुळे’ असं म्हणत बहुसंख्य लोक याच इंटरनेटच्या इतके अधीन झाले की आता परतीची वाटही मिळणे अवघड झाले आहे.

सायली पाटील