एक ट्रेन, १२ ठिकाणं, १५ रोल मॉडेल्स, १५ दिवस, ४५० युवक- युवती, आठ हजार किलोमीटर.. एका शोधाचा व परिवर्तनाचा प्रवास… ‘जागृती यात्रा’ नामक या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी झालेल्या दोन तरुणांनी मांडलेली अनुभव गाथा.

उद्योजकता विकास या विषयात मी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करत आहे. आपले शैक्षणिक कौशल्य वापरून उद्योजकता विकसित करण्याची गरज आहे, हे सगळ्यांनाच कळते. परंतु कोणत्याही नवीन उद्योजकाला सहजासहजी यश मिळत नाही. कारण वाढती स्पर्धा, संसाधनांची कमतरता यामुळे उद्योजकतेकडे नवयुवक पाठ फिरवताना दिसतात. त्यामुळे भारतात उद्योजकता हा केवळ पिढीजात वारसा होऊन बसला आहे. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला उद्योग पुढे नेण्यासाठीच उद्योगक्षेत्रात तरुणांचा वावर दिसतोय, पण आपले कौशल्य वापरून एखाद्या नवीन युक्तीवर काम करून चाकोरीबाहेर जाऊन आजचे तरुण नवीन उद्योग उभारताना क्वचितच दिसत आहेत. उद्योजकतेचे ज्ञान कोठे मिळणार? उद्योजकतेचे कौशल्य कोठे विकसित होणार? शासनस्तरावर काही संस्था उद्योजकतेचे कागदोपत्री शिक्षण देतात, पण ती उद्योजकता प्रत्यक्षपणे कशी सुरू करायची याचे प्रॅक्टिकल शिक्षण मिळण्याची कुठेच सोय नाही. जागृती यात्रा या उपक्रमाच्या माध्यमातून असं शिक्षण मिळू शकतं, याची जाणीव मला झाली आणि या यात्रेत सहभागी व्हायची संधी मिळाली तेव्हा उद्योजकतेच्या अनेक शक्यता लक्षात आल्या, जाणिवा प्रगल्भ झाल्या आणि नवी दृष्टी मिळाली.

आपणही उद्योजक बनू शकतो हे समान स्वप्न पहाणारे ४५० ‘स्वप्नांचे सहोदर’, १५ दिवसात ८००० कि.मी.चा प्रवास रेल्वेने करून संपूर्ण भारतात फिरले. ‘उद्योजकतेतून भारताचे सक्षमीकरण’ हेच जागृती यात्रेचे ध्येयच आहे. भारताच्या महासत्तेचे स्वप्न पाहिलेल्या २० ते २७ वयोगटातील आम्ही ४५० प्रवासी देशभर फिरून सामाजिक उद्योजकता सुरू केलेल्या गावोगावच्या लोकांना भेटत होतो.

शेती, शिक्षण, जलसंवर्धन, ऊर्जानिर्मिती, आरोग्य, कारखानदारी, साहित्य-कला-क्रीडा, माहिती व तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात भारतात तयार झालेले मापदंड या यात्रेतून पाहायला मिळाले. त्यांचे काम प्रत्यक्ष पाहिले, त्यांना प्रश्न विचारले, संवाद साधला. जागृती यात्रेचा हा उपक्रम गेली पाच वर्ष सुरू आहे. या पाच वर्षांत अनेक यात्रींनी आपला स्वतचा नवीन उद्योग सुरू केला आहे. आजवरच्या जागृती यात्रेतल्या एकूण २५०० प्रवाशांमुळे ही यात्रा एक चळवळ म्हणून पुढे येत आहे.

मुंबईपासून सुरू झालेली ही यात्रा मुंबईत येऊन संपते. देशभरातून, कधी कधी परदेशातूनही यासाठी प्रवासी निवडले जातात. मी सहभागी झालेल्या यात्रेत आम्हाला पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तिथून धारवाडला शाळकरी मुलांना संगीतवाद्यांचे शिक्षण कसे मिळते ते आम्ही पाहिले, िभतीविना शाळा, गांधीजींची नई तालीम शिक्षण पद्धती पाहिली. बेंगलोरला कचरा व्यवस्थापनाचे धडे घेतले. मदुराईला लोकांच्या नेत्रदानाच्या चळवळीतून गरजूंना माफक दरात दृष्टी मिळवून देणारे अरिवद आय केअर पाहिले. आयआयटीतून शिक्षण घेऊन सेंद्रीय शेती करणारे माधवनजी चेन्नईत भेटले, जलव्यवस्थापन व आदर्श गाव तयार केलेले ओरिसातले ‘जो मडियथ’, वृक्षसंवर्धनासाठी काम करणारी पाटण्याची ‘तरूमित्र’ संस्था, दिल्लीला ‘गुंज’ संस्थेमार्फत गेल्या १५ वर्षांपासून जुने कपडे, पुस्तके इतर साहित्य जमा करून गरजूंना मोफत वाटणारे अंशु गुप्ता या सगळ्यांचंच कार्य प्रेरणादायी वाटलं. राजस्थानात ‘तिलोनिया’ या खेडय़ात महिलांना सक्षमीकरणासाठी सोलर पॅनल बनवण्याचे तंत्रज्ञान पाहिले. या यात्रेदरम्यान आम्हाला आयुष्यभरासाठीचे मैत्रदेखील सापडले. ४५० तरुण- मैत्रिणींशी स्नेह जडला.

जागृती यात्रेत सहभागी होण्यासाठी…

एका प्रश्नावलीची उत्तरे व अर्ज इंटरनेटद्वारे किंवा पोस्टाने इंग्रजी किंवा िहदी भाषेत पाठवू शकता. डिसेंबर २०१४ च्या यात्रेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यासाठी http://www.jagrutiyatra.com या वेबसाईटला भेट द्या. जागृती यात्रेसंदर्भातले व्हिडीओज यू टय़ूबवर उपलब्ध आहेत. तसेच यात्रेसाठी निवड झाल्यावर आíथकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पॉन्सरशिप मिळते, त्यामुळे प्रवेश सुलभ होतो.