vv11नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

४ फेब्रुवारी.. भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींचा म्हणजे आपल्या अण्णांचा ९३ वा जन्मदिवस. अण्णा हे नाव उच्चारताच माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो एखादा मोठा धबधबा किंवा धो धो कोसळणारा पाऊस. अण्णांचं गायन चालू असताना आपल्याला काहीच करावं लागत नाही.. बस्स डोळे मिटून त्या गाण्यापाशी आत्मसमर्पण करायचं! बाकी सगळं अण्णा करतात. आपल्याला चिंब भिजवतात, आपल्यावर धो धो कोसळतात, आपलं स्थल-काल-मितीचं भान हिरावून घेतात. ‘बाबुल मोरा’ किंवा ‘जो भजे हरि को सदा’ पूर्ण होऊन संपेपर्यंत आपण शुद्धीवरच नसतो येत.
भरदार आवाजाचा समानार्थी शब्द म्हणजे अण्णा. किती प्रचंड मेहनत आहे या आवाजामागे! नुसती आवाजाचीच नाही, तर अंगमेहनतसुद्धा! त्यांचा तो कमावलेला खर्ज, एक एक सूर प्रस्थापित करीत खुलत जाणारा रागविस्तार.. स्थिरता आणि चंचलतेचा अनोखा संगम. त्या श्रोत्यांना दमछाक करायला लावणाऱ्या एका श्वासातल्या लांब लांब ताना.. स्वत:च्या गळ्यावर इतका अधिकार गाजवणारा कलाकार पुन्हा होणं शक्यच नाही.
‘अण्णा’ प्ले लिस्टविषयी बोलायचं झालं तर एक प्ले लिस्ट एकटय़ा यमन रागाची करावी लागेल. इतकं अण्णांनी ‘यमन’वर आणि ‘यमन’ने अण्णांवर प्रेम केलं आहे. ‘एरी आली पियाबीन’ ही तीन-तालातली बंदिश तर प्रत्येक रेकॉìडगमध्ये वेगवेगळ्या लयीत आणि वेगवेगळ्या मूडमध्ये ऐकू येते.
यमनव्यतिरिक्त माझ्या फोन/ आयपॉडवर कायमचे असणारे अण्णांनी गायलेले राग म्हणजे – वृंदावनी सारंग, गौड सारंग. मधली एक दोन वर्षे तर मी रोज रात्री फक्त हीच कॅसेट ऐकायचो- एका साइडला वृंदावनी सारंगमधील ‘तुम रब तुम साहेब’(झपताल) आणि ‘जाऊ मैं तोपे बलिहारी’(तीन-ताल)
तर  दुसरीकडे गौड सारंगमधील ‘सया मनू दतडी’(एकताल) आणि ‘वेया नजर नहीं आवौन्दा वे’ (तीन-ताल). शिवाय मिया की तोडी, मिया-मल्हार, पूरिया धनाश्री, दरबारी कानडा, कौसी कानडासारखे भरजरी राग, दुर्गा, तिलक कामोद, शुद्ध सारंग, बसंतसारखे छोटे राग, हे घरी सतत लावल्या जाणाऱ्या रागांपकी.
भीमसेनजींना गावागावांतल्या, खेडय़ा-पाडय़ातल्या प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनवणारे अभंग ऐकत ऐकत, ते बसवत बसवत मी लहानाचा मोठा झालोय. पकी ‘राम रंगी रंगले’ आणि ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ हे अभंग मला वेगळीच धुंदी देतात. ‘कान्होबा’, ‘पंढरी निवासा’मधील आर्जव आपल्याला हळवे करून जाते, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘इंद्रायणी काठी’ ऐकताना या दोन महान संतांना निरोप देताना अण्णा खरोखरच तिथे उपस्थित आहेत, असा भास निर्माण होतो. विठ्ठलाऽऽऽ मायबापाऽऽऽच्या वेळी मन गहिवरल्याशिवाय राहत नाही. माझी खात्री आहे, आज हे तिघे तिकडे वरती रोज मैफिली रंगवत असतील.. आणि भीमसेनी आवाजात आपले अभंग ऐकून तुका आकाशा एवढा होत असेल आणि ज्ञानोबा म्हणत असेल, ‘ऐसा म्या देखिला निराकार वो माये..’
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com

हे  ऐकाच..
‘रसके भरे.. ’
vn06खरे तर भीमसेनजींनी गायलेले आणि तुम्ही फार न ऐकलेले असे काही क्वचितच सापडेल, पण जर ऐकले नसेल तर ‘राम श्याम गुणगान’ नक्की ऐका. खळेकाका, लतादीदी आणि अण्णा अशा त्रिवेणी संगमातून तयार झालेला हा फारच मधुर भक्तिगीतांचा अल्बम माझ्या सर्वात आवडत्या अल्बम्सपकी एक आहे. त्यातूनही दीदींनी गायलेलं ‘श्याम घन घन श्याम बरसों..’ आणि ‘बाजे मुरलिया’, ‘राम का गुण गान करिये’ ही डय़ुएट्स माझ्या खूपच आवडीची आहेत.
‘सखी मंद झाल्या तारका’ हे भावगीत बाबूजींच्या (सुधीर फडके) आवाजात तुम्ही ऐकलेलं असेलच, पण हेच गीत अण्णांनीसुद्धा (भीमसेन जोशी)आकाशवाणीसाठी गायलेलं आहे. अण्णांच्या आवाजात भावगीत ऐकायला काही औरच मजा येते! तसंच भीमसेनजी आणि वसंतरावांनी (देशपांडे) एकत्र गायलेली ‘रसके भरे तोरे नन’ ही ठुमरी चुकवू नये अशीच आहे. या दोघांनी ‘मुलतानी’मधील ‘ननन में आन् बान’ पण एकत्र गायली आहे म्हणे.. कोणाकडे असेल तर मला जरूर कळवा..