हेअर स्टायलिंग क्षेत्रातलं भारतातलं मोठं नाव म्हणजे जावेद हबीब. केसांबाबतचे समज- गैरसमज, भारतात वाढणारी हेअर केअर इंडस्ट्री आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांमध्ये झालेली वाढ याबाबत जावेद हबीब यांच्याशी साधलेल्या संवादाचा वृत्तांत

हेअर सलून्सचा विषय निघताच पहिल्यांदा कोणाचे नाव डोळ्यासमोर येत असेल तर, तो म्हणजे ‘जावेद हबीब’. आज भारताच्या कानाकोपऱ्यात हबीब यांची सलून्स आहेत. अगदी सेलिब्रिटींपासून ते सामान्य तरुण- तरुणींपर्यंत सगळ्यांनाच एकदा तरी जावेद हबीब यांचे हात आपल्या केसांना लागावेत अशी इच्छा असते. त्यांची जावेद हबीब अ‍ॅकॅडमी नुकतीच ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ब्युटी क्वॉलिफिकेशन्स’सोबत संलग्न झाली. त्यामुळे आता भारतामध्ये हेअर स्टायलिंग आणि हेअर केअर क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. त्यानिमित्ताने जावेद हबीब यांच्याशी झालेली बातचीत. केसांबाबतचे समज- गैरसमज, भारतात वाढणारी हेअर केअर इंडस्ट्री आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांमध्ये झालेली वाढ या सगळ्यावर हबीब यांनी या वेळी प्रकाश टाकला.
रोज केस धुण्याबद्दल
एक काळ होता, जेव्हा केसाच्या काळजीकडे जास्त लक्ष दिलं जायचं नाही. पण आताचा तरुण जागरूक झाला आहे. केस दररोज धुवावेत का, कशानं धुवावेत याबाबतीत मात्र अजूनही तरुणींच्या मनात गोंधळ दिसतो. जावेद त्याबाबतीत बोलताना म्हणाले, ‘‘आपल्याकडे केसांच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘रोज केस धुऊ नयेत.’ केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या श्ॉम्पूमध्ये रासायनिक द्रव्य असल्याकारणामुळे ते केसांना हानीकारक ठरू शकतील असा लोकांचा गैरसमज असतो. पण आपण रोज वापरत असलेल्या टूथपेस्ट, साबण यांमध्येसुद्धा रासायनिक द्रव्यं असतात, त्यामुळे आपण दात घासायचे किंवा आंघोळ करायचे टाळतो का? तसंच केस धुण्याबाबत आहे. पण केस धुण्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्यावी, केस धुण्याआधी तेल लावणे गरजेचे आहे. जर तेलमसाज न करता, रोज केस धुतले, तर ते ड्राय होणारच.’
हेअर कट नव्हे हेअर केअर पॅकेज
आज हेअर केअर इंडस्ट्री भारतातही मोठी होताना दिसते आहे. जावेद यांचं याबाबतचं निरीक्षण विचारलं असता ते म्हणाले, ‘‘आज हेअर सलून म्हणजे केवळ केस कापण्याचं ठिकाण राहिलेलं नसून ते कलर, केमिकल, स्टायलिंग आणि हेअर कट यांचं एक पॅकेज बनलं आहे. अर्थात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजही तुमचा हेअर कट आहे, हे खरं. कारण त्याशिवाय हेअर कलर आणि तुमचा लुक चांगला दिसणार नाही. एकूणच हेअर कटच्या ट्रेण्ड्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आता बॉलीवूडमधल्या तारेतारकांसारखा हेअर कट करण्याची प्रथा मागे पडली आहे. आज तरुणांना नक्की माहीत आहे की, त्यांना काय हवंय, आपल्यावर काय चांगलं दिसेल ते करण्याची त्यांची तयारी आहे, प्रयोग करण्याची तयारी तरुणाईमध्ये आहे. युरोप, अमेरिकेमध्ये काय चालू आहे, ते त्यांना माहिती आहे. जागतिक ट्रेण्ड्स ते फॉलो करतात. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय, त्यामुळे त्यांना तुम्ही मूर्ख बनवू शकत नाहीत.’’
केसांचं आरोग्य
केसांचं आरोग्य हे प्रामुख्यानं आहारावर अवलंबून असतं, असं सांगताना जावेद हबीब सांगतात, ‘‘आपलं शरीरच खरं तर आरोग्याचं निदर्शक आहे. काय आणि कसं खायला हवं, हे शरीरच सांगतं. तुम्ही रोज नॉन-व्हेज खात असाल किंवा इडली डोसा, जर ते तुमच्या शरीराला मानवत असेल तर जरूर खा. पण मानवत नसेल तर, रिअ‍ॅक्शनच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच दिसून येईलच. असं काही दिसलं नाही, तर आहार तुमच्यासाठी योग्यच आहे. फक्त ते पदार्थ कसे आणि किती खाता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तेलकट, तुपकट पदार्थ खाणं केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनंही चुकीचंच आहे.’’