निसर्गातील भटकंतीची आवड जाणीवपूर्वक जोपासणारी मुंबईची साहिला कुडाळकर रानावनांत कॅम्पिंग करत, प्राण्यांचा अभ्यास करत आपलं स्वप्न जगत आहे.. साहिलाच्या या अद्भुत प्रवासाविषयी..

वयाची २२ वष्रे ती घरापासून जेमतेम १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिकली. त्यानंतरचा प्रवास मात्र दुर्गम वाटेवरचा, विलक्षण साहसी आणि भन्नाट आहे. कॉन्झव्‍‌र्हेशन बायोलॉजीमध्ये अमेरिकी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणारी साहिला कुडाळकर गेले वर्षभर ईशान्य भारतातील जंगलांमध्ये कॅिम्पग करत आपल्या प्रोजेक्ट भाग म्हणून कृतक् प्राण्यांचा (ऱ्होडंट) म्हणजेच कुरतडणाऱ्या उंदीर, खार यांसारख्या प्राण्यांचा तपशीलवार अभ्यास करीत आहे. रानवाटा पालथ्या घालताना आपलं स्वप्न जगत आहे.

पाल्र्यात लहानाची मोठी झालेल्या साहिलाचं शालेय शिक्षण पाल्रे टिळक विद्यालयात झालं. साठय़े महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डी. जे. संघवी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरगची पदवी संपादन केली.

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर साहिलाने समुद्री कासवे आणि कोकणातील धोक्यात आलेल्या गिधाडांचे संवर्धन या विषयावर चिपळूण येथील सहय़ाद्री निसर्गमित्र या स्वयंसेवी संस्थेसोबत काम केले. साहिला आता स्टेट युनिव्हर्सटिी ऑफ न्यूयॉर्क येथे कॉन्झव्‍‌र्हेशन बायोलॉजी या विषयात ती पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. याच पदव्युत्तर शिक्षणातील फिल्डवर्क प्रोजेक्टचा भाग म्हणून ती गेले वर्षभर मेघालय आणि नागालॅण्डच्या परिसरात फोरेस्ट ऱ्होडंट्सचा माग काढत होती. दरम्यान, पश्चिम घाट आणि राजस्थान येथे बेडूक, वन्य रोग, मानव आणि वन्यजीव यांतील संघर्ष अशा वेगवेगळ्या विषयांवरही तिने स्वयंसेवी प्रकल्प कामेही केली आहेत. आपल्या या वेगळ्या वाटेवरच्या करिअरमध्ये मार्गक्रमण करताना आई-बाबांची साथ नेहमीच लाभली, हे साहिला कृतज्ञतापूर्वक नमूद करते.
साहिला सांगते, ‘सतराव्या वर्षी मार्गदर्शक पार्थ बापट आणि दीप्ती बापट यांच्यासोबत मी ताडोबा राष्ट्रीय उद्यानात सहलीसाठी गेले होते, ते दिवस खरोखरीच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. ताडोबाहून परतले तेव्हा जणू मी माझ्यासोबत त्या जंगलाचा तुकडाही घेऊन आले होते. परतल्यानंतरही तिथल्या आठवणी सतत जाग्या असायच्या. तिथे एका दुपारी भिरभिरणारी शेकडो निळ्या रंगाची सेरुलियन फुलपाखरं पाहण्यासाठी घोटय़ापर्यंतच्या चिखलात उभे होते, त्या मऊ चिखलाचा स्पर्श आठवत राहायचा किंवा टॉर्चच्या उजेडात ४० ठिपकेदार हरिणांचे लकाकणारे डोळे पाहून जणू पृथ्वीवर तेजस्वी तारे उतरल्याचा झालेला भास मला विसरू म्हणता विसरता येत नव्हता. नाजूकशा गवतांच्या पात्यावर पहाटेच्या दविबदूंसोबत पहुडलेले माणकांसारखे लाल मुनिया पक्षी सतत आठवायचे. नंतर पार्थसरांनी मला मुंबईच्या पक्ष्यांची माहिती देणारे एक पुस्तक दिले आणि मला पक्षी निरीक्षणाचा छंद जडला.. त्यानंतर एकेक गोष्टी घडत गेल्या. लहानपणी कधी मातीलाही स्पर्श न केलेली मी आता कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या विष्ठेची चिकित्सा करते, याचे माझे मलाच नवल वाटते.’
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतानाही साहिलाचे पॅशन सतत तिच्यासोबत राहिले. दरम्यान, तिने ‘स्प्राऊटस्’ या स्वयंसेवी संस्थेसोबत शहरी जैवविविधतेविषयक प्रकल्प केला तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतून पक्षिविद्या विषयीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून तामिळनाडू येथील पॉइंट कॅलिमेयर येथील बर्ड मायग्रेशन सेंटर येथे एक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. तिथे तिने पहिल्यांदा प्लोव्हर या पक्ष्याला हाताळले. त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर परिसरात तिने तिचे पक्षिनिरीक्षण सुरू ठेवले. साहिलाला स्थानिक लोकांसमवेत काम करीत तिथल्या वन्यजीव संरक्षणात स्वारस्य होते. वेळास येथे भाऊ काटदरे यांच्यासमवेत समुद्री कासवांच्या संवर्धनाचे काम तिने मन लावून केले.
साहिलाच्या मते, वन्यजीव शास्त्रातील मोठे आव्हान म्हणजे जैवविविधतेविषयीच्या धोरणामध्ये वन्यजीवशास्त्राचा उपयोग कमी होतो आणि अर्थशास्त्राला अधिक महत्त्व दिलं जातं. ही गोष्ट या क्षेत्रात काम करणाऱ्यांची निराशा करते. त्यासोबतच या क्षेत्रात असंतुलितरीत्या केले जाणारे निधीचे वाटप या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नाउमेद करते. ती म्हणाली, ‘आजही वाघ आणि हत्तीसारख्या मोठय़ा सस्तन प्राण्यांविषयीच्या संशोधनाला निधीच्या वाटपात झुकते माप मिळते, मात्र उंदीर, बेडूक, वटवाघूळ, साप यांसारखे प्राणी आजही वन्यजीव निधीच्या व्याख्येत अद्यापही दुर्लक्षितच राहिले आहेत.

मुलगी म्हणून या क्षेत्रात काम करताना आपल्याला वैयक्तिकरीत्या कुठलाच विचित्र, वाईट अनुभव आलेला नाही, असे साहिलाने सांगितले. ती म्हणाली, ‘मी स्थानिक लोकांसोबत काम करते. तिथे मला अत्यंत आदरयुक्त वागणूक मिळते. फक्त कॅिम्पग करताना मुलगी म्हणून अडचणी येतात. मी एकमेव मुलगी असल्याने प्रातर्वधिीसाठी मला फार दूर जावे लागते. या कॅम्पसाइटच्या परिसरात बिबळ्याचा वावर असल्याने मला नेहमी भीती असते, उकिडव्या बसलेल्या मला एखादा बिबळ्या चवदार हरीण तर समजणार नाही ना?’
गेले वर्षभर ती ईशान्य भारतातील अत्यंत सुंदर जंगलांमध्ये होती. तिच्या पदव्युत्तर अभ्यास प्रकल्पाचा भाग म्हणून साहिला कुरतडणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करीत आहे. कॅिम्पगच्या काही अविस्मरणीय आठवणी साहिलाने सांगितल्या. ती सांगत होती, ‘अभ्यासाकरिता आम्ही जंगलात १० दिवसांकरिता कॅिम्पग केले होते. मेघालय आणि नागालॅण्डच्या ज्या भागात मी काम करत होते, तिथे वाघ नव्हते, पण स्थानिकांना हत्तींची भीती वाटायची. बालपाक्रम नॅशनल पार्कमध्ये आम्ही कोरडय़ा पडलेल्या ओढय़ात कॅिम्पग करीत होतो, त्या वेळेस एका रात्री साडेनऊच्या सुमारास मोठा आवाज झाला. वनरक्षक घाबरलेल्या नजरेने थरथरत म्हणाला, ‘हाथी’! आमच्या १० किमीच्या परिसरात पाण्याचा कुठलाही स्रोत नव्हता आणि या तहानलेल्या हत्तीने आमच्या कॅम्पसाइटवरच थेट हल्लाबोल केला होता. सुदैवाने तो वनरक्षक अनुभवी होता. त्याने मोठमोठय़ाने आवाज करून हत्तीला घाबरवत हुसकावून लावले. हत्ती गेला, पण त्या रात्री झोप काही आली नाही.
तिथे सकाळी आम्हाला हुलॉक गिबन्स या माकडाच्या हू रू हू रू या लयीतल्या आवाजाने जाग यायची. कुठल्याशा अमॅझोनियन वंशाचे आदिवासींच्या उत्सवातील जल्लोशासारखा तो आवाज रानभर पसरला जायचा. कॅिम्पगचा माझा सर्वात छान अनुभव हा महादेव नदीच्या किनाऱ्यावरील सोनेरी वाळूतील कॅम्पचा आहे. तिथलं नदीचं रुंद पात्र आणि निळेशार पाणी अजूनही आठवणीत रुंजी घालतं. एका दुपारी मी माझ्या तंबूत लिहीत बसले होते. मी वर पाहिलं तर माझ्याकडेच रोखून पाहणारी खेकडे खाणारी मुंगसाची जोडी मला दिसली. मी या नदीकिनारी गेले दोन महिने त्यांच्या विष्ठेची चिकित्सा करीत होते, पण एकही मुंगूस माझ्या नजरेस पडले नव्हते. आणि आता चक्क मुंगसांची जोडी माझ्याकडेच रोखून बघत होती. अशीच घटना नाँगखीलम राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्यात घडली, जिथे मला पिवळ्या मानेचे मार्टेन दिसले, मात्र या वेळेस त्याची छबी टिपण्यासाठी मी माझा कॅमेरा तयार ठेवला होता.
ईशान्य भारतात सामूहिक आंघोळ करण्याची ठिकाणे आहेत. जिथे पुरुष आणि स्त्रियाही उघडय़ावर अंघोळ करतात. स्त्रिया त्यांच्या देहाभोवती गन्ना म्हणजेच मोठा टॉवेल पांघरून आंघोळ करीत. ही रीत आणि बर्फासारखे थंड पाणी यामुळे जवळपास माझी अंघोळच बंद झाली होती. एकदा तर सलग १० दिवस मी अंघोळीशिवाय राहिले होते.
माझ्या तिथल्या वास्तव्यादरम्यान किती तरी अद्भुत घटनांची साक्षीदार ठरले- सहसा नजरेस न पडणाऱ्या क्लाऊडेड लेपर्डने मला दर्शन दिले, नानेटीसारख्या सापाने आमच्या डॉम्रेटरीच्या स्वयंपाकघराला भेट दिली होती, दलदलीत चालताना हत्ती दिसला आणि त्याने पाहू नये म्हणून तिथून पळालो. सगळ्यात वेदनादायी घटना म्हणजे मेघालयातील नाँगखीलममध्ये आम्ही कॅिम्पग करत असताना माझ्या कानात गोचीड शिरली आणि तिथेच अडकून राहिली. तिथले काम माझ्या साहाय्यकाकडे सोपवून मला शिलाँगला एकटीने जावे लागले आणि कानात अडकून पडलेल्या गोचडीला बाहेर काढण्यासाठी अ‍ॅनेस्थिशियाची तीन इंजेक्शने घ्यावी लागली होती. एकदा वायनाडच्या केरळ येथील अभयारण्यात बेडकांमधील संसर्गाचा अभ्यास करताना रानातील खुल्या जागेच्या मध्यभागी उभं असताना सुरक्षारक्षक अचानक ओरडला- ‘टायगर!’ मी त्या दिशेने पाहिलं. एक लालसर आकृती माझ्याच दिशेने येत होती. माझी अंत:प्रेरणा मला सांगत होती- ‘पळ.’ पण मी तिथेच उभी राहिले. ती आकृती जवळ आली. तो एक जंगली कुत्रा होता. जंगली कुत्रे हे माणसांच्या बाबतीत बुजरे असतात. नंतर तो कुत्रा वळला आणि जंगलात पसार झाला.. ’
साहिलाला आपल्या देशात जंगलाच्या आसपास राहणाऱ्या स्थानिक लोकसमूहांसोबत काम करायचं आहे आणि वन्यजीवन आणि मानव एकत्र शांततेने कसे नांदू शकतील याविषयी दीर्घकालीन उपाय योजायचे आहेत. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा किती पॅशनेटली करावा लागतो, हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारी साहिला कुडाळकर वेगळं काही तरी करू इच्छिणाऱ्या युवावर्गाचा आयकॉन आहे.

तुम्हाला ठाऊक आहे का, की पश्चिम घाटातील काही बेडूक हे बेडूकमासा (टॅडपोल) हा स्थित्यंतराचा टप्पा न घेताच थेट लहान बेडकांना जन्म देतात! वाघ आणि हत्तींच्या पलीकडेही संशोधन करावे, असे बरेच काम शिल्लक आहे.

suchita.deshpande@expressindia.com