‘जर माझ्यासारखी गोलमटोल पंजाबी कुडी, जिला मटण, बिर्याणी खायला अतिशय आवडते, ती आता तेवढय़ाच चवीने दुधीची भाजी खाऊन २६ इंच कंबर करून दाखवीत असेल तर तुम्हालासुद्धा काहीच अशक्य नाही..’, सांगतेय ‘साइज झीरो’ची किमया साधणारी प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर. करीनानं लिहिलेल्या ‘फॅशन गाइड’ या आगामी पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश.
माझ्यासाठी साइज झीरो हा फक्त करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा कधीच नव्हता, तर त्याहून खूप जास्त काही होते. त्यामुळे मी स्वत:चा आदर करायला शिकले. माझ्या शरीराचा आदर करायला शिकले. एका अर्थी माझे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. माझा आहार, व्यायाम व आरोग्य याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. मी जास्त आनंदी, आशावादी झाले. आता मी माझ्या शरीराबद्दल परत कधीच निष्काळजी, अविचारी होणार नाही.
अतिशय काटेकोर डाएट पाळताना माझे वजनच फक्त कमी झाले असे नाही, तर एक निरोगी व सुंदर आयुष्य कसे जगावे, हे शिकायला मिळाले.
पूर्वी मी जरा कचरतच जे समोर येईल ते डाएट करीत होते. त्यातील सर्व गोष्टी वैद्यकीय चौकटीत आखून दिलेल्या (पण अवघड) असायच्या. विश्वास ठेवा, जर कोणी आजही मला बारीक होणे आणि आनंदी असणे या दोन्हीपकी एक पर्याय निवडायला सांगितले तर मी नक्कीच पूर्वीसारखी गोबऱ्या गालांची आनंदी मुलगी राहणे पसंत करीन.
मी एक छान फिगर मिळवण्यासाठी डाएट, व्यायाम यासारखे खूपच प्रयत्न केले, पण जर त्याची किंमत माझे छान, साधे आयुष्य मोजून द्यावी लागणार असेल तर ते मी नक्कीच एका क्षणात सोडून देऊ शकते.
चांगल्या खाण्याबद्दलचा सर्वात मोठा गरसमज म्हणजे जे आवडते ते सर्व खाणे सोडून द्यायचे. चूक!
ऋजुता (दिवेकर)ने मला समजावून सांगितले की, मला माझे आवडते पराठे, पनीर, चीज काहीही सोडण्याची आवश्यकता नाही! उलट तिने मला सतत खाण्याची परवानगी दिली. फक्त योग्य वेळी आणि योग्य तेवढेच.
विचारपूर्वक समतोल राखून खाण्याची कला हीच तर उत्तम आहार नियोजनाची गुरुकिल्ली आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वत:ची उपासमार अजिबात करू नका किंवा कोणत्या तरी फॅड डाएटला बळी पडू नका. त्यापेक्षा स्वत:ला खालील प्रश्न विचारा :
* मी काय खाऊ शकते?
* केव्हा खाऊ शकते?
* किती वेळाच्या अंतराने खाऊ शकते?
* माझ्यासाठी किती प्रमाणात खाणे योग्य ठरेल?
एकदा तुम्ही स्वत:लाच हे प्रश्न विचारायला सुरुवात केलात की, मग स्वत:चे शरीर व आहार याबद्दल जाणून घ्यायला सुरुवात करा. अर्थात हे सर्व करताना तुमचा खाण्या-पिण्याचा आनंद हिरावला जाणार नाही याकडे लक्ष असू द्या.
ऋजुतामुळेच तर मला स्वत:च्या आहाराबद्दल समजावून घेण्याबरोबरच चवीने खाणेसुद्धा किती महत्त्वाचे आहे हे समजले. सुरुवातीपासून एक गोष्ट नक्की होती की, मला सर्वसामान्य माणूस म्हणून जगायचे आहे, म्हणूनच काही ठरावीक गोष्टींमध्ये तडजोड करण्यास मी पूर्णपणे नकार दिला. जसे सकाळी उठल्यावर मस्तपकी गरम चहाचा कप. त्याशिवाय मी सरळ कोणता विचारच करू शकत नाही.
डाएट करणे म्हणजे उपाशी राहणे नाही, तर स्वत:च्याच गरजा, आहार समजावून घेऊन पोषण व आरोग्याचे मूलभूत नियम विचारात घेऊन स्वत:च्या आहाराचे नियोजन करणे.
माझ्या आरोग्याची व आनंदी असण्याची गुरुकिल्ली म्हणजे योग्य प्रमाणात सर्व खाणे आणि वजनाच्या काटय़ाला बाहेरचा रस्ता दाखवणे. रोज सकाळी उठल्यावर मला वजनाच्या काटय़ावर उभे राहायला आवडत नाही. तो कोण ठरवणार तुम्ही फिट आहात की फॅट. ते तुमचे तुम्हीच ठरवले पाहिजे. जेव्हा आरशात पाहिल्यावर तुम्हाला सर्व बाजूंनी पोटाभोवती वळ्या दिसतील किंवा हाशहुश न करता एका दमात तुम्ही तीन मजलेसुद्धा चढू शकणार नाहीत किंवा तुमच्या आवडत्या जीन्समध्ये तुम्ही आता मावत नसाल, तर अशा वेळीच तर तुम्हाला फिट होण्याची प्रेरणा मिळते.
जेव्हा तुम्ही तुमच्या दिसण्याबद्दल दु:खी होता तेव्हाच तुम्ही ते बदलण्याची जबाबदारीसुद्धा स्वीकारता. सुडौल किंवा आरोग्यसंपन्न असणे असे पर्याय कधीच नसावेत. जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदात घालवायचे असेल, तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असावे, कोणत्याही कपडय़ांमध्ये तुम्ही छान दिसावे असे वाटत असेल, तर तुम्ही सुडौल असायलाच हवे! पण सुडौल असणे याचा अर्थ तुम्ही आयुष्यातल्या सर्व आनंदांकडे पाठ फिरवून कंटाळवाणे व्हायला हवे, असे नाही. तुमच्याजवळ फक्त झालेल्या चुका सुधारण्याची चिकाटी आणि सर्व गोष्टींमध्ये समतोल साधण्याची कला असली पाहिजे. जर माझ्यासारखी गोलमटोल पंजाबी कुडी, जिला मटण, बिर्याणी खायला अतिशय आवडते, ती आता तेवढय़ाच चवीने दुधीची भाजी खाऊन २६ इंच कंबर करून दाखवीत असेल तर तुम्हालासुद्धा काहीच अशक्य नाही.
आता मी माझ्या ‘साइज झीरो’ फेजपासून कधीच दूर गेले आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना मी त्याबद्दल जरूर सांगेन. पण तुम्ही कोणत्या तरी चांगल्या आहारतज्ज्ञाला भेटणे महत्त्वाचे आहे. शेवटी तुमचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य शास्त्रोक्त पद्धतीने वजन कमी करणेच योग्य ठरेल. त्यासाठी उपाशी राहणे हा उपाय नाही. योग्य आहार, व्यायाम आणि मनाचा निग्रह याचबरोबर सातत्य तुमच्याजवळ असेल तर तुमच्या मनाप्रमाणे वजन कमी करू शकता आणि हवा तसा साइज मिळवू शकता मग तो ० असेल किंवा १२. शेवटी आपली फिगर आपल्या हातात असते.
(अमेय प्रकाशनाच्या ‘फॅशन गाइड’ या करीना कपूर आणि रोशेल पिंटो लिखित आणि अश्विनी लाटकर अनुवादित आगामी पुस्तकातून साभार)