चला, आता ऐतिहासिक पराक्रम घडवूया असं म्हणून यशोशिखर गाठता येत नाही. नकारात्मक वावटळींमधून वाट काढतच मजल दरमजल करावी लागते. सर्व आघाडय़ांवर निगेटिव्हिटीचे झेंडे उभारलेले असतानाही लिस्टर सिटी फुटबॉल संघाने प्रवासाला सुरुवात केली. कासव होऊन मात्र त्याच वेळी सभोवतालच्या सशांना मान देऊन केलेला हा प्रवास आता दंतकथा सदरात जमा झाला आहे. अचंबित करणाऱ्या आणि व्हायरल झालेली लिस्टर सिटीची दंतकथा तुमच्यासाठी!
आपण जगत असतो. अडथळे, अडचणी येत राहतात. आपण संघर्ष करत राहतो. खाचखळग्यांच्या या प्रवासात पैसा मिळाला तर गोष्टी सोप्या होतात. सन्मान मिळाला तर समाधान वाटते. ओळख मिळाली तर अभिमान वाटतो आणि यश मिळालं तर मग भारीच एकदम. हे सगळं आटपाट नगरी चित्र उलटे केले तर.. पैसाही बेतास बेत, सन्मान सोडा लोक हिंग लावून विचारत नाहीत. ओळख जाऊ द्या अनुल्लेखानेच हाणतात लोक आणि यश तर दूरदूपर्यंत दिसत नाहीये. बरं समजा हे काही नाही पण लोकांना विश्वास वाटतोय का? छे. संबंधच नाही. यश मिळवू शकतील अशा लोकांच्या संभाव्य यादीच्याही खिजगणतीत नाही. म्हणजे एकुणात अस्तित्वाला काही अर्थच नाही. एकदम ‘लो’ वगैरे वाटावं अशी परिस्थिती.. बरं हे कधीपासून नशिबी आहे- प्राचीन काळापासून. विमनस्क करणाऱ्या नकारात्मकतेतून साकारलेय एक विलक्षण आणि अद्भुत यशोकहाणी. कॉर्पोरेट लेक्चर्स, मॅनेजमेंट पंडित, स्पिरीच्युअल गुरू यांना आयता डेमो देणारी ही अविश्वसनीय कहाणी आहे लिस्टर सिटीच्या यशाची. बरं यासाठी तुम्हाला फुटबॉल समजण्याची गरज नाही. पेनल्टी किक, हेडर, ऑफसाइड, शूटआऊट असे तांत्रिक जुगाड कळण्याची आवश्यकता नाही. व्हायरल झालेली कहाणी खेळाची असली तरी कोअर एलिमेंट मानवी वृत्ती आणि प्रयत्नांत आहे.
इंग्लिश प्रीमिअर लीग ही क्लब बेस्ड फुटबॉल स्पर्धा म्हणजे कोटीच्या कोटी उड्डाणे. आपल्या आयपीएलचं मूळ रूप परंतु पारदर्शक कामकाज असलेलं. हंगाम सुरू होतो ऑगस्टमध्ये आणि संपतो साधारण मे महिन्याच्या अखेरीस. २० संघ असतात. साधारणत: वीकेंडला मॅचेस होतात. प्रत्येक संघाला ३८ मॅचेस खेळायच्या असतात. लीगच्या टेलिव्हिजन राइट्समधून दरवर्षी २.२ अब्ज युरो एवढी प्रचंड रक्कम जनरेट होते. संघांना १.६ अब्ज युरो मिळतात सगळे हिशोब केल्यानंतर. प्रत्येक संघ म्हणजे एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीसारखा. चांगलं खेळलात तर वरच्या गटात प्रमोशन, खराब खेळलात तर खालच्या गटात गच्छंती असं परफॉर्म ऑर पेरीश हे सूत्र. १९९२ सालापासून जेतेपदावर पाच संघांची मक्तेदारी. अशा या पसाऱ्यात लिस्टर सिटी संघाचं स्थान किडुकमिडुकच्याही खालचं. स्पर्धेत त्यांच्या असण्यानसण्याची मोठय़ा संघांना जराही पडलेली नाही. १८८४ मध्ये स्थापना झालेल्या क्लबकडे कोणी दखल घ्यावी असं जेतेपद नाही. ताफ्यात प्लेयर्स असे की बाकी संघांनी नको आम्हाला म्हणून सोडून दिलेले. टॉपचे संघ एका खेळाडूसाठी जेवढी किंमत मोजतात तेवढय़ा खर्चात लिस्टर सिटीची अख्खी टीम मॅनेज झालेली. मॅनेजर असा की आधीच्या १२ पैकी ७ टीम्सनी कामावरून कमी करण्यात आलेला. गेल्या वर्षी हंगाम सुरू झाला तेव्हा सट्टेबाजांनी लिस्टरला ५०००-१ अशी किंमत दिलेली. म्हणजे यांना टायटल जिंकणं शक्यच नाही असा हा भाव. तुम्ही सांगा काय पॉझिटिव्ह घेणार या इक्वेशनमधून. पण अशक्य ते घडतं आणि मानवी प्रयत्नांना मर्यादा असतात या समजाला उलथावून टाकत उभी राहते दंतकथा. हरघडी नाडलं जाणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्यांना मिळते जगण्यासाठी रसरशीत प्रेरणा.
क्लबची मालकी थायलंडच्या विचाई श्रीवधनप्रभा या उद्योजकाकडे. क्लबच्या सीईओ सुसान व्हेलन आर्यलडच्या. मॅनेजर क्लॉडिओ रानिइरी इटलीचे. प्लेयर्स आणखी कुठकुठचे. विविधतेचे प्रतीक असलेल्या लिस्टर सिटीने चमत्कृतीपूर्ण वेगळं असं काही केलं नाही.
आहे तेच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये जमवू आपण असं क्लॉडिओंनी ठरवलं. या निर्णयामुळे सेक्युरिटी आणि स्टॅबिलिटी मिळाली सगळ्यांनाच. स्टारडमवालं कोणी नको हे त्यांचं एथिक पक्कं होतं.
खेळाची बेसिक स्किल्स त्यांनी घोटून घेतली. आम्ही जेतेपद पटकावूच असे बढायाखोर इंटरव्ह्य़ू लिस्टरच्या कोणीही हंगामात एकदाही दिले नाहीत. डेटा अ‍ॅनॅलेटिक्स हे खेळातले टेक्नो तंत्र खेळाडूंवर बिंबवले. अपोझिशन टीम, त्यांची स्ट्रेंथ, वीकनेस, आपल्याविरुद्ध अपोझिशन रचू शकतील असे संभाव्य डावपेच, आपली ताकद, हवी असलेली सुधारणा, आकडेवारी या सगळ्याद्वारे खेळाडूंना सर्वबाजूंनी परिपक्व केलं. मॅच जिंकल्यानंतर लिस्टर सिटीचं सेलिब्रेशन फक्त अर्धा तास चाले. मोठे संघ आपल्याला केव्हाही भिरकावून देऊ शकतात. या जाणिवेतून क्लॉडिओ यांनी कोणालाही कॅरिड अवे होऊ दिलं नाही. जगभरातल्या लीग्समध्ये खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून महागडय़ा ब्रँडेड वस्तूंची पखरण केली जाते. क्लॉडिओ यांनी हा फॉरमॅटच बदलला. अपोझिशनला तुम्ही गोल करू दिला नाहीत तर पिझ्झा पार्टी हे प्रोत्साहन. चंगळवादी शो ऑफवाल्या जगापासून दूर असल्याने लिस्टरच्या खेळाडूंना हा पिझ्झाही इन्स्पिरेशन ठरत असे. साध्याशा हॉटेलात आपल्या नातवंडांना स्वखर्चाने पिझ्झा खाऊ घालणारे वडीलधारे व्यक्तिमत्त्व असं या पार्टीचं स्वरूप असे. अनुशासन और परंपरा जपणारे क्लॉडिओ कर्मठ आहेत, पण दुसरीकडे खेळाडूंचे मित्र होऊन त्यांना खेळापल्याडही मार्गदर्शन करणारे मेन्टॉर आहेत. साधेपणा म्हणजे गरिबी असा गैरसमज झालेल्यांना, पैसा फेकून काहीही मिळतं अशी धारणा झालेल्या, प्रतिस्पध्र्याना तुच्छ लेखण्याची मानसिकता जपणाऱ्या सगळ्यांनाच लिस्टर सिटीने पटकावलेलं जेतेपद सणसणीत चपराक आहे. लिस्टर सिटीची माणसं आणि आपल्यात फार फरक नाही. गरज आहे सुरुवात करण्याची. न जाणो तुमच्या टीमच्या, संस्थेच्या यशस्वी दंतकथेवर लिहिण्याचा योग जुळून यायचा!