मी २० वर्षांची आहे. मी मुंबईत राहते. सध्या कॉलेजच्या लास्ट इअरला आहे. माझा वर्ण सावळा आहे आणि उंची ५ फूट २ इंच आहे. मला कुठल्या रंगाचे कपडे सूट होतील आणि माझी ड्रेसिंग स्टाइल कशी असायला हवी?आरती
प्रिय आरती,
कॉलेजमध्ये असतानाच खरं तर वेगवेगळ्या स्टाइल्स करून बघायला संधी असते. या वयात खरं तर काहीही चांगलं दिसू शकतं. कुठलाही रंग, प्रिंट्स, सिलोएट्स चांगले दिसतात. एकदा कॉलेज संपून कामाला लागलात, की हे सगळं घालता येईलच असं नाही. तेव्हा मग केवळ फॉर्मल्स किंवा सेमी- फॉर्मल्सचा चॉइस राहतो. असो.. तर आता सध्या तुला फॉर्मल लूक आवडत असेल तर काही ट्रेंडी एलिमेंट्स वापरून युनिक मिक्स लूकचा प्रयोग तू करू शकतेस. शर्ट घालायचा असेल तर तो जीन्सबरोबर घाल. शर्टसाठी बोल्ट प्रिंट्स किंवा रंग निवडलेस तरी हरकत नाही. कॉटन कुर्ती आणि जीन्ससुद्धा स्मार्ट दिसते. त्यावर एखादी बोल्ड अ‍ॅक्सेसरी घातली की सिंपल तरीही ट्रेंडी असा फॉर्मल लूक मिळेल. तू चुणीदार- कुर्ता वापरत असशील तर स्मार्ट कट असलेले प्लेन कापड निवड. त्यावर पुन्हा एखादा बोल्ड नेकपीस किंवा डँगलर इअररिंग घातल्या की स्मार्ट लूक येईल. दोन स्टाइल्स एकत्र केल्यानं एक वेगळा लूक मिळतो.
तू वेस्टर्न आऊटफिट्समध्ये कंफर्टेबल असशील तर जीन्स- टी-शर्ट किंवा शर्ट हा पर्याय कॉलेजला चांगलाच आहे. हल्ली जीन्सवर टय़ूनिकसुद्धा घालायची फॅशन आहे. स्कर्टसुद्धा पुन्हा फॅशनध्ये यायला लागले आहेत. वन पीस कॅज्युअल ड्रेससुद्धा आवडत असेल तर घालायला हरकत नाही. कॉटनच्या प्रिंटेड पँट्सचा ट्रेंड हल्ली दिसतो आहे. तुझी शरीरयष्टी, आवड आणि कंफर्ट लेव्हल असेल तर डंगरीज घालून बघ. स्टायलिश दिसेल.
स्टाइल करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यामध्ये कंफर्टेबल असले पाहिजे. वेस्टर्न वेअर कधीच घातले नसतील तर एकदम ते घालण्याच्या फंदात न पडलेलं चांगलं. फॅशनेबल असणं म्हणजे काही केवळ वेस्टर्न स्टाइलचे कपडे घालणं आणि शॉर्ट ड्रेस घालणं हा अर्थ होत नाही, हे लक्षात ठेव. भारतीय कपडेदेखील स्टायलिश वाटतात. फक्त ते कालसुसंगत असले पाहिजेत. त्यांची स्टाइल महत्त्वाची असते. खरं तर परदेशात या कपडय़ांची क्रेझ असल्याचं लक्षात येतं. तू तुझं वजन किंवा शरीरयष्टीबाबत फारसं सांगितलेलं नाहीस. त्यामुळे नेमके कपडे सजेस्ट करणं, सिलोएट्स सुचवणं हे शक्य होणार नाही. तुझ्या वर्णाला काळा, पांढरा, बेज, क्रीम, निळ्याच्या सगळ्या शेड्स, नियॉन वगळता हिरव्याच्या सगळ्या शेड्स, लाइट ऑरेंज, व्हर्मिलियन, रस्ट, मस्टर्ड, रोज पिंक, मरून, ब्राऊन आणि ग्रे हे रंग नक्कीच सूट होतील.
कॉलेजच्या वयाच्या मुलींना लेटेस्ट स्टाइलबद्दल माहिती असायला हवी. कॉलेजमध्येच आसपास नजर ठेवलीस आणि वृत्तपत्रातले फॅशनविषयक कॉलम चाळलेस तरी तुला याचा अंदाज येईल. बाजारात फिरताना कुठल्या स्टाइलला जास्त मागणी आहे त्याकडे लक्ष दे, तोच सध्याचा ट्रेंड असतो. फॅशन केवळ कपडय़ांपुरती मर्यादित नसते, हेदेखील लक्षात ठेव. तू वापरतेस त्या अ‍ॅक्सेसरीज, मेकअप, हेअरस्टाइल या सगळ्याचा उपयोग करून स्टायलिश लूक आणता येतो. ज्वेलरी, फूटवेअर आणि इतर अ‍ॅक्सेसरीजमध्येही लेटेस्ट ट्रेंड कोणता त्याकडे लक्ष ठेवायला हवं.
ऑल द बेस्ट!

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com