राज्यभरातील तमाम महाविद्यालयीन नाटय़वेडय़ा तरुणांसमोर आता येत्या नोव्हेंबरमध्ये एक नवीन आव्हान उभे राहणार आहे. नि:पक्ष निर्भीड अशी ख्याती असलेले ‘लोकसत्ता’ हे आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहे. या लोकसत्ता ‘लोकांकिका’ स्पर्धेत केवळ आणि केवळ महाविद्यालयांनाच सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठीही मुंबई किंवा पुण्याकडे येण्याची गरज असल्याने अनेक महाविद्यालये अशा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेपासून वंचित राहत होती. पण लोकसत्ता ‘लोकांकिका’ स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्या तुमच्या जवळच्या शहरातच होणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रभरात सात केंद्रांवर होणार असून त्या सात केंद्रांवरून निवडल्या गेलेल्या एकांकिकांची महाअंतिम फेरी मुंबईत रंगेल. मुंबईबरोबरच पुणे, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद आणि अहमदनगर या सात शहरांमध्ये लोकसत्ता ‘लोकांकिका’ रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची मुख्य अट म्हणजे स्पर्धेत सादर होणारी संहिता नवीन हवी. ही संहिता याआधी कोणत्याही स्पर्धेत सादर झालेली असल्यास त्या महाविद्यालयाला बाद ठरवले जाईल. २२ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी वाचत राहा लोकसत्ता आणि व्हिवा.