मी सध्या खूप विचित्र मन:स्थितीमध्ये आहे. मी एका कंपनीमध्ये काम करतो, तिथे माझी एक मैत्रीण आहे, तिचं लग्न झालं आहे आणि तोही प्रेमविवाह आहे. आधी मला काही जाणवलं नाही, पण मला असं वाटतं आहे, मी भावनिकरीत्या तिच्यात गुंतलो आहे. तिला मात्र माझ्याबद्दल तसं वाटत नसावं.  कारण आपण फक्त चांगले मित्र आहोत असं ती नेहमी म्हणते. खरं म्हणजे तिचा स्वभाव खूप चांगला आहे आणि आतापर्यंत मी अशा कोणत्याच स्त्रीला भेटलो नव्हत. एवढी जवळशी अशी माझी कोणी मैत्रीण नव्हती, म्हणून असं वाटत असावं कदाचित.
मी तिला सांगितलं देखील.. की , तुम्ही मला खूप आवडता. तिनंपण ऐकलं आणि मला समजून घेतलं. पण माझ्याच मनात गोंधळ आहे. मी तिलाच विचारू का या गोंधळाबद्दल? खरं तर ती लवकरच  दुसरीकडे काम करण्यास जाणार आहे. मलाही माहितीये की, माझ्याच मनात चुकीचे विचार येत आहेत. पण मनात खूप गोंधळ उडाला आहे. मला या सगळ्यामधून कसं बाहेर पडू हेच कळत नाहीये.     -गोपाल
हॅलो गोपाल,
आत्तापर्यंत कधी प्रेमात पडला नाहीयेस असं तू इनडायरेक्टली सांगितलं आहेस. तुला ही मैत्रीण आवडते यात काही चुकीचे विचार आहेत असं मला वाटत नाही. तुझ्या मनात एखाद्या स्त्रीविषयी आकर्षणाची भावना निर्माण होणं अगदीच नॅचरल आहे. आपल्याला कुणीही आवडू शकत नाही का? त्यातून पुढे काय अर्थ काढायचा हे मात्र सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. आपण प्रेमात पडतो म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीकडून नेमक्या काय अपेक्षा असतात हा विचारच केलेला नसतो. मानसिक आधार की शारीरिक संबंध की लग्न की आणखी काही? तू केला आहेस का काही विचार? तिलाच डायरेक्टली विचारावं असा एक मार्ग तुला दिसतोय, पण काय विचारणार आहेस तू, कुठल्या शब्दांत?
तुला तिच्याशी बोलायला आवडतं, ती बोलली नाही तर करमत नाही असं तू म्हणतोस. तिचा आधार वाटतोय तुला. तुझ्या स्वत:च्या इतर आयुष्याविषयी तू काही लिहिलं नाहीस. घरात काही टेन्शन्स आहेत का की ज्यामुळे तुला कुणाच्या तरी सोबतीची, मदतीची गरज वाटतेय? यात सेक्शुअल अ‍ॅट्रॅक्शन किती आहे?
मला एक सांग, तू तिला सांगितलंस तर त्याचा रिझल्ट काय असेल असं तुला वाटतं? इन अदर वर्ड्स, तुला या सगळ्यातून नक्की काय हवं आहे? तुझी अशी अपेक्षा आहे का की तिनं तिचं आत्ता चालू आहे ते आयुष्य सोडून द्यावं आणि तुझ्याबरोबर लग्न करावं? की तिनं तुझ्याबरोबर एक्स्ट्रॉमॅरायटल संबंध ठेवावेत? की तिला तू तिच्यावर प्रेम करतोस असं सांगून ते फक्त प्लॅटॉनिक लेव्हलला ठेवायचंय? यापैकी काहीही घडलं तरी त्यातनं तू किंवा ती सुखी व्हाल का? तिच्या नवऱ्याचं काय?
‘कळतंय पण वळत नाही’ या म्हणीला तू अगदी खरं करून दाखवतोयस. तुझ्या भावना अ‍ॅनालाइझ करायचा तू प्रयत्न केला आहेस. मला वाटतं ती लवकरच दुसरीकडे जाणार आहे ही तुझ्यासाठी एक संधी आहे. तिच्यापासून थोडं दूर राहिल्यावर तुझा गोंधळ काहीसा कमी होईल. आपल्याला खरं काय वाटतंय तिच्यासाठी हा जो तुला प्रश्न पडला आहे तो सुटू शकेल. शिवाय तुझे याबाबतीतले विचार काहीही असले तरी तिचा विचार तितकाच महत्त्वाचा आहे, नाही का? तुला याची पूर्ण जाणीव दिसतेय की ती तुझ्याकडे कुठल्याही स्पेशल नात्यानं बघत नाहीये. इन फॅक्ट, ती तुला आवडते हे तू सांगितल्यावरही तिनं ते ऐकलं आणि अजूनही मैत्री शाबूत ठेवली याचा अर्थ तिच्या मनात असा विचार बहुतेक अजिबात कधी आला नसावा. कुठलीही मुलगी आवडली की तिला प्रपोज करणं हा एकच मार्ग असतो का तिला अ‍ॅप्रिशिएट करायचा? हळूहळू तू इतर अनेक मुलींना भेटशील, तुझ्या अपेक्षा, आवडीनिवडी बदलू शकतील. पण या मैत्रिणीमुळे तुला निदान मुलींमध्ये आपल्याला कोणत्या क्वालिटीज भावतात ते कळलं हेही नसे थोडके.
Sometimes the hardest thing and the right thing are the same.
 
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.