vv32चॉकलेट भेट देण्याची आता आपल्याला सवय झाली आहे; पण सध्या ट्रेण्ड आहे लक्झरी गिफ्टिंगचा आणि लक्झरी चॉकलेट्स त्यात आघाडीवर आहेत.

चॉकलेट हा वीक पॉइंट असणारे अनेक जण असतात. ‘कुछ मीठा हो जाए’ं म्हणत खरं तर भारतीयांना चॉकलेटची चटक लावली ‘कॅडबरीनं’. चॉकलेट म्हणजे कॅडबरी इतकं हे नातं घट्ट होतं. आधीच्या पिढीला कॅडबरी सोडून इतर कंपन्यांची चॉकलेट्स अभावानेच चाखायला मिळाली असतील; पण जागतिकीकरणाच्या रेटय़ात इतर अनेक गोष्टी बदलल्या तशी आपली चॉकलेटची टेस्टही हळूहळू डेव्हलप होत गेली. पूर्वी परदेशातून येणारा प्रत्येक जण चॉकलेट्स घेऊन यायचा आणि ती परदेशी चॉकलेट्स मग ‘काय झकास आहेत’, ‘वेगळी आहेत’ म्हणून चवीनं चघळली जायची. अमेरिकन, बेल्जियन आणि स्विस चॉकलेट्सचे ब्रॅण्ड तर जगप्रसिद्ध आहेत. आता यातले अनेक ब्रॅण्ड आपल्याकडेही मिळायला लागले आहेत. परदेशी चॉकलेट्सचं अप्रूप कमी झालंय आणि वेगळ्या चवीच्या चॉकलेट्ससाठी जीभ सरावली आहे.

पंधरवडय़ापूर्वी ‘व्हिवा’मध्ये होममेड चॉकलेट्सविषयी लेख दिल्यानंतर अनेक तरुण मुलींनी आपणही अशी चॉकलेट्स घरी बनवत असल्याचं कळवलं. जसा होममेड चॉकलेट्सचा ट्रेण्ड सध्या रुजतोय तसा आणखी एक वेगळा ट्रेण्ड दिसतोय, तो म्हणजे लक्झरी चॉकलेट गिफ्ट देण्याचा. कुणालाही भेट देण्यासाठी अगदी लहानांपासून मोठय़ांपर्यंत कुणालाही चालेल, आवडेल आणि छान वाटेल अशी गिफ्ट म्हणून चॉकलेट्स देणं आता आपल्याकडे चांगलंच रुळलंय; पण नेहमीचीच चॉकलेट्स गिफ्ट देण्याऐवजी आता लक्झरी चॉकलेट्सकडे तरुणाई वळली आहे. कॅडबरीनं सेलिब्रेशनच्या पाठोपाठ ग्लो नावाचं लक्झरी चॉकलेट आणलं. लिण्डसारखी चॉकलेट्सही आपल्याकडे मिळायला लागली आहेत. शिवाय पताची, झोरॉय तसंच जपानी कंपनी रॉयस यांचीही लक्झरी चॉकलेट्स बाजारात आली आहेत. गिफ्टइज, झोरॉयसारख्या शॉपिंग साइट्स लक्झरी चॉकलेट्स ठेवतात.

अ‍ॅसॉर्टेड लक्झरी चॉकलेट्स भेट देण्याचे पर्याय देणाऱ्या अनेक वेबसाइट्स भारतात कार्यरत झाल्या आहेत. बंगलोर, मुंबई, पुणे या ठिकाणी अशा चॉकलेट्सना मागणी आहे, अशी माहिती त्यांच्याकडून समजली. प्रालिन, ट्रफल्स या प्रकारातली अ‍ॅसॉर्टेड चॉकलेट्स लक्झरी चॉकलेट्स या वर्गीकरणात मोडतात. उत्तम दर्जाची, तोंडात टाकल्यावर विरघळणारी, वेगवेगळं स्टफिंग असलेली अशी चॉकलेट्स गिफ्ट पॅकमध्ये आकर्षक पद्धतीनं मांडली जातात. पॅकिंगही देखणं असतं. व्हाइट, मिल्क आणि डार्क अशा तीन प्रमुख प्रकारांखेरीज अनेक वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून ही चॉकलेट्स बनवली जातात.

vv36 vv38चॉकलेट ट्रफल्स

साहित्य : २/३ कप साय किंवा क्रीम, ३४० ग्रॅम कमी गोड चॉकलेट्स (छोटे तुकडे करून), व्हॅनिला इसेन्स – अर्धा टीस्पून, १/३ कप कोको, १/५ कप ब्रॅण्डी.

कृती : सगळ्यात आधी, साय किंवा क्रीम थोडं फेटून घ्या. क्रीमला एक उकळी येऊ द्या आणि लगेच गॅस बंद करा. आता त्यात चॉकलेटचे तुकडे, व्हॅनिला इसेन्स घालून नीट मिक्स करून घ्या. एकजीव होईपर्यंत हे मिश्रण ढवळा. त्यात कोको पावडर घाला आणि फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा. त्यापूर्वी ब्रॅण्डी किंवा इतर हवे ते फ्लेवर वापरून लिकर चॉकलेट किंवा साधं चॉकलेट ठेवता येईल. चार- पाच तासांनी सेट झाल्यानंतर चॉकलेट ट्रफलला थिक चॉकलेटमध्ये डीप करून सेट करता येईल किंवा मध्येसुद्धा डीप करून सेट करता येईल किंवा किसलेल्या बदाम, काजू, पिस्ता यांच्यामध्ये रोल करून सेट करता येईल.
(पाककृती सौजन्य : शेफ देवव्रत जातेगांवकर )