निर्गुण निराकार ते सगुण साकार..गणपतीचं रूप हे यात कुठेही असू शकतं. गणेशाचं रूप म्हणूनच कलाकारांना लोभस वाटतं. आकर्षक वाटतं. त्यातून गणपती हा मांगल्याचं प्रतीक, त्यामुळे अर्थातच घराला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या वस्तूंवर गणेशप्रतिमा कोरण्याचा मोह अनेक कलावंतांना होतो. होम डेकॉरमध्ये गणेशरूपाला पूर्वीपासूनच स्थान आहे ते यासाठीच. बदलत्या काळानुसार गणेशाचं स्वरूप किंवा त्याच्या रूपानं सजणाऱ्या वस्तू बदलल्या आहेत इतकंच.  
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी गृहसजावटीच्या बाजारपेठेत नवीन आकर्षक वस्तूंची भर हमखास पडते. सध्या बाजारात चक्कर टाकली तर गणेश प्रतिमा असलेल्या फोटो फ्रेम, वॉल हँगिंग, कँडल स्टँड, वॉल पेंटिंग असे अनेक प्रकार दिसतात. गणेशोत्सवाच्या सजावटीत रोषणाईला महत्त्व आहे. वेगवेगळ्या आकाराच्या समया, निरांजनं, दिवे याबरोबरच सेंटेड कँडल्सही वेगवेगळ्या आकारात बघायला मिळताहेत. (छायाचित्र सौजन्य – हायपरसिटी)