फॅशन ऑस्कर’ अशी ओळख बनलेल्या ‘मेट गाला’मध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून विणलेले ड्रेस घालून हॉलीवूड सेलेब्रिटींनी ‘ग्रीन फॅशन’ची गरज व्यक्त केली.
न्यूयॉर्कमध्ये होणारा ‘मेट गाला’ समारंभ हा जागतिक फॅशनविश्वात महत्त्वाचा मानला जातो. न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्ट्स कॉस्चुम इन्स्टिटय़ूटसाठी वार्षिक निधी जमा करणे या उद्देशाने या शाही थाटाच्या समारंभाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मेट गालाचं आयोजन १९४६ पासून दरवर्षी करण्यात येतं. हॉलीवूड गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री त्या वर्षीच्या थीमनुसार कपडे परिधान करून रेड कार्पेटवर उतरतात. या कॉस्च्युम इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या कपडय़ांच्या प्रदर्शनासाठीचा एक मोठा सोहळा मानला जातो. मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा सोहळा पार पडतो.
यंदाच्या मेट गालासाठी manus x machina:  फॅशन इन अ‍ॅन एज ऑफ टेक्नोलॉजी अशी ठेवण्यात आली होती. अनेक सेलेब्रिटींनी यात भाग घेतला. हॅरी पॉटरमुळे स्टार बनलेली इमा वॉटसन हिने परिधान केलेल्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट ‘कॅल्विन क्लेन’च्या ड्रेसने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. तिचा हा थ्री पीस लुक होता. ब्लॅक अँड व्हाइट ऑफ शोल्डर टॉप आणि ब्लॅक ट्राऊझर्स याच्या जोडीला लांबलचक पल्लेदार ‘ब्लॅक ट्रेन’ जोडलेली होती. या ड्रेसचं मुख्य वैशिष्टय़ म्हणजे हा ड्रेस प्लास्टिकच्या बाटल्यांपासून केलेला होता. टॉपवरचे डिटेलिंग कॉटन, ऑरगॅनिक सिल्क आणि इतर नैसर्गिक धाग्यात केलेले आहेत आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासाठी त्यापासून सुतासारखा धागा तयार करण्यात आला आणि त्यापासून इमाचा ड्रेस शिवला गेला. इको एज आणि कॅल्विन क्लेन यांनी संयुक्तपणे ‘ग्रीन कार्पेट चॅलेंज’ स्वीकारून या ड्रेसची निर्मिती केली होती.
त्यासोबत अभिनेत्री मार्गोट रोबी हिनेदेखील पांढऱ्या रंगाचा स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान केला होता. तोदेखील इटलीयन रिसायकल मटेरिअलपासून तयार करण्यात आला होता. लुपिता न्यूयोन्गो हिचा हिरव्याजर्द रंगाचा ड्रेसदेखील याच प्रकारचा होता. पर्यावरणाला पूरक सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि फॅशन यांची सांगड घालून तयार करण्यात आलेल्या ड्रेसमुळे ‘सस्टेनेबल फॅशन’चा ट्रेण्ड ‘मेट गाला’मध्ये पुन्हा एकदा अधोरेखित झाला.