पावसाने त्याच्या पहिल्या दमदार इनिंगनंतर ब्रेक घेतला तो जरा जास्तच झाला, नाही का! पण मॅच तो अभी बाकी है. हल्ली तो मन मानेल तसा पडतो. सर्रकन पडतो किंवा कधी नुसताच कारंजासारखा तुषार उडवून जातो. घटकेत ऊन पडतं आणि घटकेत सर येते. त्यामुळे अशा पावसात तर आपल्या गॅजेट्सची काळजी घेणं अगदीच आवश्यक असतं. पहिल्या जोरदार पावसाच्या वेळी धुवांधार सरींत भिजल्यामुळे फोन बंद पडला आणि घरी कळवता आलं नाही असेही बरेच प्रसंग घडले. आपल्या आवश्यक गॅजेट्सची आता तरी काळजी घेणं ही उरलेल्या मान्सूनमध्ये जबाबदारी आहे ना! त्यातून नव्याने कॉलेज सुरू झालेलं. नव्या अ‍ॅक्सेसरीज भिजू नयेत म्हणून आपण त्या प्लास्टिकच्या वॉटरप्रूफ बॅगमध्ये घालून ठेवतो आणि गरजेच्या वेळी वापरता येत नाहीत. मात्र आता अशा काही सोयी उपलब्ध आहेत ज्यामुळे धो-धो पावसातदेखील आपल्याला आपली गॅजेटस् मनसोक्त वापरता येऊ शकतात. हॅव अ लुक..

ईअरफोन्स/ हेडफोन्स : ईअरफोन्समध्ये किंवा हेडफोन्समध्ये पाणी जाऊन त्यात बिघाड होण्याच्या घटना हमखास घडतात. नवीन घेणं विद्यार्थ्यांच्या पॉकेटमनी बजेटच्या बाहेरचं असतं. आता मात्र ईअरफोन्स आणि हेडफोन्स स्वत:च वॉटरप्रूफ झाले आहेत. फिलिप्स, पॅनासोनिक यांसारख्या प्रख्यात कंपन्या या अ‍ॅक्सेसरीज् बनवतात. ५०० ते ८०० रुपयांपासून पुढे रेंज आहे.

मोबाइल आपली सगळ्यात प्रिय वस्तू! मग पाऊस पडतोय म्हणून तो नाही वापरायचा असं कसं चालेल? पावसात इमर्जन्सी म्हणा किंवा नुसत्या गप्पा मारायला म्हणा, फोन हा हवाच! त्यासाठी आता ‘वॉटर रेसिस्टंट स्विम पाऊच’ वापरा. तो केवळ वॉटर रेसिस्टंटच नाही तर तो हाताला अडकवून ठेवण्याचीही सोय आहे. किंमत ब्रँडनुसार बदलते पण साधारण ५०० रुपयांपासूनची रेंज आहे.

ब्लूटूथ : हात मोकळे हवेत म्हणून कानाला ब्लूटूथ लावून फिरणं सोयीचं ठरतं. मात्र मुसळधार पावसात रेनकोटची टोपीसुद्धा त्याचं रक्षण करू शकत नाही. म्हणून आता ब्लूटूथ डिव्हाइसलाच वॉटरप्रूफ कव्हर घालायला सुरुवात करा. गॅजेट्स बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी अशा सोयी आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. साधारण १००० रुपयांपासून पुढे याच्या किमती आहेत.

एम.पी.थ्री. प्लेअर : पावसात फिरताना गाणी ऐकायला कोणाला नाही आवडणार? पण मुसळधार पावसात त्याची काळजी घेणं म्हणजे तारेवरची कसरतच! त्यापेक्षा ‘अंडरवॉटर एम.पी.थ्री. प्लेअर’ जरूर ट्राय करा. पाऊसवेडय़ा संगीतप्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणी ठरू शकते. किंमत जरा जास्त आहे.. ५००० रुपयांच्या पलीकडे पण संगीतप्रेमींना भर पावसात गाणी ऐकायला खर्च परवडत असेल तर हरकत नाही.

कॅमेरा : पावसाळ्यात ट्रेक आणि पावसाळी पिकनिक म्हणजे धमाल, मजा, मस्ती आणि खूप सारे फोटो! धो-धो कोसळणाऱ्या धबधब्यात भिजताना कॅमेऱ्याचं मात्र काही खरं नाही. ‘वॉटरप्रूफ प्लास्टिक कॅमेरा केस’मुळे पावसाच्या धारांतसुद्धा फोटोग्राफीचा आनंद आपण घेऊ शकतो. ही केस कॅमेऱ्याची लेन्स, फोकस आणि फ्लॅश या तिन्हींचे पावसापासून रक्षण करते. ब्रॅण्डनुसार किमती बदलत असल्या तरी सुरुवात ८०० ते १०००ने होते.

आपल्या आवडत्या टेक्नॉलॉजीची काळजी आणि आनंद घेण्यासाठी या गोष्टींचा शोध जरूर घ्या. या अ‍ॅक्सेसरीज् प्रत्यक्ष दुकानात शोधण्यापेक्षा त्यांचं ऑनलाइन शॉिपग करणं अधिक सोयीचं ठरेल. ई-बे, अ‍ॅमेझोन, फ्लिपकार्ट इत्यादी वेबसाइट्स्वर या अ‍ॅक्सेसरीज् मिळू शकतात. सो, गेट रेडी फॉर मॉन्सून..!

वेदवती चिपळूणकर