रॅप, रॉकच्या या जमान्यात यूटय़ूबवर मात्र विविधभाषी म्युझिक चॅनल्सची चांगलीच चलती आहे. शास्त्रीय संगीतापासून रॅपपर्यंत सर्वकाही या व्यासपीठावर उपलब्ध आहे. मंगळवारी (२१ जून) झालेल्या वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने ‘ यूटय़ूब’वरच्या अशाच काही चॅनल्सची ही एक सुरेल मैफल.

सप्तसुरांची सुरेल गुंफण असो किंवा नुसतंच वाहत्या पाण्याची खळखळ, शोधला तर सूर कुठेही गवसतो. यूटय़ूबवर हाच सूर वेगवेगळ्या रूपांत अक्षरश: अनेकांना सूरमयी कोषात गुंतवण्यात यशस्वी होत आहे. म्युझिक लव्हर्सना सांगीतिक मेजवानीचा अनुभव देण्यासाठी यूटय़ूब काही मागे नाही. टेलिव्हिजनची ढीगभर म्युझिक चॅनल्स, शिवाय एफएम रेडिओ चॅनल्स, म्युझिक अ‍ॅप्स या साऱ्यांच्या स्पर्धेत यूटय़ूब म्युझिक चॅनल्सही एक वेगळं स्थान बाळगून आहेत. मुख्य म्हणजे उगवत्या संगीतप्रेमी कलाकारांसाठी त्यांच्या रसिकांसाठी यू टय़ूबवरची म्युझिकल चॅनल्स खास पसंतीची आहेत.
रॅप, पॉप, रॉक, फ्युजन, क्लासिकल, रिमिक्स, बीट बॉक्सिंग, इन्स्ट्रमेंटल आणि अशा कितीतरी विविध प्रकारच्या म्युझिकल फॉम्र्समधून यू टय़ूबवर सूर छेडले जातात. हिंदुस्थानी क्लासिकल प्रेमी संगीतरसिकांसाठी खास डेडिकेटेड यू टय़ूब म्युझिक चॅनल्स आहेत. त्यापैकीच ‘गीतांजली’, ‘इन्सिंक’ लोकप्रिय आहेत. हिंदुस्थानी क्लासिकलसाठी आहेत तशी जॅझसाठीही डेडिकेटेड चॅनल्स आहेत. सध्या तरुणाईच्या यू टय़ूब म्युझिक लिस्टमध्ये बॉब मार्लीपासून ते झ्यान मलिकपर्यंतचे आवाज ऐकू येतात. ‘झ्यान वेवो’ या चॅनलवर झ्यान मलिकने गायलेली गाणी सध्या यंगस्टर्समध्ये प्रचंड गाजत आहेत. तर दुसरीकडे ‘मॅजेस्टिक कॅज्युअल’, ‘अल्ट्रा म्युझिक, इन्स्ट्रमेंटल कोर’, ‘कोल्ड प्ले’ सारखे आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले बँडही यूटय़ूब चॅनल्सवर अमाप सबस्क्रायबर्स मिळवत आहेत.
‘कोक स्टुडिओ’ हे यू टय़ूबवरचं लोकप्रिय म्युझिक चॅनल. अनेक तरुणांचं फेव्हरेट्सपैकी एक चॅनल. पट्टीचे गायक, लोकप्रिय संगीतकार, लोकसंगीताचे जाणकार आणि कलाकार, क्लासिक झ्यान, लोकप्रिय बँड या सगळ्यांना कोक स्टुडिओच्या व्यासपीठावरून ऐकताना एक वेगळा अनुभव येतो. काही वेगळं ऐकायसाठी उत्सुक कानसेनांसाठी ही पर्वणीच. अभिनेता पीयूष मिश्रानेही ‘हुस्ना’ या गाण्यासह ‘कोक स्टुडिओ’त हजेरी लावली आहे. हे गाणं सध्या सगळ्यात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या गाण्यांपैकी एक झालंय. जुनी नवी गाणी, उत्कृष्ट दर्जाचे गायक यू टय़ूबच्या एका सर्चबारमध्ये नुसतं नाव टाइप केलं तरीही सहजगत्या मिळतात. मोहम्मद रफींच्या ‘गुल बालोच’ चित्रपटातील गाण्यापासून ते काल-परवा आलेल्या उडता पंजाबच्या शीर्षक गीतापर्यंत सर्व गाणी या यू टय़ूबच्या वेगवेगळ्या चॅनल्सवर उपलब्ध आहेत.
यूटय़ूबवर हिंदी, इंग्रजीच नाही तर स्थानिक भाषांमधल्या गाण्यांना आणि चॅनल्सनाही प्रेक्षकांची प्रचंड पसंती आहे. पंजाबी गाण्यांच्या चॅनल्सना आणि गायकांनाही यू टय़ूबवर बरेच व्ह्य़ूज आणि लाइक, शेअर, सबस्क्रायबर्स आहेत. गुरदास मान, रफ्तार, हनी सिंग, अर्श बेनिपाल ही यांपैकीच काही नावं. त्यातही ‘किंग ऑफ पंजाबी सिनेमा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दिलजीत दोसांझ’ या कलाकाराला यू टय़ूबवर विशेष पसंती आहे. ‘पगवाला मुंडा’, ‘पंचतारा’, ‘इक कुडी’ अशी त्याची अनेक गाणी आणि त्याचा ‘हार्ड कोर’ पंजाबी अंदाज विविध भाषीय प्रेक्षकांनाही भुरळ घालतो आहे. तसंच काहीसं ‘साउथ इंडिअन म्युझिक’चंसुद्धा. साउथ टच असणारं ‘ट्रेण्ड म्युझिक’ हे त्यापैकीच एक चॅनल. ‘बिंग इंडिअन म्युझिक’, ‘सोनी म्युझिक’ सोबतच ‘योगा म्युझिक’, ‘मेडिटेशन म्युझिक’, ‘वर्कआउट म्युझिक सव्‍‌र्हिस’सारख्या विविध चॅनल्सची हजेरीही यू टय़ूबच्या म्युझिक क्लासरूममध्ये आहे.
12
या म्युझिकल सफरीत काही तरुण कलाकार मंडळीही आपल्या आवाजाची सुरेल उधळण करत आहेत. सिद्धार्थ स्लाथिया, नेहा कक्कर, विद्या वॉक्स, सनम, अविश शर्मा, कौस्तव घोष हे यू टय़ूबवरच्या म्युझिक चॅनल्सच्या यंग ब्रिगेडचे आघाडीचे शिलेदार. याशिवाय कपसाँगमुळे लोकप्रिय झालेली मराठमोळी मिथिला पालकरही यूटय़ूब म्युझिक चॅनल्समध्ये आघाडीवर आहे. मूळ गाण्याला अतरंगी डिजिटल संगीताची जोड देऊन फ्युजन करणारे डीजे यूटय़ूब चॅनलवर वेगळं अस्तित्व ठेवून आहेत. ‘झिंगाट’ची रिमिक्स व्हर्जन्स असो वा नवीन चित्रपट गीतांची नॉनस्टॉप प्लेलिस्ट यूटय़ूबवर म्युझिक रिलेटेड काहीही सापडू शकतं. कलाकार आणि सबस्क्रायबर्सच्या रूपातील प्रेक्षक दोन्हीची संख्या वाढती आहे. त्यामुळे तरुण संगीत कलाकार, यू टय़ूबर्स यांच्यासाठी म्युझिक चॅनल्सची वाट लोकप्रिय होत आहे यात शंका नाही. यू टय़ूबचीही अखंड सुरेल वाट एकदातरी चालून पहा. नवे सांगीतिक वातावरण, कलाकार अनुभवा आणि स्टेटस अपडेट करा ‘म्युझिकल जर्नी नेव्हर बिफोर..’