31
‘पुराणातली वानगी (बोली भाषेतली -वांगी) पुराणातच बरी’, असा तरुणांचा दृष्टिकोन असतो. ते इतिहासापेक्षा भविष्याकडे बघणारे असतात, असं म्हटलं जातं. पण तरुणाई सध्या पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या कथानकांकडे वळली आहे. ‘बेस्ट सेलर’ पुस्तकांनंतर आता ही पुराणातली ‘वांगी’ टीव्हीवर दिसायला लागली आहेत. पौराणिक मालिकांसाठी आता स्वतंत्र चॅनेल सुरू झालंय.

तरुणांचा दृष्टिकोन बहुधा ‘जुने जाऊ दे मरणालागूनी’ असाच असतो. ते भविष्याकडे बघणारे असतात, असं म्हटलं जातं. पण सध्याची तरुणाई पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या कथानकांकडे वळली आहे. तरुणाईनं डोक्यावर घेतलेल्या बेस्ट सेलर पुस्तकांनंतर आता ही पुराणातली वांगी टीव्हीवर दिसायला लागली आहेत. एपिक नावाचं स्वतंत्र चॅनेल या पौराणिक मालिकांसाठी सुरू झालंय.

तरुण पिढीचा आणि इतिहासाचा संबंध फक्त शाळेतल्या पुस्तकापुरता असतो. एकदा शाळा सुटली की, हा संबंधही सुटतो आणि मग त्याच्या तारा जुळण्याची शक्यता तशी कमीच असते, असं समजलं जातं. पण आता हे चित्र पालटलं आहे. पुराणातील कथा, त्यातील व्यक्तिरेखा, ऐतिहासिक किस्से- कहाण्या यांच्याबाबत तरुणांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत आणि पुस्तकं, मालिका, चित्रपट, सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची धडपडही ते करू लागले आहेत. 

ऐतिहासिक किंवा पौराणिक संदर्भामधून निर्माण केलेली काल्पनिक कथानकं तरुणांना प्रभावित करू लागली आहेत. अमिषची ‘शिवाज ट्रायोलॉजी’ हे त्याचंच उदाहरण. या तीन पुस्तकांनंतर पौराणिक कथांबद्दल तरुणांच्या मनामध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली. आता सिनेमा-टीव्हीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र या विषयांवर चर्चासत्रं गाजू लागली आहेत. ‘असुरा’, ‘अजया’, ‘सीता’ ही पुस्तकं बेस्ट सेलरच्या यादीमध्ये जाऊन पोहोचली आहेत. ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘भगतसिंग’नंतर त्या तोडीचा ऐतिहासिक संदर्भ असलेला चित्रपट आला नाही, पण टीव्हीवर मात्र आता ऐतिहासिक आणि पौराणिक कथानकंच वर्चस्व गाजवत आहेत.
आजची पिढी या प्रकारच्या कथानकांकडे कशी काय आकर्षित होते, याविषयी लेखक अमिष त्रिपाठी सांगतात, ‘पौराणिक कथा आपल्या रक्तामध्ये आहेत. त्यामुळे त्याविषयीची उत्सुकता मरणं काही शक्य नाही. १९९१ नंतर आपल्या देशामध्ये स्थैर्याचं वारं वाहू लागलं. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. आजच्या काळात आपण विविध क्षेत्रांमध्ये चमकत आहोत. अशा वेळी आपल्यातील आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी आणि प्रेरणा मिळण्याच्या उद्देशानं तरुण या पौराणिक आणि ऐतिहासिक साहित्याकडे पाहतात. कारण, त्यातून त्यांना लढण्याची प्रेरणा मिळते, विजयी वीरांच्या चातुर्याच्या कथा ऐकून अभिमान वाटतो आणि सकारात्मक भावना मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे तरुण पुन्हा एकदा या विषयांकडे वळू लागले आहेत.’

पौराणिक पात्र आणि सोशल मीडियावरच्या क्विझ
अर्थात तरुण पुराणकथा किंवा ऐतिहासिक कथेकडे वळतो तेव्हा तो त्यातली प्रत्येक व्यक्तिरेखा नव्यानं समजून घेऊ इच्छितो. त्या व्यक्तिरेखेच्या विविध छटांना आपल्या व्यक्ति16मत्त्वाशी जोडण्याचा प्रयत्नही करत असतो. त्यामुळेच रामायण, महाभारत माहिती असलं तरी रावण, दुर्योधन, अजया, द्रौपदी यांच्या बाजू पुस्तकांमधून समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यातून या पात्रांविषयीची एक नवीन बाजू त्यांच्या नजरेसमोर येताना दिसते. त्यातूनच सीतेला पळवून नेणारा रावण जेव्हा तिला लंकेत सन्मानाची वागणूक देतो तेव्हा त्याच्याविषयीचा राग कमी होतो आणि सीतेला अग्निपरीक्षा करवण्याचा रामाचा निर्णय तरुणाईला चुकीचा वाटतो. आपल्या मनातील या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना सोशल मीडियाचं व्यासपीठसुद्धा मिळालं आहे. त्यामुळे महाभारतातील किंवा रामायणातील काही ठरावीक प्रश्नांची उत्तरं दिल्यावर तुमचं व्यक्तिमत्त्व नक्की कोणत्या व्यक्तिरेखेशी मिळतंजुळतं आहे किंवा इतिहासाच्या काही प्रश्नांची उत्तरं दिल्यास तुम्ही मागच्या जन्मी नक्की कोणत्या राजाच्या काळात किंवा स्वातंत्र्य लढय़ामध्ये सहभागी झाला होतात अशा प्रकारच्या ‘क्विझ’चं प्रमाण वाढलं आहे. इतकंच नाही, तर सोशल मीडियावर भगवद्गीता, मनाचे श्लोकपासून ते अगदी ययाति, मृत्युंजयपर्यंत सर्व पुस्तकांबाबतच्या चर्चाही गाजतात.

टीव्हीपुराण
या सगळ्यात टीव्हीनेही या विषयाकडे दुर्लक्ष केले नाही. आज कुठलंही चॅनल लावल्यास ऐतिहासिक किंवा पौराणिक विषयावरील मालिका सर्वाधिक टीआरपी खेचत असल्याचं चित्र दिसून येतं. त्यामुळेच कदाचित पूर्वी अनेकदा महाभारताची कथा ऐकलेली आणि पाहिलेली असूनही नव्याने येणाऱ्या महाभारत मालिकेचे भाग १०० पासून १५० पर्यंत वाढवण्याची गरज निर्मात्यांना पडते. तसंच सिंहासन बत्तीशी, महाराणा प्रताप, जोधा अकबर, जय मल्हार या मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आघाडीला आहेत. अमेरिकेच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीवर आधारित ‘द हिस्ट्री चॅनल’लासुद्धा भारतीय तरुणांनी पसंती दिली आहे. या बदलाचे वारे लक्षात घेऊन ‘एपिक चॅनल’ नुकतंच सुरू करण्यात आलंय. या चॅनेलवर इतिहासाच्या पानामध्ये हरवलेल्या गुप्तहेरांची कथा आहे. तसंच भारतातील खाद्यसंस्कृतीचा इतिहास, शापित वास्तूंचा प्रवास, सलीम अनारकली अशा विविध कथा सांगण्यात येणार आहेत. याबद्दल सांगताना चॅनलचे प्रमुख महेश सामंत म्हणाले, ‘‘आजच्या तरुणाला इतिहासाबद्दल उत्सुकता नाही, हे खोटं आहे. इतिहासातल्या नक्की कोणत्या गोष्टी तुम्ही सांगता आहात आणि कशा सांगता आहेत, हे महत्त्वाचं आहे.’’ अर्थात यामध्ये व्हिज्युअल इफेक्टचं म्हणजेच ‘व्हीएफएक्स’ची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. ‘आजच्या घडीला व्हिडीओ गेम्स आणि अॅनिमेटेड सिनेमांच्या प्रेमात असलेला तरुण वर्ग जेव्हा अशा मालिकांमधले भव्य सेट, मोठी युद्धं, आकर्षक प्रकाशयोजना पाहिल्यावर अर्थातच तरुण या मालिकांकडे ओढला जातो’’, असं सिंहासन बत्तीशी मालिकेचे निर्माते धीरज कुमार सांगतात.
पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांच्या लोकप्रियतेचं गमक त्यातील अभिनेत्यांमध्येही आहे. महादेवाची भूमिका साकारणारा मोहित राणा, सम्राट अकबर साकारणारा रजत ठोकास किंवा खंडोबाच्या भूमिकेतला देवदत्त नागे यांच्या पीळदार शरीरयष्टीवर फिदा होणाऱ्या मुलींची संख्याही कमी नाही. ‘आजच्या सिनेमात सिक्स पॅक अॅब्सवाले नायक असतात. त्यांची बॉडी वेल्ड टोन्ड असते. तरुणांमध्ये अशी बॉडी असलेल्या नायकांची क्रेझ आहे. त्यामुळे त्यांना रांगडा खंडोबा देवदेखील भावतो’, ‘जय मल्हार’मध्ये खंडोबाची भूमिका साकारणारा देवदत्त नागे सांगतो. ‘आपल्याकडची जुनी चित्रं, जुनी कॅलेंडर पाहिल्यास त्यातील देव पीळदार शरीरयष्टीचेच होते. परंतु पूर्वीच्या मालिकांमधून अशी शरीरयष्टी असणारे नायक दाखवणं शक्य नव्हतं. आज मात्र योग्य डाएटच्या मदतीने कलाकारांना ते रूप देणं शक्य होत आहे’, ‘महादेव’ मालिकेचे निर्माते निखिल सिंग सांगतात. तर दुसरीकडे मालिकेतील पार्वती, जोधा, म्हाळसाच्या रूपाने संमोहित झालेले तरुणही कॉलेजच्या कट्टय़ावर सापडतील. या मालिकांमधील व्यक्तिरेखांचे दागिने, कपडे यांच्याबाबतही तरुणींमध्येही उत्सुकता आहे.

17सकारात्मक भावनेच्या शोधामध्ये असलेला तरुण या पौराणिक आणि ऐतिहासिक कथांकडे वळला आहे. त्यातल्या पात्रांचा, व्यक्तिरेखांचा नव्यानं शोध घेत आहे. पुराणातली वांगी पुराणातून बाहेर येताहेत. व्हिडीओ गेम्स आणि अॅनिमेटेड सिनेमांच्या प्रेमात असलेला तरुण वर्ग अशा मालिकांमधले भव्य सेट, मोठी युद्धं, आकर्षक प्रकाशयोजना पाहिल्यावर अर्थातच या मालिकांकडे ओढला जातो.
धीरज कुमार (निर्माता)