हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जो काही निवांत वेळ वाटय़ाला येतो तो रात्रीच. बदलती जीवनशैली लक्षात घेता फिटनेस फार महत्त्वाचा मानला जातो. सकाळी उठून व्यायाम करणं, मॉìनग वॉकला जाणं बरेचदा वेळेअभावी शक्य होत नाही. म्हणूनच हल्ली नाइट जिम्ससुद्धा चालवल्या जातात. सकाळी लवकर घराबाहेर पडून कामाला जाणाऱ्यांना संध्याकाळचा क्वालिटी टाइम कुटुंबासमवेत किंवा मित्रमंडळींमध्ये घालवायला आवडतो. मग व्यायामासाठी कधी वेळ काढायचा हा प्रश्न पडतो. अशांसाठी हल्ली नाइट जिमचा पर्याय असतो. फिटनेस गुरू लीना मोगरे यांच्या जिम्स २४ तास चालू असतात. लीना मोगरे म्हणाल्या, ‘उन्हाळ्यात दिवसा घामाच्या धारा लागत असताना व्यायामासाठी जायलाही नको वाटतं. अशांसाठी २४ तास जिम चालू असते. म्हणजे त्यांना हवं तेव्हा येऊन एक्सरसाइज करू शकतात.’