जिवाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यातला दिवस कधी संपतो आणि जरा बाहेर पडू देणारी संध्याकाळ कधी होते याची वाट बघत असतो. उन्हाळी सुट्टीतले खरे प्लॅन्स असतात संध्याकाळचेच. त्यातून आताची पिढी तर पक्की निशाचर. दिवस-रात्रीतलं अंतर त्यांनी केव्हाच संपवलंय. आजकाल रात्रभर उघडे असणारे खाऊ कट्टे आहेत तशा रात्रभर सुरू असणाऱ्या जिमही आहेत. आजची पिढी ‘नाइट लाइफ’ एन्जॉय करणारी. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात मैत्रिणींच्या घरी ‘स्लीप ओव्हर’चे प्लॅन आखले जातात आणि ‘पजामा पार्टी’ रंगात येते. पण ‘नाइट लाइफ’ म्हणजे नाच, गाणी, डिस्को, पार्टी एवढंच नाही. मित्रमंडळी एकत्र येऊन यापेक्षा वेगळं नाइट लाइफ एन्जॉय करू शकतात. रात्रीचं शहर बघण्यात मजा आहे आणि गावातून चांदण्यांची खडी बघण्यात तर आणखी मजा आहे. निसर्गाच्या जवळ जात.. निसर्गाने मांडलेला रात्रीचा खेळ बघायचे बेत तुम्ही आखलेत का?

निसर्गातलं नाइट लाइफ
पूर्वी सुट्टय़ा लागल्या की, मामाच्या गावी मजा करायला सगळे जात असत. पण हळूहळू मामाच शहरात आला आणि गावच्या सुट्टीची मजा गेली. आता कॅम्पिंग कल्चरमुळे नवी पिढी तीच मजा पुन्हा अनुभवतेय (अर्थात पैसे मोजून!) ‘ओव्हरनाइट कॅम्पिंग’ ही सध्याची ‘इन थिंग’ झाली आहे.
नाइट लाइफचा विषय निघाला की, पहिलं डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे लेट नाइट चालणाऱ्या पाटर्य़ा! पण या व्यतिरिक्तदेखील नाइट लाइफ असते. ज्यात मज्जामस्ती तर असते पण सोबत असते नभांगणीच्या ताऱ्यांची आणि निसर्गाची. काही वर्षांपूर्वी मामाच्या गावची मज्जा घ्यायला सगळे जात असत आणि मग नदीत पोहायचं, माळरानात फिरायचं, रात्री मोकळ्या हवेत चांदण्यांखाली झोपी जायचं या सगळ्यात ती वेगळी मज्जा होती. पण हळूहळू मामाच शहरात आला आणि या गोष्टी मागे पडत गेल्या.
शहरातील टोलेजंग इमारतीच्या जंगलात, प्रदूषणाच्या वातावरणात आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात चांदणी रात्र पाहायला मिळण्याचा योग तसा दुर्मीळच. आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाचा अपवाद वगळता तसं विस्तीर्ण पसरलेल्या आकाशाखाली चांदणी रात्र घालवण्याची संधी तशी शहरातल्या लोकांना कमीच मिळते. मग यासाठी पिकनिक म्हणून नाइट कॅम्पच्या योजना आखल्या जातात. रात्री आकाशाखाली तंबू ठोकायचा, सोबत नेलेल्या सामानातून जेवण बनवायचं, निसर्गरम्य वातावरणात त्याचा आस्वाद घ्यायचा, काळोखात शेकोटी पेटवायची. त्याच्या बाजूला बसून मग अंताक्षरी, गप्पांचा फड जमवायचा एकूणच नाइट कॅम्पमध्ये मज्जामस्ती करायची. पुण्या-मुंबईच्या आसपास अशा अनेक कॅम्पिंग साइट्स आकाराला आल्या आहेत. अर्थात हे कॅम्पिंग लक्झरी कॅम्पिंग म्हणावं लागेल. इथे तुम्हाला आयता तंबू ठोकून दिला जातो आणि त्यासाठी भरभक्कम पैसेही आकारले जातात. पण या कॅम्पसाइटवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात. खोपोली, कर्नाळा, राजमाची, लोणावळा, पाचगणी, वारली वाडा, लोहगड, हरिश्चंद्रगड, भंडारदरा, पवना, कोलाड या ठिकाणांना नाइट कॅम्पसाठी पसंती दिली जाते. थोडासा खर्चीक मामला असला तरी या कॅम्पिंग लाइफला तरुणांनी आपलेसे केले आहे. मुलींसाठी सुरक्षित असल्याने एकटय़ा मुलींचा ग्रुपदेखील अशा नाइट कॅम्पमध्ये दिसतो. तसेच हे कॅम्प ‘पेट फ्रेंडली’देखील असतात. लेट्स कॅम्पआउट, द बिग रेड टेण्ट, गेटसेट कॅम्प, कॅम्पिंग गिअर आदी अनेक संस्था कँपिंगची सोय देतात.

आकाशदर्शन
नाइट कॅम्पिंगचा अविभाज्य भाग असतो आकाशदर्शनाचा. तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आकाशातली खडी निरखायला मिळाली, तर खरी मजा येते आणि खूप समजून घेता येते. मुंबईच्या ‘खगोलमंडळा’कडून आकाशदर्शनाचे कार्यक्रम नेरळ येथील सगुणाबाग येथे घेतले जातात. हे आकाशदर्शनासाठीचे नाइट कॅम्प खगोलतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातात. अमावस्येच्या नजीकच्या शनिवार-रविवारी या शिबिराचं आयोजन केलं जातं. संपूर्ण रात्र चालणाऱ्या या शिबिरासाठी पूर्वनोंदणी करणं आवश्यक असतं.
काजव्यांचा कॅम्प
उन्हाळा सरतानाचे दिवस असतात काजवे दिसण्याचे. शहरात कुठले आता काजवे दिसायला? त्यासाठी गावचा रस्ता धरायला हवा.. तो ही संध्याकाळनंतर. मुंबई आणि पुण्यातल्या २०- २५ तरुण संस्था एकत्र येऊन काजव्यांचा ट्रेक दरवर्षी आयोजित करतात. या आयोजकांपैकी एक प्रीती पटेल म्हणाली, ‘मे अखेरीस, पावसापूर्वीचा पंधरवडा आम्ही खास काजवे बघण्यासाठी ट्रेक नेतो. गेल्या वर्षी भंडारदरा परिसरात आणि कुलंगला आम्ही गेलो होतो. कोकणात अनेक ठिकाणी हमखास काजवे दिसतात. शिवाय भोजगिरी डोंगर, राजमाची, माहुली, रतनगड, माळशेज घाट, भीमाशंकर यांसारख्या ठिकाणी काजवे बघायला जाता येईल. या ट्रेकच्या तयारीसाठी आम्ही आधीच या ठिकाणी फिरून कुठल्या स्पॉटला जास्त काजवे दिसण्याची शक्यता आहे, याची चाचपणी करतो आणि मगच काजव्यांच्या ट्रेकचं यंदाचं डेस्टिनेशन ठरतं.’ काजव्यांचे ट्रेक सध्या चलतीत आहेत, याचं कारण आता तरुणाईच्या हातात आधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे आले आहेत आणि त्यातून नाइट फोटोग्राफीच्या ट्रेण्डलाही बहर आला आहे. काजव्यांचं दर्शन त्यासाठी सुंदर निमित्त ठरतं, असंही प्रीती म्हणली.
काजव्यांच्या बाबतीत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, हजारो काजवे एकाच झाडावर दिसतात, तेव्हा त्यांच्यातलं सिंक्रोनायझेशन बघण्यासारखं असतं. जणूकाही लाइट शो सुरू आहे, असा नयनरम्य देखावा दिसतो. प्रीती सांगते की, ‘काही वेळेला आम्ही मुद्दाम कॅमेरे बाजूला ठेवून नुसत्या डोळ्यांनी हा निसर्गाचा लाइट शो बघायला सांगतो. कारण कॅमेऱ्याच्या क्लिकचा आवाज, फ्लॅश यामुळे या सुंदर अनुभवात बाधा येऊ शकते. काही मिनिटं निशब्द अवस्थेत हा प्रकाशाचा खेळ अनुभवण्यात खरी मजा आहे.’
अहमदनगरमधील पुरुषवाडी येथे नाइट कॅम्प जातात. काजव्यांनी भरलेली झाडं यासाठीच पुरुषवाडी ही जागा प्रसिद्ध आहे. ‘ग्रासरूट’ या संस्थेमार्फत पुरुषवाडी येथे सहली नेल्या जातात. या खेडय़ातील काही लोकांच्या सहकार्याने आणि सहभागाने ही संस्था सहली नेण्याचे काम करते. यासाठी त्या खेडय़ातील लोकांना विशिष्ट पद्धतीचं ट्रेिनग दिलं गेलं आहे. यामध्ये गावातील लोकांच्या घरी टुरिस्ट राहू शकतात. हे गाव हीच आता कॅम्पसाइट झाली आहे. पूर्णत: खेडय़ातील जीवनाशी परिचय होतो व त्यामुळे खेडय़ातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मे महिन्याचा शेवट ते जून हा कालावधी काजवे दिसण्यासाठीचा योग्य कालावधी असल्याने याच कालावधीत सहली नेल्या जातात. २१ मे ते ३ जुलै या कालावधीत तिथे ‘फायरफ्लाइज फेस्टिवल’ होणार आहे. ‘कॅमेरा अ‍ॅण्ड शॉट्स’ या संस्थेतील फिल्म मेकर्स समर्थ महाजन, आशय गंगवार आणि प्रतीक पात्रा या तिघांनी पुरुषवाडीवर एक सुंदर डॉक्युमेंटरी बनविली आहे. समर्थ महाजन म्हणाला, ‘‘डॉक्युमेंटरी करण्यासाठी आम्ही काही ठिकाणं शोधत होतो आणि त्या वेळी पुरुषवाडीबद्दल आम्हाला इंटरनेटवरून समजलं. आम्ही साडेतीन रात्री तिथे काम केलं. संपूर्ण काजव्यांनी भरलेलं झाड बघणं म्हणजे केवळ विलक्षण. त्याचबरोबरीने त्या गावातील लोकांनीसुद्धा आम्हाला खूप मदत केली. काही वेळा बेडकासारखे आवाज आम्हाला येत होते. आमच्याबरोबर असलेल्या गाइडने ते सापाचे आवाज असल्याचं सांगितलं. अशा प्रकारचे विविध अनुभव आम्हाला आले. आमचा तिथला अनुभव हा अतिशय अविस्मरणीय होता.’’

जंगलातली बुद्धपौर्णिमा
दरवर्षी वन्यप्रेमी बुद्ध पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहात असतात. कारण वर्षभरातून एकदा त्यांना जवळून वन्यप्राण्यांना अनुभवण्याची संधी मिळते. झाडावर मचाण उभारून चंद्राच्या प्रकाशात पाणवठय़ावर येणारे वन्यप्राणी मोजायचे आणि नोंद करून ठेवायचं हे काम करण्यासाठी दरवर्षी तरुण वन्यप्रेमी तयार असतात. २१ मेच्या पौर्णिमेची तयारी आता सुरू झाली आहे.

(संकलन : कोमल आचरेकर, प्राची परांजपे, सायली पाटील)