व्यक्तिमत्त्व विकास, छंदवर्ग यांची शिबिरं  आपण नेहमीच ऐकतो, तिथं जातोही. पण नेहमीच्या समर कँपऐवजी एकदा तरी श्रमदान करायला जायला हवं. समाजाचं ऋण फेडायची ही संधी घ्यायलाच हवी.
रस्ता क्रॉस करू पाहणाऱ्या आजी असोत वा सायकलवरून पडलेलं मूल, कितीही घाईत असलो तरी दोन क्षण थांबून मदतीचा हात देऊन जो आनंद मिळतो त्याला तोड नसते. त्यात कोणी पाठ थोपटली तर बात औरच! दुर्लक्ष करून मनाला सततची रुखरुख लावण्यापेक्षा हे समाधान नेहमीपेक्षा थोडं जास्त सुखावतं. पण त्याच्याही पलीकडे जाऊन कोणातरी अनोळखी व्यक्तीसाठी काहीतरी मिळून करणं यापेक्षा खूप वेगळं असतं. तेव्हा ते समाधान सुखाच्याही पलीकडचं असतं.
कदाचित हे ओळखून श्रमसंस्कार छावण्यांचा जन्म झालेला असावा. ही श्रमसंस्कार छावणी म्हणजे एक प्रकारचं शिबीरच; जिथे साधारणत: संरचनात्मक आणि सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी, हल्ली सोशल नेटवर्किंग साइट्सवरूनसुद्धा तरुणांना बोलावणं पाठवून (शक्यतो माऊथ पब्लिसिटीच असते) तरुणांना ऐच्छिक सहकार्याचं आवाहन केलं जातं. काम काहीही असू शकतं.. शेतात काम करणं, बंधारे उभारणं, मागास आणि आदिवासी समाजासाठी विविध वस्तू व सुविधा पुरवणं.. त्यात कपडे, वह्य़ा-पुस्तकं आणि अगदी वैद्यकीय सेवासुद्धा येते. अर्थात, यात तरुण म्हणजे साठीचे आजोबासुद्धा असतात. इथे फक्त मनाच्या तरुणाईची अपेक्षा! एखाद्या ठिकाणी सरकारने विकासात्मक बदल घडवण्याची वाट न पाहता विविध सामाजिक संस्था अशी शिबिरं आयोजित करतात. तेव्हा दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टय़ा लक्षात घेऊन काही ठिकाणी मुलांच्या सहकार्याने दिवसातील काही वेळ विशिष्ट कामांना दिला जातो. इतर वेळ व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी दिला जातो.
वर्षभर एन.एस.एस., रोटरॅक्ट वगैरेमध्ये कार्यरत असणारी ऋचा सावरगावकर म्हणते, ‘आपण जगाचा वेध घ्यायला जातो, स्वत:च्या कुवतीची परीक्षा घेऊ  पाहतो तेव्हा असं जाणवतं, की आपण खूप काही करू शकतो. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शिबिरांमुळे इतरांकडे एम्पथाइज्ड मॅनरने बघायला शिकतो. शिवाय श्रमसंस्काराच्या निमित्तानं भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर तिकडची संस्कृती अधिक समजते. निसर्गाच्या जवळ जाण्याची संधीसुद्धा तिथेच मिळते. काहीतरी नवीन करण्याचं थ्रिल तर असतंच. नवी माणसं, नवी जागा आणि नवी जीवनशैली अनुभवण्यातली मजा निराळीच!’
शहरी मुलांचा याकडे कल वाढणं यात वावगं काहीच नाही. रुटीन लाइफपेक्षा हे खूप वेगळं आणि छान असतं. श्रमसंस्कार. यातही कलेचं शिक्षण असतं.. माणूस बनण्याच्या कलेचं! धनापेक्षा मनाचं श्रेष्ठत्व खऱ्या अर्थाने समजतं ते अशाच ठिकाणी!
श्रमसंस्कार शिबिराला जाणारा एक मित्र तन्मय बने त्याचा अनुभव शेअर करताना म्हणाला की, ‘चंद्रपूरमधल्या सोमनाथच्या शिबिरात मी पहिल्यांदा गेलो तेव्हा आम्ही प्लास्टिकच्या बाटल्या, न वापरता येणारे टायर्स यांपासून बंधारे उभारले. पाण्याची भूजल पातळी वाढावी यासाठी सरकारने ‘पाणी जिरवा, पाणी वाचवा’ ही योजना आखलेली. ती आम्ही प्रत्यक्षात अवलंबत होतो. बंधाऱ्याचं काम आम्ही मे महिन्यात केलं. त्यामुळे ओसाड वाटणारा तो भाग पाहावा तर पुढच्या वर्षी हिरवागार झालेला. गोरेगोमटे चेहरे रापून जाईपर्यंत कष्ट केल्यावर मनाला थंडावा मिळतो आणि कष्टाचं चीज होतं. योग्य विशेषण न सापडावं इतका आनंद होतो. आपण नांगरलेल्या जमिनीवर डुलणारं शेत दिसलं की मातीशी असलेलं नातं आणखी घट्ट होतं.’
या शिबिरांमधून शिकायला मिळतं ते टीम वर्क. न पेलवणारी दगड-विटांची टोपली धरायला कोणी हात दिला तर तिचा भारही हलका होतो आणि नवी नाती फुलतात. तिथेच माझ्यातलं ‘मी’पण संपतं. ‘तुझं-माझं’त्वाची जागा ‘आपण’त्व घेते. मदतीचं महत्त्व आणि आपलं अपूर्णत्व खऱ्या अर्थाने समजतं. अशा वेळी विंदांचं ‘देणाऱ्याने देत जावे..’ हे काव्य आठवल्यावाचून राहत नाही.
वेगवेगळ्या संस्थांनी मेळघाटात आयोजित केलेली वैद्यकीय शिबिरंसुद्धा श्रमदानासारखीच.. तिथल्या आदिवासी गावांतल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवताना अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींची काळजी घ्यावी लागते. विजाही नसलेल्या भागांतून जेव्हा ते त्यांच्या चिघळलेल्या, दुर्लक्ष केलेल्या जखमांसहित शिबिराच्या ठिकाणी येतात आणि अनस्थेशियाशिवाय उपचार करवून घेतात ते पाहताना त्यांच्या सहनशक्तीचं नवल वाटतं. ‘मैत्री’सारखी मेळघाट, मराठवाडय़ात काम करणारी संस्थासुद्धा अशा वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करते.
सुट्टय़ांमधला मोकळा वेळ सत्कारणी लावण्याची तुमची इच्छा असेल तर अशा शिबिरांना आवर्जून जायला हवं. स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या देवमाणसांच्या छायेखाली काही क्षण घालवले तरी त्यातून खूप काही मिळतं. त्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि अनुभवांची शिदोरी.. समाजाचे ऋण फेडायची ही संधी एकदा तरी अनुभवावी अशीच असते. 

गोरेगोमटे चेहरे रापून जाईपर्यंत कष्ट केल्यावर मनाला थंडावा मिळतो आणि कष्टाचं चीज होतं. योग्य विशेषण न सापडावं इतका आनंद होतो.     – तन्मय

श्रमसंस्कार शिबिरासाठी गावी जाताना काहीतरी नवीन करण्याचं थ्रिल तर असतंच. नवी माणसं, नवी जागा आणि नवी जीवनशैली अनुभवण्यातली मजा निराळीच!     -ऋचा