या वर्षी अक्षय्य तृतीयेपासून लग्नसराई पुन्हा सुरू झाली आहे. आता या वेडिंग सीझनमध्ये सेमीस्टिच्ड साडी, रेडीमेड ब्लाऊझ असा ट्रेण्ड आहे. लग्नाचा बस्तादेखील ऑनलाइन बांधला जातोय. त्यामुळे यंदा खरेदीपासून फॅशनपर्यंत खरा ट्रेंड आहे
 ‘टेक इट इझी’ हाच.
तरुणाईची एकंदर आवड पाहता या वेिडग सीझनमध्ये एखादा टोटली नवीन ट्रेंड आलेला नाही. त्याऐवजी पारंपरिक पद्धतीच्या पोषाखालाच बहुतेक जण लग्नकार्यात पसंती देताना दिसताहेत. एथनिक वेअर हा जरी जुना ट्रेण्ड असला तरी त्याच्या खरेदीची पद्धत बदलली आहे. आधी बाजार फिरून कापड आणा, ते शिवून घ्या, त्यावर साजेशा ज्वेलरीच्या शोधात पुन्हा बाजार पालथा घाला. साडी नेसायची तर आधी आवडीची साडी विकत घ्या, त्यावरचे ब्लाऊझ शिवून घ्या.. या सगळ्या धावपळीऐवजी तरुणाई ‘इझी टू वेअर’ सेमी स्टिच्ड ड्रेसेस आणि साडय़ांकडे वळली आहे. या वेडिंग सीझनमध्ये ‘टेक इट इझी’ असाच ट्रेण्ड खऱ्या अर्थाने दिसतोय.
तरुण मुली पंजाबी ड्रेस किंवा सलवार कमीजपेक्षा साडी, घागरा- चोलीकडे अधिक आकर्षति होत आहेत. कदाचित हा डेली सोप्समध्ये दाखवल्या जाणाऱ्या ड्रेसिंगचा इफेक्ट असू शकेल. म्हणूनच टीव्हीवर दिसतात तशा ‘हाफ स्टिच्ड’ साडय़ांची डिमांड बाजारात पुन्हा एकदा वाढताना दिसते आहे. साडी कुठल्याही प्रकारची असूदे हाफ स्टिच्ड किंवा पूर्ण पारंपरिक पद्धतीने नेसायची असली तरी तिला शोभून दिसेल असा ब्लाऊझ वेळेत तयार करून घेणे म्हणजे एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमधली टास्क पूर्ण करण्यासारखं झालंय हल्ली. साडीतून मिळणाऱ्या कटपीसचा ब्लाऊझ शिवून घेणं ओल्ड फॅशण्ड मानलं जाऊ लागलं. ब्लाऊझचा भाव साडीएवढाच वाढलाय सध्या. कारण सुंदर पॅटर्नचं, वर्क केलेलं ब्लाऊझ हल्ली फॅशनमध्ये आहेत.
कॉकटेल ब्लाऊझ
आता एखादं कार्य अचानक आलं तर हमखास धांदल उडते. आयत्या वेळेला कुठला टेलर आपल्याला हवे तसे कपडे शिवून देईल?  
त्यामुळे रेडिमेड ब्लाऊझला पसंती मिळायला लागली आहे. साडीवरचा महागडा ब्लाऊझ मी अजून कशावर घालू शकते? या प्रश्नातून ‘मल्टीपर्पज ब्लाऊझ’चा पर्याय बरेच डिझायनर्स देतात. ‘हे ब्लाऊझ वर्क केलेले असतात आणि वेगवेगळ्या साडय़ांवर, घागऱ्यावर किंवा क्वचित लाँग स्कर्ट आणि पलॅझो पँटवरही एखाद्या क्रॉप टॉपसारखे घालता येऊ शकतात’, अशी माहिती डिझायनर श्वेता पोळ दर्वेशी हिने दिली. कॉकटेल ब्लाऊझ ही संकल्पना त्यातूनच आली आहे. ‘सोच’ या एथनिक ब्रँडने ‘इरा’ नावाचं कॉकटेल ब्लाऊझ कलेक्शन नुकतंच बाजारात आणलंय. साधारण ९०० रुपयांपासून पाच हजार रुपयांच्या रेंजमध्ये ही कॉकटेल ब्लाऊझ आहेत.
ऑनलाइन बस्ता
लग्नाची खरेदी सोपी आणि सहज करण्यासाठी तरुणाई हल्ली तंत्रज्ञानाची मदत घेतेय. लग्नाचा बस्ता चक्क ऑनलाइन बांधला जातोय. ऑनलाइन मार्केटमध्ये ‘सेमी स्टिच्ड ड्रेसेस’ला मागणी वाढली आहे. डिझायनर मिहिर परुळेकर म्हणतात, ‘‘लोकांना इझी टू वेअर सोप्या गोष्टींबरोबरच ऑथेंटिक गोष्टीही अपेक्षित आहेत आणि त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना त्यांचा कल ब्रँडेड कपडे आणि दागिने यांच्या कडे अधिक आहे.’’  लग्नात रिटर्न गिफ्ट देण्याचा ट्रेंड सुरू आहे. पूर्वी ‘रिटर्न गिफ्ट’ असं नाव नसलं तरी साडय़ा, शर्ट पीस, पँट पीस असं नातेवाईकांना दिलं जायचंच. लग्नाचा बस्ता त्यासाठीच बांधला जायचा. हल्ली कपडे गिफ्ट करण्यापेक्षा तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा वस्तू दिल्या जातात. मग त्यांमध्ये किचनमध्ये वापरता येतील अशा वस्तूंचा समावेश अधिक आहे.
सम्जुक्ता मोकाशी