ओपन-अप सुरू होऊन सहा महिने झाले बघता-बघता. एक पॉझ घ्यावा, थोडं मागे वळून बघावं म्हणून मागचे सगळे इश्यूज चाळले. असे पॉझेस आवश्यक असतात नाही पुढे जाण्याआधी!
सर्वात आधी, सगळ्या प्रश्नांना इन्क्लूड करता न आल्याबद्दल सॉरी. जागेअभावी ते शक्य नव्हतं आणि वेळेअभावी ई-मेलवर उत्तरं पाठवणंही जमलं नाही.
तुमच्या वयोगटाला अनुसरून अर्थात जास्तीत जास्त प्रश्न प्रेम, आकर्षण आणि करिअरविषयक होते. काही प्रश्न शारीरिक बाबींविषयीही होते. आजकाल इतके करिअर ऑप्शन्स उपलब्ध असतात, की खरंच गोंधळायला होतं, शिवाय प्रत्येक करिअर ‘त्यातून किती लवकरात लवकर नोकरी लागेल आणि ती किती मोठं पॅकेज देणारी असेल’ याच फुटपट्टीवर मोजलं जातं. मग आपण आपली आवड, आपलं कौशल्य बाजूला ठेवायचं का, असा प्रश्न पडतो. या शिक्षणातून माझी पैसे मिळवणं हीच अपेक्षा आहे, की आणखी काही, हे समजून घेऊन मग पुढचा निर्णय घ्यायला हवा. तीच गोष्ट प्रेमात पडण्याची. वयात येणं आणि लग्न करणं या दोन गोष्टींमध्ये हल्ली बरीच गॅप पडलीय. या मधल्या काळात शरीर मात्र फिजिकल रिलेशनशिपसाठी तयार असतं, नव्हे अधीर असतं. त्यातून अनेक प्रश्न उद्भवतात. आत्ता या सगळ्याविषयी विचार नको, लग्नाच्या वेळी बघू, असं म्हणून हे प्रश्न निकाली काढता येणार नसतात, पण अगदी बालिशपणे ही नवीन नाती हाताळण्याऐवजी थोडय़ा मॅच्युरिटीनं ती हाताळायला आपण शिकलं पाहिजे. बॉलीवूडमधल्या रोमँटिक कल्पना बाजूला ठेवून रिअ‍ॅलिटीला फेस केलं पाहिजे.
कॉलमचं स्वरूप जरी तुमचे प्रश्न-आमची उत्तरे असं होतं तरी कुठल्याही प्रश्नाचं डायरेक्ट सोल्यूशन देणं मी टाळलं. याला कारण आहे. तुमच्या वयोगटाची विचारसरणी बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे ‘कुणी तरी काही तरी सांगितलं आणि तुम्ही ते केलं’ असं होत नाही. त्यामुळे या परिस्थितीत तू असं कर, असा माझा सल्ला तुम्हाला आवडणार नाही आणि पचणारही नाही; पण अजूनही तुमच्या विचारांची इंटेन्सिटी खूप असते. त्यामुळे एखादी भावनिक किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर कन्फ्यूज व्हायला होतं. विचारांच्या गुंत्यात अडकल्यामुळे क्लिअर थिंकिंग जमत नाही. ‘प्रेझेंट’मध्ये इतकं गुंतून जायला होतं, की या समस्येचं ‘फ्यूचर’ किंवा भविष्य काय असेल हे इमॅजिनच करता येत नाही. सोल्यूशन जवळच कुठे तरी असतं, पण दिसत नाही. अशा वेळी तुम्हाला गरज असते ती फक्त थोडा मार्ग दाखवण्याची, विचारांच्या अननेसेसरी जंजाळातून बाहेर काढण्याची. उत्तर तुमचं तुम्हीच शोधून काढणार असता. लोकांनी दिलेले सल्ले, स्वत:च्या मनातले उलटसुलट विचार आणि कधीकधी समोर ठाकलेली ब्लँक वॉल या सगळ्या अडथळ्यांतून शेवटी वाट निघणार असते. ही वाट शोधायला थोडीशी मदत हाच ओपन-अपचा उद्देश आहे. तुमच्याशी अशाच अनेक व्हेरीड विषयांवर गप्पा मारण्याची आम्ही वाट बघतोय. भेटत राहूयात व्हिवामध्ये दर शुक्रवारी!

ओपन अप
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.