मी अठरा वर्षांची असून ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इअरला आहे. माझी उंची ५.३ फूट आणि वजन ६५ किलो आहे. माझी पिअर शेप बॉडी आहे. मांडय़ा आणि खालचा भाग जरा जाड आहे. वर्ण गव्हाळ असून चेहरा गोल आहे. मला काही वेगळ्या ऑकेजनसाठी वेस्टर्न अटायर ट्राय करायचंय. मी नेमकं काय घातलं पाहिजे? वन पीस ड्रेस किंवा जम्पसूट मला सूट होईल का? पेप्लम टॉप्स मी वापरू शकते का? की आणखी काही वेगळं ट्राय करू?    – गायत्री

प्रिय गायत्री,
तुझ्या वर्णनावरून आणि वजन, उंचीवरून तू मध्यम बांध्याची मुलगी वाटतेस. कमरेखालचा भाग थोडा जाड आहे, असं तू म्हटलं आहेस. हे वैगुण्य लपवूनही स्टायलिश दिसण्याचे अनेक उपाय आहे. वेस्टर्न वेअर तू नक्कीच कधीही घालू शकतेस. कॅज्युअल म्हणून किंवा स्पेशल ऑकेजनसाठीदेखील तू वेस्टर्न वेअरचा पर्याय नक्कीच चोखाळायला हरकत नाही. जाड दिसायला नको असेल तर काही गोष्टी करायला आणि काही टाळायला हव्यात.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शरीराच्या वरच्या अध्र्या भागावर लक्ष केंदित केलं पाहिजे. म्हणजे थिक हिपलाइन असली तरी त्याकडे दुर्लक्ष करता येतं. आता हे साधायचे पर्याय कोणते? तर योग्य रंगाची निवड आणि कॉन्ट्रास्ट, टेक्श्चर, सिलोएट्स यांचा योग्य वापर. काळा, कॉफी ब्राऊन, मरून यासारखे डार्क कलर वापरले तर व्यक्ती थोडी बारीक असल्याचा भास होतो. लाइट कलरचा टॉप आणि अशा डार्क कलरचे बॉटम्स वापरून तू स्ट्रायकिंग कॉन्ट्रास्ट इफेक्ट साधू शकतेस.
आता टेक्श्चर किंवा कापडाचा पोत. कधीही जाड, चमचमणारं किंवा हेवी टेक्श्चरचं कापड बॉटम्ससाठी वापरू नकोस. त्यामुळे खालचा भाग आणखी जाड आहे, असं भासेल. त्याऐवजी हलक्या वजनाचं कापड वापर. लेअर्ड टॉप्स किंवा झालर, कॉलर असलेले टॉप्स, ड्रेसेस, व्ही शेपचे टॉप्स अशी वेगळी सिलोएट्स टॉपसाठी वापर. म्हणजे वरच्या भागाकडेच फॅशन केंद्रित होईल. स्लिम फिटेड टॉप्स, बटन डाऊन शर्ट्स वापरायला हरकत नाही. ऑकेजननुसार नेक लाइनमध्ये बदल करता येतील. लो नेकलाइन, ऑफ शोल्डर असं वैविध्य आणता येतं. बाह्य़ांमध्येही फुग्याच्या बाह्य़ा किंवा बॅट स्लीव्हज वापरून बघ.
अपर बॉडीकडेच लक्ष केंद्रित करण्याचा दुसरा उपाय म्हणजे कापडाच्या हेमलाइनवर लक्ष देणं. हेमलाइन म्हणजे जिथे कपडा संपतो ती रेषा. त्यामुळे ए- लाइन स्कर्ट किंवा ड्रेस अथवा झालरीचे कपडे, बेल बॉटम्स फिश कट्स हे वापरू शकतेस. कारण तुमच्या शरीरापेक्षा कापडाचा घेरा मोठा असतो, तेव्हा सहाजिकच त्यात बारीक दिसायला होतं. पण हे सगळे व्यवस्थित फिटिंगचे हवे. हिपलाइनशी असलेल्या प्लीट्स किंवा चुण्या असलेले ड्रेस शक्यतो टाळलेले बरे. पेपलम ट्राउझर्स, प्लीटेड स्कर्ट किंवा झालरचे स्कर्ट म्हणूनच वापरू नको. त्याऐवजी ए- लाइन सगळ्यात बेस्ट. कार्गो पँट्स फंकी पॉकेट्स किंवा एम्ब्रॉयडरी असणाऱ्या जीन्स वापरू नको. नी लेंथचे किंवा गुडघ्याच्या जरासं खाली संपणारे ड्रेस किंवा स्कर्ट बेस्ट. जम्पसूट वापरण्याचा सल्ला मी देणार नाही. कारण त्यामध्ये व्यक्ती जाड दिसते.
वर दिलेलं डूज आणि डोण्ट्स पाळलेस तर इंडियन किंवा वेस्टर्न दोन्ही स्टाइलचे कपडे तुला शोभून दिसतील. रंगाबद्दल बोलायचं तर तुझ्या गव्हाळ वर्णाला बहुतेक सगळे रंग सूट होतील. मिल्की व्हाइट, क्रीम, ऑफ व्हाइट, ग्रे, ब्लॅक, ब्राऊन, कॉफी, मरून, क्रिमसन, लाइट ऑरेंज, पीच, रोज, लेमन यलो, मस्टर्ड, लाइट ग्रीन, इंग्लिश ग्रीन, स्लेट, इंडिगो आणि निळ्याच्या सगळ्या छटा तुझ्यावर उठून दिसतील.
हिपलाइनऐवजी दुसरीकडे फॅशन केंद्रित करण्यासाठी अ‍ॅक्सेसरीज आणि दागिन्यांचाही परिणामकारक वापर करता येईल. मोठं पेंडंट, नेकपीस अशी बोल्ड ज्वेलरी तू वापरू शकतेस. मोठय़ा इअररिंग्ज आणि ब्रूचसुद्धा छान दिसेल. क्लचेस, हेड अ‍ॅक्सेसरीज आणि गॉगल्स यांनी तुझा लुक पूर्ण होईल. योग्य हेअरस्टाईलही चांगलं दिसण्यात मोठी भूमिका बजावते. तुझा चेहरा गोल आहे. त्यामुळे शक्यतो तू केस मोकळे ठेव, त्यामुळे कान आणि चेहऱ्याची एक बाजू झाकली जाईल. याशिवाय केसाला मधून उंच उचलून (फुगा काढून) हेअरस्टाइल केल्यानं उंचीचा फील येतो. जुन्या सिनेमातली रेट्रो हेअरस्टाइल आठव. थोडक्यात काय, वरती नमूद केलेले मुद्दे लक्षात घेऊन ड्रेसिंग आणि स्टायलिंग केलंस तर तुला कुठलेही कपडे चांगले दिसतील.