दिवाळीसारख्या सणाला प्रियजनांना, भाऊबीजेनिमित्त बहिणीला भेट दिली जाते. पण गिफ्ट काय द्यायची हा भलामोठा प्रश्न पडतोच. त्यावरचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय दोन आयआयटीयन्सनी. त्यांच्या या डोकॅलिटीची गोष्ट.
दिवाळीची लगबग घरोघरी सुरू झालीये. साफसफाई, फराळ, दिवाळीचं शॉिपग यासाठी बाजारामध्ये तर गर्दी होताना दिसतेच आहे. एवढेच नाही तर ऑनलाइन शॉिपग साइट्सवरही सेल्सनी जोर धरलाय. पण दिवाळीच्या शॉिपगमध्ये आपल्या स्नेहीना, हितचिंतकांना काय गिफ्ट्स द्यायचे हा प्रश्न पडतोच. कारण मिठाई, चॉकलेट, सुकामेवा, क्रोकरी अशा ठरलेल्या गोष्टी आपल्या देऊन झालेल्या असतात. भाऊबीजला तर गिफ्ट तर मस्ट आणि तीदेखील बहिणीला आवडेल अशी. ही फारच पंचाईत होऊन बसते ना!
बऱ्याचदा खूप डोकेफोड करून, फिरून, वेळ आणि पसे खर्च करूनही आपल्याला हवं तसं गिफ्ट देता येत नाही. दिल्ली आय.आय.टीअन्सनी स्वतच्या अशाच अनुभवातून ‘विशपिकर’ या वेबसाईटची निर्मिती केली आहे. विशपिकर वेबसाइटचं वैशिष्टय़ म्हणजे आपण कोणाला कोणतं गिफ्ट द्यावं यासाठी आयडिया देणारी अशी ही वेबसाइट आहे.
दिल्लीच्या आयआयटीमधून नुकताच पास आऊट झालेला अपूर्व बन्सल गर्लफ्रेंडला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट द्यायचं या विचारात होता. त्याने अनेक ऑनलाइन शॉिपग साइट्स सर्च केल्या. समोर उघडलेल्या अनेक पर्यायातून ‘बेस्ट गिफ्ट’ ठरवण्याचा प्रयत्न केला.
पण अखेर थोडी निराशाच पदरी पडली. ती ‘परफेक्ट गिफ्ट’ ठरली नाही. अपूर्वचा आयआयटीमधलाच मित्र प्रतीक राठोड यालासुद्धा असाच अनुभव आला होता. उच्च शिक्षणासाठी तो स्पेनला गेला असताना आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट द्यायच्या विचारात पडला. ऑनलाइन शॉपिंगचा मार्गच त्याच्यापुढे होता. पण त्या जंजाळातून नेमकं गिफ्ट काही त्याला सुचेना. शेवटी बहिणीला ‘मॉलमधून गिफ्ट घे’ असे सांगण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
परफेक्ट गिफ्ट शोधताना सगळेच या प्रॉब्लेममधून जातात. याचं सोल्युशन मग याच दोन मित्रांनी शोधलं. गिफ्टिंग आयडिया देणाऱ्या वेबसाइटच्या माध्यमातून. या दोघांनी ‘विशपिकर’ नावाने या साइटची निर्मिती केलीये. तेजेंद्र सिंग, धीरज ठाकूर आणि संचिता मेहता हे इतर समवयस्क मित्रदेखील या जोडगोळीसोबत ‘विशपिकर’मध्ये सहभागी झाले आहेत.
परफेक्ट गिफ्ट काय असेल हे कुणाला द्यायचंय यावर अवलंबून असतं. ती भेट ज्या व्यक्तीसाठी असेल तिच्याशी असलेलं तुमचं नातं, व्यक्तीचं वय, निमित्त, व्यक्तीची आवडनिवड, पर्सनॅलिटी, बजेट यानुसार या वेबसाइटवर गिफ्ट आयडिया सूचित केली जाते. फ्लिपकार्ट, मिन्त्रा, हॅपिली अनमॅरिड या आणि अशा इतर २५  ई-कॉमर्स स्टोअर्सशी ‘विशपिकर’ या वेबसाइटच्या माध्यमातून अ‍ॅक्सेस करता येतो. पर्सन्लाइज्ड गिफ्टसाठी वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध होताना पाहायला मिळतात. सरधोपटपणे अभ्यास आणि नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीमध्ये साध्या गोष्टीतून उद्योगाला चालना देणारी अपूर्व आणि प्रतीकची जोडगोळी म्हणूनच वेगळी दिसते. कल्पनेतून उद्योजकतेची पायाभरणी करणाऱ्या या जोडगोळीची गोष्ट म्हणूनच प्रेरणादायी आहे. अशीच कुठली वेगळी आयडिया आणि त्यातून निर्माण झालेला वेगळा व्यवसाय तुमच्या परिचयाच्या कुणा तरुणानं सुरू केला असल्यास आम्हाला त्या विषयी कळवा.