दिवाळीसारख्या सणाला घर सजवण्यासाठी रीड डिफ्यूजरची आवर्जून खरेदी केली जात आहे. उदबत्ती, धूप यानंतर आले रूम फ्रेशनर्स, आता जगभरात सगळीकडे ट्रेण्ड आहे रीड डिफ्यूजर्सचा.
स्वच्छ केलेलं घर, प्रसन्न वातावरण निर्माण करणारी सजावट, दारापुढे रांगोळी, आकाशकंदील आणि घरातल्या माणसांना प्रसन्न करणारा सुगंध.. दिवाळीसारख्या सणाला हे सगळं बहुतेक सगळ्या घरांमध्ये दिसतं. सुगंधानं चित्तवृत्ती खुलते, मन प्रसन्न होतं हे सिद्ध झालेलं आहे. अ‍ॅरोमा थेरपी म्हणून ही सुगंधी जादू जगभरात मान्य झाली आहे. आपल्याकडेही ही सुगंधी परंपरा पूर्वापार चालत आली आहे. म्हणूनच मांगल्याचं, चैतन्यानं भारलेलं वातावरण निर्माण होण्यासाठी देवघरात आवर्जून उदबत्ती, धूप लावले जातात. आपल्याकडे सुगंधी कापूरारती करण्याची पद्धत जुनी आहे. सणांना अत्तरं, धूपबत्ती, सुगंधी तेलं याची आवर्जून खरेदी केली जाते. अत्तर, परफ्यूम, सेंट याबरोबर दिवाळीसारख्या सणाला आठवण होते ती रूम फ्रेशनर्सची. खोलीत मंद सुगंध दरवळत ठेवण्यासाठी हल्ली धूपकांडी, अगरबत्ती याशिवाय असे रूम फ्रेशनर्स वापरले जातात. अ‍ॅरोमा थेरपीवर विश्वास ठेवणारे अनेक जण आपल्या खोलीमध्ये, ऑफिसमध्येही चित्त प्रसन्न ठेवण्यासाठी कायमच असे रूम फ्रेशनर्स वापरतात. पण रूम फ्रेशनर्सबरोबर सध्याचा लेटेस्ट ट्रेंड आहे रीड डिफ्यूजर्सचा.
रीड डिफ्यूजर म्हणजे एका काचेच्या किंवा सिरॅमिक किंवा अगदी लाकडी पण आकर्षक बाटलीत ठेवलेल्या काडय़ा. या काडय़ांना अ‍ॅरोमा लिक्विडमध्ये बुडवून ठेवलं जात आणि त्या सुगंधी द्रव्याच्या प्रभावानं खोलीत सतत मंद पण उत्साहवर्धक दरवळ राहतो. कॅपिलरी अ‍ॅक्शनच्या तत्त्वावर रीड डिफ्यूजर काम करतो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या रीड म्हणजेच काडय़ा विशिष्ट प्रकारच्या असतात. बाटलीमधून थोडय़ा बाहेर येतील एवढी या काडय़ांची लांबी हवी. या रीड्स अ‍ॅरोमा ऑइलमध्ये थोडय़ा वेळ बुडवून ठेवल्या जातात आणि उलटय़ा करून पुन्हा त्या बाटलीत ठेवल्या जातात. सुगंधी द्रव्य शोषून घेण्याची क्षमता रीड्समध्ये असते. उलटय़ा करून ठेवल्यावर त्या वाळतात तेव्हा हवेत तो शोधलेला गंध पसरतो. त्यामुळे साहजिकच खोलीत अखंड सुगंध दरवळत राहतो.
असे रेडीमेड रीड डिफ्यूजर हल्ली बाजारात मिळतात. कुठल्याही शॉपिंग मॉल किंवा डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या होम सेक्शनमध्ये रीड डिफ्यूजर हल्ली हमखास दिसू लागले आहेत. रीड डिफ्यूजरच्या किटमध्ये बाटली, रीड्स आणि डिफ्यूजर ऑइल असतं. आपल्याला हव्या त्या सुगंधात रीड डिफ्यूजर मिळतात. घरच्या घरी रीड डिफ्यूजर बनवण्याच्या अनेक पद्धती सध्या यूटय़ूबसारख्या सोशल साइट्सवरही हिट आहेत. रीड डिफ्यूजरसाठी वापरण्याची बाटली आकर्षक आकाराची असली की ‘होम डेकॉर’चा एक घटक म्हणूनसुद्धा याचा वापर होऊ शकतो. आकर्षक, पारदर्शक आणि वेगळ्या आकाराच्या काचेच्या बाटल्या यासाठी वापरता येतील. ऑफिसमध्ये किंवा घराच्या एका कोपऱ्यात ठेवलेले असे आकर्षक रीड डिफ्यूजर खोली सुगंधी करण्याबरोबर तो कोपराही सजवतात. सजावट आणि अ‍ॅरोमा थेरपी असे दुहेरी उद्दिष्ट साधणारे रीड डिफ्यूजर म्हणूनच सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.