मी होस्टेलवर राहायला आल्यानंतर सुरुवातीला खूप गोंधळलो होतो. छोटय़ा गावातून आलो होतो शहरात, त्यामुळे कुणी काय सांगेल ते खरं वाटायचं. अनेक नवनव्या गोष्टींचं आकर्षण वाटत असे. मित्रांच्या आग्रहानं एकदा वेश्यावस्तीत गेलो. एका खोलीत थोडा वेळ थांबलो. तिथलं एकंदर वातावरण बघून मला तिथं बसवेना. मी मित्रांची नजर चुकवून निघून आलो. नंतर त्यांनी कितीही आग्रह केला तरी गेलो नाही. पण आता मला भयंकर भीती वाटते की मला एड्स वगैरे काही झाला नसेल ना? या शंकेनं मला रात्र-रात्र झोप येत नाही. मला एक मुलगी फार आवडते आमच्या कॉलेजमधली. पण हिंमत होत नाही तिला प्रपोज करायची. असं वाटतं की, आपल्याला काहीतरी रोग झाला असेल तर तिच्या आयुष्याची वाट नको लागायला. एकदा खात्री करून घ्यायचीच मला काही झालंय की नाही याची, कशी करता येईल? – संग्राम

हॅलो संग्राम, जे काही असेल त्याचा सोक्षमोक्ष आता लावूनच टाकायचा या निष्कर्षांप्रत आलायस तर तू आता. अनिश्चिततेत हेलकावत राहण्यापेक्षा हे बरं.
तरुण वयात प्रत्येक गोष्टीचं अतिशय कुतूहल वाटतं. ते शमवण्यासाठी स्वत: अनुभव घेऊन पाहण्याची तीव्र इच्छा असते. लैंगिक बाबतीतले प्रयोग, ड्रग्ज, दारू, वेगाशी खेळणं, भलती चॅलेंजेस घेणं, आहाराबाबत बेफिकिरी, दबावाला बळी पडणं अशा अनेक वर्तणुकीचा यात समावेश होतो. या सगळ्याला ‘हाय रिस्क बिहेवियर’ किंवा धोकादायक वर्तणूक असं म्हणतात. या काळजी करण्यासारख्या गोष्टी असतात. कारण त्या जिवावर बेतू शकतात किंवा त्यांचे कायमचे दुष्परिणाम शरीरावर आणि मनावर होतात.

नव्यानं मोठय़ा शहरात आल्यावर, मित्रांचा आग्रह होत असताना रेझिस्ट करणं किती अवघड असेल हे मी समजू शकते. मुळात असे प्रयोग करण्याची इच्छा होते. कारण अर्धवट माहिती आणि ती मिळवण्याचे चुकीचे सोर्सेस. मित्रांकडून मिळणारी माहिती नेहमीच ‘विथ अ पिंच ऑफ सॉल्ट’ घ्यावी लागते. कारण त्यांनीही ती अशीच कुठून तरी मिळवलेली असते. मजा करण्याचा, आपलं पौरुषत्व सिद्ध करण्याचा शुअरशॉट मार्ग म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा प्लॅन आखला असणार. या क्षणिक मोहातून पुढे काय ब्रह्मांड उद्भवू शकतं हे अशा वेळी मनातसुद्धा येत नाही. नंतर तुला एड्सविषयी आठवलं आणि मग मनात युद्ध सुरू झालं. लैंगिक बाबींविषयी शास्त्रीय माहिती असणं यासाठीच महत्त्वाचं आणि उपयुक्त असतं. एड्सविषयी तुला काळजी वाटतेय म्हणून थोडीशी माहिती देते इथे. एड्स हा शरीरसंबंधातून, रक्तामार्फत आणि आईकडून बाळाकडे संक्रमित होणारा आजार आहे. आजमितीला तरी यासाठी कोणती प्रभावी लस उपलब्ध नाही. उपचारांनी हा आजार काबूत ठेवता येतो पण पूर्णपणे बरा करता येत नाही. तो बरा व्हायला जितका अवघड तितकाच संसर्ग व्हायलाही खरं तर अवघड आहे, म्हणजे योग्य काळजी घेतली तर तो होऊ न देणं शक्य असतं. पण मुळात त्यासाठी काय काळजी घ्यायची याची माहिती हवी. सुरक्षित शरीरसंबंध, म्हणजे निरोध वापरणं, स्वैर व विवाहबाह्य़ संबंध टाळणं, एड्स झालेल्या गर्भवतीला योग्य ते औषधोपचार करणं, रक्त देताना व घेताना ते काळजीपूर्वक तपासणं, डिस्पोझेबल सुया वापरणं, अशा प्रकारे खबरदारी घेतली तर एड्स होणं टळू शकतं. जास्तीत जास्त एड्सचे नवीन संसर्ग दहा ते चोवीस वयोगटातल्या मुलांना होतात. कारण त्यांना ही माहिती नसते आणि उतावळेपणा आणि घाई असते. आजकाल अनेक जण लग्न ठरवण्यापूर्वी रक्तगट वगैरे तपासण्याऐवजी एड्सची तपासणी केली जावी असा आग्रह धरतात. कारण व्यक्तीकडे नुसतं बघून त्याला एड्स झाला आहे की नाही हे कळू शकत नाही.

तू सांगतोस त्यावरून तू तिथे फक्त काही वेळ थांबला होतास, हो ना? नुसत्या स्पर्शातून किंवा रूम, भांडी शेअर केल्यानं हा आजार पसरत नाही. प्रत्यक्ष शरीरसंबंध आला तरच हे जंतू पसरतात. तसं काही झालं नसेल तर तुला काळजी करण्याचं कारण नाही, थोडक्यात बचावलो म्हणून तू नि:श्वास सोडू शकतोस. तरीही तुला खात्री करायची असेल तर एखाद्या चांगल्या लॅबमधून तुला यासाठीची रक्ताची तपासणी करून घेता येते. त्यापेक्षा बेटर पर्याय म्हणजे एखाद्या फिजिशियनकडे जाऊन तुझी भीती शेअर कर. तिथे तुला तुझ्या शंकांची योग्य उत्तरं मिळतील आणि तपासणीचा मार्गही कळेल.
Look forward with hope, not backwards with regret.

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.