पाळीव प्राणी ही जगातली सगळ्यात भाग्यवान जमात असते. कारण ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असतात, त्यांच्या लाडाला आणि कोडकौतुकाला पारावार नसतो. या प्राण्यांवरील प्रेमाची पुढची पायरी म्हणजे, त्यांच्या कपडय़ांपासून ते मेकअपपर्यंत सगळ्याच गोष्टींची काळजी या मालकांकडून घेतली जाते. त्यासाठी पाळीव प्राण्यांच्या स्पा, पार्लर्स पाहायला मिळताहेत. इतकंच नाही तर, कित्येक डिझायनर्स आता पेट्ससाठी कलेक्शन्स तयार करू लागले आहेत आणि त्यांचे फॅशन शोजसुद्धा होत असतात. कपडेच नाही तर पेट अॅक्सेसरीजही हल्ली चलतीत आहेत. डॉग बेल्ट्स, कॅट बेल्स, कॅप, शूज अशी बरीच व्हरायटी या अॅक्सेसरीजमध्ये बघायला मिळते. पेट फॅशनमध्ये तुम्ही काय काय करू शकता याची ही झलक.. पाळीव प्राण्यांसाठी पहिली खरेदी केली जाते ती, टी-शर्टची. त्यासाठी चार दुकाने शोधण्याची तयारीसुद्धा असते. पण त्याला पर्याय म्हणून लहान मुलांचे कपडेसुद्धा वापरू शकता.* कुत्र्यांसाठी कपडे निवडताना ब्राइट कलर्स निवडावेत. कार्टून्सचे प्रिंट्स, वन लाइनर्स टी-शर्ट्ससुद्धा वापरू शकता. स्ट्राइप्स, पोल्का डॉट्स, चेक्ससुद्धा वापरू शकता. नेहमीच्या जर्सीच्या टी-शर्ट्सना पर्याय म्हणून सध्या स्वेड, वूलन फॅब्रिकमधील टी-शर्ट्स पाहायला मिळतात. * कित्येकदा कुत्र्यांना कपडे घालणं किंवा त्यांच्या साइजचे कपडे मिळणं कठीण असतं, अशा वेळी टी-शर्ट्सना झिप असणं उत्तम. एका जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातले जुने शर्ट्स कापून त्यांचा वापर करून त्यांच्या कपडय़ांना खास फॅशनेबल टच तुम्ही देऊ शकता. * कुत्र्यांसाठी वापरात येणाऱ्या साखळ्यांमध्येही सध्या बरेच पर्याय आले आहेत. नेहमीच्या स्टीलच्या साखळीपेक्षा रंगीत, फंकी चेन्स सध्या उपलब्ध आहेत. * पेट्सच्या बाबतीत बरेचदा वापरली जाणारी अॅक्सेसरी म्हणजे बो. सध्या खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बोज बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. एक चांगला बो तुमच्या पेटचा अख्खा लुक तयार करू शकतो. त्यामुळे बो निवडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला स्वत: बो तयार करायचा असेल, तर साधे बोसुद्धा बाजारात उपलब्ध असतात, त्याच्यावर तुमच्या पसंतीने डेकोरेशन करू शकता. * पेट्ससाठी वापरात येणारे नेकलेस सध्या बाजारात दिसत आहेत. या नेकलेसमध्ये खूप पर्याय पाहायला मिळतात. * याशिवाय त्यांच्या एका पायात ब्रेसलेट किंवा केसांचा छान पोनीटेल बनवून त्याला छान बो लावू शकता. * पेट्सच्या कॅप्स किंवा मुकुटसुद्धा उपलब्ध आहेत. पेटच्या हेअर स्टाइल्ससाठी वेगवेगळ्या, फॅन्सी अॅक्सेसरीजसुद्धा मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे सनग्लासेससुद्धा पेट्ससाठी पाहायला मिळतात. * कित्येक सुपरहिरोजचे पोशाखसुद्धा पेट्ससाठी मिळू लागले आहेत. त्यात सुपरमॅन पेट्सचाही लाडका आहे. बार्बीसारखा नट्टाफट्टा करायचीही तुमच्या डॉगीसाठी सोय आहे.* याशिवाय रात्री झोपताना पेटला मॅचिंग नाइट ड्रेससुद्धा बनवून घेता येतो. पावसाळ्यात त्यांना भिजायला होऊ नये म्हणून खास छत्री आणि रेनकोटसुद्धा बनवून मिळतात. फॅशन डिझायनर्स हे रेनकोट डिझाइन करू लागले आहेत.* पण हे सर्व करताना एक गोष्ट लक्षात असू द्यात की, पेट फॅशनचा अतिरेक होता कामा नये. हा प्रकार खूपदा फिमेल पेट्ससोबत पाहायला मिळतो. कित्येकदा त्यांना गर्ली लुक देण्याच्या नादात जास्तीत जास्त सजवण्याच्या प्रयत्नात काहीतरी बिनसतं. * कित्येक पेट्सना कपडे, अॅक्सेसरीज घालणं आवडत नाही. अशा वेळी त्यांच्या मनाविरुद्ध काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना सजवताना त्यांच्या अडचणींची आणि त्यांच्या पसंतीची काळजी घ्या.* पेट्सचे कपडे खराब होऊ नयेत, अॅक्सेसरीज तुटू नयेत म्हणून बांधून ठेवणार असाल तर, या सगळ्या कौतुकांचा काही उपयोग नाही. त्यांना अडकवून ठेवून त्यांची नाराजी ओढावून घेणं उचित ठरणार नाही.