त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कपडय़ांच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या खरेदीपासून ते त्यांचे बर्थ डे अगदी पार्टीसह सेलिब्रेट करण्यापर्यंत अनेक गोष्टी हल्ली हौसेनं केल्या जातात.
नाटय़ अभिनेत्री रेश्मा रामचंद्रला घरातला पेट हा ‘स्ट्रेसबस्टर’ वाटतो. ‘माझ्याकडे जर्मन स्पिट्झ आहे. त्याचं नाव कोको. १२- १३ तासांच्या कामानंतर, रात्री-अपरात्री शूटिंग करून दमून घरी येते तेव्हा, दार उघडल्यावर कोको दारात हजर असतो. त्याचं ते आल्या आल्या उत्साहानं वेलकम करणं पाहिलं की थकवा निघून जातो. कितीही उशीर झाला तरी कोको माझ्यासाठी जागा असतो. त्याच्याशी आल्या आल्या १५ मिनिटं खेळावंच लागतं मग. त्या १५ मिनिटात सगळा दिवसभराचा ताण निघून जातो. घरात प्रेमाची माणसं असतात. पण निरपेक्ष प्रेम केवळ प्राणीच करू शकतो. आपल्याला इतर व्यवधानं असतात.. घराखेरीजचं जग असतं. पण घरातल्या प्राण्याला मात्र फक्त आपण असतो. म्हणूनच तो खरी सोबत करतो,’ रेश्मा सांगते.
एकदा घरातला मेम्बर म्हटला की, त्याचे लाड होतातच. ठाण्यातली कॉलेज गोइंग गर्ल रेणुका पाठक तर या ‘फॅमिली मेम्बर’च्या वाढदिवसाला पार्टीसुद्धा करते. ‘आम्ही कॅस्परला वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करतो. कॅस्परच्या वतीनं केक कापतो. त्याला नवीन कपडे, अ‍ॅक्सेसरीज घेतो आणि त्याच्या आवडीचे पदार्थ पार्टीला ठेवतो. आसपासचे पेट डॉग या बर्थ डे पार्टीला आमंत्रित असतात,’ रेणुकानं सांगितलं.  कॅस्परची शेजारपाजारची ‘मित्रमंडळी’ जमवून रेणुका त्यांनाही ‘बर्थ डे ट्रीट’ देते.
सुप्रिया भट एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. ती म्हणाली, ‘आमची कंपनी घरगुती कार्यक्रम किंवा छोटय़ा स्केलवरचे ऑफिस इव्हेंट ऑर्गनाइझ करते. हल्ली डॉगीसाठी बर्थ डे पार्टी ऑर्गनाइझ करण्याबाबत विचारणा होत आहे. अशा डॉगी पार्टीसाठी आता आम्हीदेखील स्पेशल अरेंजमेंट करण्याचं ठरवत आहोत. पेट फ्रेंडली हॉटेल शोधणं, त्यांच्यासाठी काही गेम खेळायला जागा असणं हे महत्त्वाचं झालंय.’
थोडक्यात ही पेट लव्ह स्टोरी आता घराघरांत दिसतेय आणि तरुणाईच्या मनात ती अधिकाधिक घट्ट रुजतेय.