प्रत्येक प्रसंगाला, वेळेला अनुरूप कपडे ही आजची फॅशन आहे. प्रत्येक समारंभाला, प्रत्येक पार्टीला किंवा प्रत्येक वेळी सिनेमाला जातानादेखील तरुणाईला वेगवेगळे कपडे हवे असतात. कॅज्युअल लुकमधल्या टी-शर्टमध्ये तर ही बाब प्रकर्षांने जाणवते. टी-शर्टचे रंग ठरावीक असतात. व्हरायटी असते प्रिंट्सची. दरवेळी त्यासाठी नवा टी-शर्ट कसा घेणार? यावरचा उपाय शोधतानाच अंकुर झवेरी आणि कृपी पारेख या मुंबईतील मॅनेजमेंट स्टुडंट्सनी मिळून एक भन्नाट शक्कल लढवली आणि त्याचा व्यवसायही सुरू केला. ‘गिरगीट स्टिकर्स’ या नावाने त्यांनी प्रिंटेबल, रिमूव्हेबल स्टिकर्स बनवण्याचा उद्योग सुरू केलाय आणि त्यांना अल्पावधीत प्रतिसादही मिळतोय. अंकुर आणि कृपी वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेत ‘बिझनेस डिझाइन’चे विद्यार्थी आहेत. संस्थेच्या ‘वी स्कूल’मधील Innowe lab मध्ये त्यांच्या या अनोख्या प्रकल्पासाठी मार्गदर्शन मिळालं आणि पाठिंबाही मिळाला.
टी-शर्ट्स, टॉप्स, शर्ट्स यावर घरच्या घरी लावता येतील आणि प्रसंगानुसार बदलता येतील असे स्टीकर्स बनवयाची आयडिया कशी सुचली हे अंकुरशी गप्पा मारताना उलगडलं. ‘मी एकदा आय.पी.एल.चा क्रिकेट सामना बघण्यासाठी गेलो होतो. माझ्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी टीमची जर्सी घ्यावीशी वाटत होती. टीम जर्सीची किंमत किमान ४०० रुपये होती. केवळ तीन तासांसाठी मला एवढे पैसे खर्च करायचे नव्हते. टीमशी निगडित असलेल्या इतर कोणत्याही वस्तू मला यापेक्षा कमी किमतीत मिळत नव्हत्या. त्या वेळी माझ्या मनात अशा रिमूव्हेबल स्टिकर्सचा विचार आला. या तीन तासांसाठी माझ्या टी-शर्टवर टीम लोगो कुणी रंगवून देईल का, जो मॅच संपल्यावर काढून टाकता येईल? या विचारावरच कृपी पारेखबरोबर काम सुरू केलं आणि गिरगीट स्टिकर्सची निर्मिती झाली.’
‘या आमच्या प्रॉडक्टला गिरगीट हे नाव दिलं. कारण सरडा ज्याप्रमाणे भवतालच्या परिस्थितीनुरूप रंग बदलतो, तसं प्रसंगानुरूप फॅशन स्टेटमेंट बदलण्यासाठी या रिमूव्हेबल स्टिकर्सचा वापर होऊ शकतो,’ अंकुरची बिझनेस पार्टनर कृपी पारेख हिने गिरगीटच्या जन्मकथेत भर घातली. ‘सुरुवातीला आमच्या कॉलेजमध्ये आम्ही आमच्या प्रॉडक्टची सॅम्पल्स देत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स आम्ही बनवले होते. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत होता. आमच्या कॉलेजमधून आम्हाला खूप सहकार्य मिळालं. आमची पहिली ऑर्डर आम्हाला कॉलेजमधील आमच्या मेंटर रेवती रॉय यांच्याकडून मिळाली,’ कृपी म्हणाली.
या नव्या व्यवसायाच्या निमित्ताने खूप काही शिकायला मिळालं, असं अंकुर आणि कृपी सांगतात. आमच्या आयुष्यात कधीच केल्या नव्हत्या किंवा कधी केल्याही नसत्या अशा गोष्टी आम्हाला करायला मिळाल्या. व्यावसायिकतेचे धडे मिळाले.. असं ते म्हणतात. ‘आमचं प्रिंटिंगचं काम आम्ही धारावीत करतो. मुंबईतल्या या झोपडपट्टीच्या भागात आम्ही कधीच गेलो नव्हतो. हे काम करायचं ठरवलं नसतं तर कदाचित गेलोही नसतो. तिथे जाऊन प्रिंटिंगचं काम आम्ही करून घेतो. अनेक तास तिथे थांबून, कारागिरांशी जुळवून घेऊन काम करून घ्यावं लागतं. सुरुवातीला आम्हाला तिथल्या वातावरणाची सवय नसल्याने झोपडपट्टीत शिरताना कम्फर्टेबल वाटायचं नाही. सुरक्षित वातावरणात बालपण गेल्याने हे सगळं आयुष्य नवं वाटलं.’
‘आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स बनवतो. कोणत्याही बर्थडे पार्टीज, म्युझिक कॉन्सर्ट्स, स्पोर्ट्स, कॉर्पोरेट कॉन्फरन्सेस अशा कोणत्याही सभा- समारंभांसाठी आमची स्टिकर्स वापरता येतात. कमी पैशात आपल्याला हवा असलेला लुक आणि तोही कमी वेळात मिळू शकेल असं हे प्रॉडक्ट आहे. आम्हीच जन्माला घातलेल्या गिरगीटने आम्हाला खूप काही शिकवलं आहे..’ नवउद्योजक बनू इच्छिणाऱ्या या दोन तरुणांनी शेवटी सांगितलं.

Untitled-5आयपीएलचा सामना बघायला गेलो तेव्हा, तीन तासांसाठी माझ्या टी-शर्टवर टीम लोगो कुणी रंगवून देईल का, जो मॅच संपल्यावर काढून टाकता येईल? असा विचार आला आणि गिरगीटची कल्पना सुचली. – अंकुर आणि कृपी