vv10नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

पाऊस! सध्या प्रत्येक जण मनापासून वाट बघत असेल तर याचीच. पाऊस.. प्रत्येकातला कलाकार जागा करणारा, प्रत्येक कलाकाराला वेड लावणारा प्रकार.. खास करून संगीतकार-कवी लोकांना. मग पाऊस हा विषय घेऊन एक से एक गाणी नाही बनली तरच नवल! या आठवडय़ात सादर आहे पावसाच्या िहदी गाण्यांची प्ले लिस्ट. बघू या आपल्या या आळवणीनंतर तरी वरुणराज वेळेवर बरसतायत का?
सुरुवात होते काही जुन्या गाण्यांपासून. गीत, चाल, गायन आणि चित्रीकरण अशा सर्वच बाबतींमध्ये सुंदर असे गाणे म्हणजे ‘प्यार हुवा इकरार हुवा..’ लतादीदी, मन्ना डे, शंकर जयकिशन, शैलेन्द्र, राज कपूर, नर्गिस.. क्या बात! या गाण्यात खरे तर पावसाचा उल्लेखही नाही, पण चित्रीकरणाची छाप आपल्यावर इतकी vv09आहे की, पाऊस म्हटल्यावर हे गाणे आठवल्याशिवाय राहत नाही. तसेच ‘ओ सजना बरखा बहार आई..’ हे लतादीदींचे गाणे. सलील चौधरी यांची सुरेल चाल, शैलेन्द्र यांचे गीत. कमाल!
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे, परत एकदा लताबाईंच्याच आवाजातले- ‘ओ घटा सांवरी’ हे गाणेसुद्धा त्याच्या मस्त चालीमुळे, विशेष करून ‘बरसा..त क्या’ला दिलेल्या आवाजाच्या कंपनांसाठी परत परत ऐकावेसे वाटते. रफीसाहेब आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले ‘आजहू ना आए बालमा’ हे ठुमरीवजा गाणेसुद्धा या पावसामध्ये ऐकल्याशिवाय चन पडत नाही. मधल्या काळातले ‘1942 अ लव स्टोरी’ या आरडी बर्मन यांनी संगीत दिलेल्या शेवटच्या चित्रपटातले – रिमझिम रिमझिम रूमझूम रूमझूम’ हे गाणेसुद्धा मला फार आवडते. नवीन काळातल्या गाण्यांपकी ‘देव-डी’ या चित्रपटातले अमित त्रिवेदीचे ‘सावन बरसे’ हे गाणे काही तरी वेगळ्याच स्टाइलचे आहे, किंबहुना देव-डीच्या सगळ्याच गाण्यांमध्ये नावीन्य आहे.
पावसाच्या गाण्यांमध्ये रेहमान सरांनीसुद्धा एक अप्रतिम चौकार मारलेला आहेच! म्हणजे- ‘लगान’मधील ‘घनन घनन घिर घिर आए बदरा’- हे गाणे म्हणे रेहमानला ‘लगान’च्या त्या गावाच्या सेटवर गेल्यावरच सुचले होते. गाणे ऐकताना आपल्या डोळ्यासमोर पावसाच्या चाहुलीने आनंदित झालेल्या अख्ख्या गावाचे चित्र उभे राहते. ‘साथियां’ या चित्रपटातले ‘ए उडी उडी उडी..’ हे गुलझारसाहेबांनी लिहिलेले गाणे अदनान सामीने आपल्या ‘जॅझ’ स्टाइलच्या गायकीने फारच मजेशीर करून ठेवले आहे आणि गुलझारसाहेबांचे सोप्या शब्दात ‘बडी बात’ सांगणारे शब्द.. ‘जिंदगी.. आँखों की आयात है जिंदगी..’ या गाण्यात पाण्याच्या
सपकाऱ्याचा (स्प्लॅश) आवाज एखाद्या तालवाद्यासारखा वापरला आहे, हे असले किडे ए आर रेहमान सरांव्यतिरिक्त दुसरे कोण करणार?
‘तक्षक’ नावाच्या फिल्ममधले ‘बुंदो से बाते’ हे कमालीचे गोड गाणे तसे तो चित्रपट न चालल्याने फारसे वाजत नाही, पण माझ्या फोनवर ते नेहमी वाजत असते. सुजाता त्रिवेदी या गायिकेने गायालेल्या या गाण्यात कडव्याच्या चालीत केलेले थोडे विषयांतर आणि कडव्याच्या शेवटी परत मूळ पदावर येण्याचा खेळ फार अप्रतिम आहे आणि माझे सर्वात आवडते म्हणजे ‘बरासो रे मेघा मेघा’. ‘गुरू’मधले हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी पुढच्या वेळी ऐकताना त्यातली नवीन एखादी गंमत कळते. पुढच्या आठवडय़ात मराठीतली पाऊसगाणी घेऊन येतो.
हे ऐकाच.. : मल्हार
पाऊस आला की, मल्हार, मेघ हे राग आठवणारच. या रागांमध्ये पावसाच्या अनेक बंदिशी आहेत. अशीच एक बंदीश ‘साझ’ या चित्रपटात वापरली आहे. सुरेश वाडकरांनी ती गायली आहे. ‘बादल घुमड बढ आए’ याच्या पहिल्या ओळीतच अशी काही तान आहे, की ऐकूनच घाम फुटेल. नक्की ऐका हे गाणे. गजलचे बादशहा गुलाम अलीसाहेबांनी आपल्या सुंदर, चंचल गायकीने सजवलेला मिश्र पिलू रागातला ‘बरसन लागी सावन बुंदियार आजा’ हा दादरासुद्धा ‘चुकवू नये असे काही’ या श्रेणीत मॉडेल असाच आहे.
जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com