पण नेहमीच्या त्याच ठिकाणांव्यतिरिक्त पाऊस अनुभवावा, अशी किती तरी ठिकाणं मुंबईत आहेत. पाऊस तोच, पण एखाद्या घनदाट झाडीत तो तुमची सोबत करणारा वाटसरू असेल, एखाद्या टेकडीवर जबरदस्त वेगाने येत त्याची झोंबरी पण तितकीच सुखद वेदना पुन:पुन्हा अनुभवण्याची आस लावेल आणि हाच बेभान पाऊस एखाद्या किल्ल्यावर अनुभवताना कडय़ाकपाऱ्यांच्या कुशीत शिरून अलगद विसावेल. समुद्रावरचा वाऱ्यासोबत उडणारा पाऊस एका वेगळ्याच नशेत नेईल.  असा वेगळा पाऊस अनुभवायचा असेल तर कुठे दूर जायला नको. तुमच्या शहरात, अगदी आसपासही अशा जागा असतातच. पाऊस मनसोक्त अनुभवण्यासाठी लागते ती वेगळी नजर, वेगळा दृष्टिकोन. या ठिकाणांबद्दल वाचून आणखी काही सुचतंय का?कान्हेरी लेणी
कान्हेरी लेण्यांच्या वरच्या बाजूने चढत जा. तिथे पश्चिमेकडून समुद्रावरून जबरदस्त वेगाने पाऊस येतो. पावसाचा वेग खूप जोरात असल्याने पावसाचे फटके बसतात. इथे लपण्यासाठी कुठेही जागा नसल्यामुळे पावसाचा फटका ज्यांना सोसवत नाही त्यांना अक्षरश: चेहरा लपवून घ्यावा लागतो, पण इथला पाऊस फार अप्रतिम असतो. पाऊस अंगावर घ्यायचा असेल तर कान्हेरी लेण्यांसारखं दुसरं उत्तम ठिकाण नाही. जसजशी लेणी वर चढत जाल तसं ‘लेणी क्र. ११’च्या खालच्या बाजूला जायला पायऱ्या दिसतील. पायऱ्यांच्या तळाशी धबधब्यासारखं पाणी कोसळतं. तिथे लोक पावसाचा आनंद लुटतात. कान्हेरी लेण्यांमधून दहिसर नदीचा उगम होतो. या नदीत डुंबून एकदा तरी पाऊस अनुभवून बघाच.
पवई तलावाचा परिसर
पवई तलाव परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. तिथे एका छोटय़ा टेकडीवर खूप छान पाऊस अनुभवता येतो. टेकडीवर खूप झाडं आहेत. तिथून हा तलाव नजरेत भरतो. तलावाच्या कडेकडेने एक वॉक वे तयार केलाय. तुमच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडबरोबर पावसाचा आनंद लुटायचा असेल तर या वॉक वेवरून ४०-४५ मिनिटं रमतगमत फिरा. एक मस्त रोमँटिक पाऊस अनुभवायला मिळेल.
नारळीबाग
दादर चौपाटीला लागूनच असलेली ही नारळीबाग काही वर्षांपूर्वी विकसित केली गेली. नावाप्रमाणेच इथे चिक्कार नारळाची झाडं आहेत. संध्याकाळी गार वारा सुटलेला असताना इथला पाऊस अनुभवायला खूप मजा येते. इथे तुम्ही रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा खूप छान आनंद लुटू शकता. तिथून समुद्राचा खूप छान व्ह्य़ूदेखील मिळतो.
विहार तलाव
संजय गांधी उद्यानाच्या हद्दीत हा तलाव येतो. पवईच्या बाजूने येताना आधीचा लेफ्ट घेतल्यावर विहार तलावाकडे जाणारा रस्ता सुरू होतो. तिथेच असलेल्या विहार कॉम्प्लेक्समधून तुम्ही समोर झाडं आणि वरून पाऊस असाही एक वेगळा फील घेऊ शकता. पूर्वी विहार कॉम्प्लेक्सला जाताना परवानगी घ्यावी लागत नसे. ९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे त्यानंतर मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आता पूर्वपरवानगी लागते. विहार तलाव जेव्हा भरतो तेव्हा तिथे आत एक घसरगुंडीसारखी फळी आहे त्यावरून पाणी वाहतं. घसरगुंडीवरून पाण्यात डुंबत तुम्ही खुशाल पाऊस अनुभवू शकता.
कलिना
मुंबई युनिव्हर्सटिीच्या कलिना कॅम्पसमध्ये तसं शांत आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे. दुपारी युनिव्हर्सटिीत येऊन इथल्या शांत गार वातावरणात तुम्ही नक्कीच वेगळा पाऊस अनुभवाल. इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनजवळ पावसात जायलाच हवं. गर्द हिरवी झाडी आणि सभोवती हिरवळ. हिरवळीवर बरीच लहान बाकडी आहेत. हिरव्यागार वातावरणात पाऊस ऐकत शांत बसण्यासाठी आयडियल जागा. आंबेडकर भवनाच्या मागच्या बाजूला असलेल्या शेडकडे जाताना तुम्हाला गावाकडच्या शेतात फिरल्याचा फील येतो. जरा शांत बसलात तर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाजदेखील इथे ऐकू येतात. भर शहरात हा निसर्ग आहे, हीच भावना खूप आनंद देऊन जाते.
सायनचा किल्ला
सायन पश्चिमेकडून बाहेर पडलात, की फुटपाथवरून सरळ पुढे चालत जा. तिथे मुख्य रस्त्यावरून उजवीकडे वळून पाच मिनिटं सरळ चालत जा. तुम्हाला सायनचा किल्ला दिसेल. हा किल्ला फक्त सकाळी ५ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते ८ च्या दरम्यान पाहता येऊ शकतो. दुपारी हा किल्ला बंद असतो. किल्ल्याला पायऱ्या असल्यामुळे चढणं सोपं आहे. किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या आजूबाजूला गर्द झाडी आहे. किल्ल्याच्या खाली पं. जवाहरलाल नेहरू उद्यान आहे. डेरेदार वृक्षांच्या सान्निध्यात उंचावरून पाऊस अनुभवण्यातली मजा काही औरच. किल्ल्यावरून चौफेर नजर फिरवलीत तर तुम्हाला सायनचा अख्खा प्रदेश दिसतो आणि पावसात न्हालेली मुंबई अगदी मस्त दिसते.
आरे कॉलनी
गोरेगावच्या आरे कॉलनी जंक्शनवरून मुख्य रस्त्याने सरळ चालत गेल्यावर २ फाटे फुटतात. एक फाटा ‘मरोळ’ला बाहेर पडतो. अंधेरीचा विजयनगर-मरोळ मार्ग पवईच्या अलीकडे ‘फिल्टर पाडय़ाला’ बाहेर पडतो. इथे रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहे. आजूबाजूला बरीच गुरंढोरंही दिसतात. इथे पाऊस अंगावर येत नाही, मात्र जंगलात असल्याचा फील नक्कीच येतो. फिल्टर पाडय़ावरून पुढे सरळ चालत गेल्यावर गवताळ रस्ता सुरू होतो. इथे मात्र पाऊस अक्षरश: उभा-आडवा झोडपून काढतो.
पाली बीच
मुंबईला उत्तानच्या पुढे पाली बीच आहे. पाली हे भाईंदर खाडीच्या अलीकडचं शेवटचं गाव. तिथे ग्रामपंचायतीचं उद्यानही आहे. उद्यानातून तुम्ही समोर समुद्र पाहात वरून कोसळणारा पाऊस अनुभवू शकता. समुद्रात कोसळणाऱ्या त्या जलधारा निवांतपणे अनुभवण्याचं, तना-मनाला चिंब करणारा हा अनुभव.
मढ किल्ला
मढ आयलंडमध्ये असणारा हा पोर्तुगीजकालीन किल्ला. किल्ल्याच्या एका बाजूपर्यंत तुम्हाला जाता येतं. हा किल्ला एअरफोर्सच्या ताब्यात असल्यामुळे किल्ल्याच्या आत शिरायचं असेल तर एअरफोर्सची परवानगी मिळवावी लागते. मढच्या समुद्रकिनाऱ्यावर आणि जवळच असलेल्या एरंबळ बीचवर फारशी गर्दी नसते. त्यामुळे, तिथे तुम्ही छान निवांत फिरू शकता आणि पाऊस अनुभवू शकता.
अगदी रोजच्या ठिकाणीही हा पाऊस धुंद होऊन अनुभवता येतो. पावसाळी नजारा शोधण्यासाठी ती नजर मात्र हवी. असंच एक ठिकाण म्हणजे रुईया कॉलेजची गच्ची. पावसाळ्यात ‘रुईया’तले विद्यार्थी गच्चीवर फुटबॉल खेळतात, नाचतात. गच्चीला लागूनच संस्कृत डिपार्टमेंट आहे. त्यामुळे, पावसाळ्यात संस्कृतच्या विद्यार्थ्यांची चांदीच असते. पाऊस आल्यावर गच्चीवरून दिसणारा आकाशाचा करडा- काळा कॅनव्हास आणि त्यावर उमटणाऱ्या धारा डोळ्यांचं पारणंच फिटवून टाकतात. पावसाळ्यात इथे कविता करणाऱ्यांच्या प्रतिभेलाही म्हणूनच ऊत येतो. असंच एक दुसरं ठिकाण म्हणजे विल्सन कॉलेजच्या कौलारू छतांखाली दिसणारा पाऊस हा तिरपा येणारा पाऊस आणि समोरचा नजारा अप्रतिम. जवळच असलेल्या मरीन ड्राइव्हवरून तुम्ही जो पाऊस अनुभवता त्यापेक्षा इथला पाऊस निश्चित वेगळा असतो. समोर मरीन ड्राइव्हवरून पाऊस दौडत येताना दिसतो. तुमच्या बिझी शेडय़ूलमधून काही निवांत क्षण वेचलेत तर आपल्या आसपासचा पाऊस दिलखुलासपणे अनुभवू शकाल. मुंबईतल्या मुंबईत कधी तरी अशी मान्सून मुशाफिरी करून बघायला काय हरकत आहे!