खवय्यांच्या दुनियेत भेळपुडी, रगडापुडी, पाणीपुडी अशा चाट पदार्थाना फारसे मानाचे स्थान नाही. हे पदार्थ प्रकृतीने तसे चावटच. त्यामुळेच असेल कदाचित, पण मानाच्या पंक्तीत चाट पदार्थ कुठेच नसतात. वास्तविक हे पंक्तीत बसून खाण्याचे पदार्थच नाहीत. चौपाटीवरच्या खाऱ्या हवेत, तळ्याकाठच्या मोकळ्या हवेत साथीदाराशी गप्पा मारता मारता पुडीबरोबर भेळ खावी किंवा उभ्याने पाणीपुडी तोंडात सारावी. पण हे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आहेत, हे नक्की! चौपाटीवरच्या किंवा तळ्याकाठच्या भैय्याच्या गाडीवर मिळणाऱ्या आणि तिथेच सजून दिसणाऱ्या या चाट पदार्थानी आजकाल मिठाईवाल्यांच्या दुकानाबाहेर चकचकीत काचांआड आसरा घेतला आहे. तेव्हापासून हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले बनले असले, तरी चवीमध्ये गंडले आहेत, असे खाबू मोशायचे मत आहे. (स्पष्ट मत मांडायला खाबू मोशाय घाबरत नाही. कारण खाबू मोशाय स्वत:च्या पैशाने चाट खातो, दुसऱ्यांच्या नाही..)
पण अशा एका मिठाईवाल्याच्या दुकानाबाहेरच एक भन्नाट पदार्थ खाबू मोशायला खायला मिळाला. या पदार्थामध्ये दोन संस्कृतींचा संकर आहे. एक संस्कृती म्हणजे अगदी बुद्धिवादी वगैरे असलेल्या बंगाली लोकांची.. या संस्कृतीचा कल दूध आटवण्यापेक्षा फाडण्याकडे.. शोंदेश, रोशमोलाई, रोशोगुल्ला अशा ‘ओ’कारी मिठायांची ही संस्कृती! तर दुसरी संस्कृती म्हणजे तळहातावर प्लेट घेऊन चाट पोटात ढकलणाऱ्यांची संस्कृती. हा पदार्थही तेवढाच मजेशीर. पदार्थाचे नाव ‘रसगुल्ला चाट’!
प्रत्येक शहरात किमान एक तरी हलवाई अगदी प्रसिद्ध असतो. त्या शहरात जाऊन त्याच्याकडील मिठाई खाल्ली नाही, तर मग त्या शहरात जाऊन फायदा काय, असा हा हलवाई असतो. ठाण्यात सुदैवाने असे तीन-चार हलवाई आहेत. त्यापैकीच एक हलवाई म्हणजे ‘कृष्णा स्वीट्स’! उत्तर भारतीय रबडी, बासुंदी अशा दूध आटवणाऱ्या मिठायांपासून बंगाल्यांच्या दूध फाडणाऱ्या मिठायांपर्यंत आणि सतरा प्रकारच्या बफ्र्यापासून तेवढय़ाच वेगवेगळ्या प्रकारच्या पेढय़ांपर्यंत अनेक मिठाया आणि फरसाण यांच्यासाठी हा हलवाई प्रसिद्ध! ठाण्याच्या तीन हात नाका भागाकडून हरिनिवास सर्कलकडे येणाऱ्या रस्त्यावर फॉरेस्ट ऑफिससमोर एक छोटी गल्ली ‘वर्षां-वंदना’ या सोसायटय़ांकडे जाते. त्या गल्लीतच हे दुकान आहे.
या दुकानातच ‘रसगुल्ला चाट’ मिळतो. फलकावर हा पदार्थ वाचल्यानंतर खाबू मोशाय थोडासा आश्चर्यचकित झाला आणि तातडीने पदार्थाच्या किमतीचे म्हणजेच फक्त ३० रुपयांचे कुपन घेऊन त्याने हा पदार्थ घेतला. काऊंटरपलीकडला भैय्या हा पदार्थ बनवत असताना खाबू मोशायच्या चेहऱ्यावर बालसुलभ कुतूहल होते. चाटच्या गाडीवर असलेल्या विविध प्रकारच्या पुऱ्या त्या बल्लवाचार्याने एका प्लेटमध्ये कुस्करून घेतल्या. त्यामध्ये थोडय़ा गाठय़ा आणि फाफडाही टाकला. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा यांची पखरण केली. थोडासा चाट मसालाही शिंपडला. मग एक रसगुल्ला घेऊन त्याचा पाक एका वाटीत काढून त्याने तो रसगुल्लाही कुस्करून या मिश्रणात टाकला. खाबू मोशाय अचंबित! या सर्वावर त्याने दही आणि चाटमध्ये आवश्यक असलेल्या गोड-तिखट चटण्या टाकून त्यावर मस्त शेव पांघरली आणि प्लेट खाबू मोशायच्या पुढे सरकवली.
खाबू मोशायने एक आवंढा गिळत काहीशा साशंकपणे हा पदार्थ थोडासा तोंडात टाकला. पुढे संपूर्ण प्लेट चाटून पुसून साफ होईपर्यंतचं काही आठवतच नाही. या पदार्थाने खाबू मोशायला तृप्त केलं. रसगुल्ला आणि चाट यांचा संकर करण्याचं नेमकं सुचलं कसं, असं विचारल्यावर त्याला अपघात कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं. एकदा रसगुल्ल्याचा तुकडा चुकून बास्केट चाटमध्ये पडला आणि तेव्हापासून रसगुल्ला चाटचा जन्म झाला. ही जन्मकहाणी ऐकून खाबू मोशायही गहिवरला. हा पदार्थ खाण्यासारखा नक्कीच आहे. पण त्यासाठी ठाण्यापर्यंत यावे लागणार आणि ठाणे स्थानकापासून तंगडतोड करावी लागणार, हे नक्की!