पार्टीत किंवा लग्नसमारंभात वापरले जाणारे महागडे ड्रेसेस एखाददुसऱ्यांदाच वापरले जातात. ते ड्रेस रोज ऑफीस किंवा कॉलेजला घालता येत नाहीत. मग त्याचं करायचं तरी काय हा प्रश्न असतो. यावर पर्याय म्हणून शॉपिंगचा एक नवीन पर्याय समोर आला आहे, रेण्टेड शॉपिंगचा!
लग्न असो किंवा सणसमारंभ असो मुलींची शॉपिंग हा कळीचा मुद्दा असतो. कोणत्या समारंभात काय घालायचे, कोणता रंग, पॅटर्न यावरही चर्चा रंगते. कधी काय घालावे, याच्या सोबतच कुणी कोणता ड्रेस किंवा साडी कोणत्या समारंभात घातला होता हा पण त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा विषय असतो. फक्त तरुणीच नाही तर तमाम स्त्रीवर्ग प्रत्येक समारंभाच्या वेळीस त्यांच्या वॉडरोब उघडून एक मोठं गणित स्वतशीच मांडत असतात. ‘अमुक साडी मी मामीच्या बर्थडे ला घातली होती’, ‘निळ्या रंगाचा ड्रेस मी मागच्या दिवाळीत घेतला होता’, ‘अनारकली पॅटर्नचे दोन ड्रेस झालेत माझे’ .. ही आणि अशी अनेक गणितं प्रत्येक शॉपिंगच्या आधी मांडलेली असतात. त्यात जर घरातल्या पुरुषमंडळीपकी एखाद्याने ‘अगं ती साडी छान दिसते तुला तीच घाल ना’ अशी पुडी  सोडायचाच अवकाश.. आणि अख्खं गीतापुराण त्यांच्यापुढे मांडलं जातं. तीच साडी तिने त्यांच्याच घरी आधी नेसली होती, सगळ्यांना कशी आवडली होती, किती जणींनी कुठून घेतली म्हणून विचारलं होतं, पण आता परत तिथेच तीच साडी नेसली तर कोण कोण काय टोमणे देतील आणि कसे हसतील हे आणि असं बरंच काही.
पण विनोदाचा भाग सोडला तर ही समस्या कदाचित साडीचा आणि तेही पार्टीवेअर साड्यांचा उगम झाला असेल तिथून जन्माला आली असावी. एखादी साडी, ड्रेस कितीही महाग असो, आपल्यावर कितीही चांगला दिसो मुळात तो दोन पेक्षा जास्त समारंभात घालण्याचा धीर कोणत्याही स्त्रीत होत नाही. पण याच प्रॉब्लेमच्या दुसऱ्या टोकाला त्याहून मोठा आणि न सुटणारा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ओथंबून वाहणारा वॉडरोब आणि त्यासरशी खाली होत जाणारा खिसा किंवा पर्स. कारण दर समारंभागणिक यात नवीन ड्रेस आणि साड्यांची भर पडत जाते पण त्यामुळे जुने कपडे हद्दपार होत नाहीत. पार्टीत वापरले जाणारे महागडे ड्रेसेस मुळात नवीन कोरे असतात, एखाददुसरयांदा वापरले तरी ड्राय क्लिनिंग, कडक इस्त्री यांमुळे त्यांची झळाळी काही कमी होत नाही. परत ते ड्रेस रोज ऑफीस किंवा कॉलेजला घालता येत नाहीत. मग त्याचं करायचं तरी काय हा खूप गहन प्रश्न असतो.
या सगळ्यावर पर्याय म्हणून शॉपिंगचा एक नवीन पर्याय समोर आला आहे तो म्हणजे ‘रेण्टेड शॉिपगचा’. सोप्या शब्दात म्हणायचं तर कपडे भाड्याने घ्यायचा. थोडा विचित्र वाटतो आणि कदाचित भाड्याचे कपडे मिरवायचे हे खटकतच सगळ्यांना. पण नीट विचार केल्यास यामागची संकल्पना पटण्याजोगी आहे. सणावारांना आणि पार्टीजना आपण खूप ड्रेस, साड्या घेतो आणि त्या तश्याच पडून राहतात. पुन्हा हल्ली टीव्ही, मासिक यांमध्ये दाखवले जाणारे डिझाईनर कपडे आपल्याकडेदेखील असावेत असं प्रत्येकीला वाटत, पण परवडत नाहीत. आणि एखादीने घेतलाच महागडा डिझाईनर ड्रेस तरी तो काही सतत वापरला जाऊ शकणार नाही मग अश्या वेळी त्या कपड्यांचं करायचं तरी काय हा एक मोठा प्रश्न आहे. आणि लग्नांसाठी घेतल्या जाणारया कपड्यांबाबत हि समस्या असतेच. तुम्ही तुमच्या लग्नात नेसलेली साडी, लेहेंगा परत कुठेच वापरू शकत नाही. कारण एकतर तो सगळ्यांनी पाहिलेला असतो आणि तो इतका भरजरी असतो की नंतर कुठेही घातल्यास इतरांपेक्षा आपणच उठून दिसू ही भीती असते. ही समस्या बायकांचीच नसते तर पुरुषांची सुद्धा असते. त्यांची लग्नाची शेरवानी, कोट वर्षांनुवर्ष तसाच पडून राहतो. याच प्रश्नाने भाड्याने ड्रेस घेण्याच्या संकल्पनेला जन्म दिला. या द्वारे तुम्ही महागडे ड्रेस काही ठराविक किंमतीत दोन किंवा तीन दिवसांसाठी भाड्याने घेऊ शकता आणि वापरून झाला की पुन्हा त्यांना परत करायचा.
युरोप, अमेरिकेत रेंटेड ड्रेस ही संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. रुळलेली आहे. तिथे वेडिंग पार्टीज, गेट टूगेदर यासाठी भाडय़ाने डिझायनर ड्रेस घेण्याचा कौल स्त्री-पुरुष दोघांचाही दिसतो. आपल्याकडेही पंजाबी आणि गुजराती समाजात ही संकल्पना मूळ धरू लागली आहे. त्यामुळे काही ऑनलाईन स्टोअर्स मुंबई, दिल्ली, बंगलोर अशा मेट्रो शहरांमध्ये भाडय़ाने कपडे देण्याची सुविधा पुरवतात. अशा ऑनलाईन स्टोअर्सतर्फे तुम्हाला केवळ महागडय़ा कपडय़ांचा चॉईस दिला जात नाही तर फिटिंगसाठी त्यांच्यातर्फे एखादी व्यक्ती तुमच्या घरी येते. तुमचा ड्रेस समारंभाच्या आदल्या संध्याकाळी तुमच्या घरी किंवा तुम्ही सांगाल त्या जागी पोचवण्याची जहाबदारीसुद्धा ही स्टोअर्स उचलतात.
सध्या इंटरनेटवर अशा काही साईट्स उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला डिझाईनर कपडे भाड्याने देतात. मुळात पूर्वीपासून ख्रिशन समाजात नवरीचा गाऊन हा भाड्याने घेतला जातो, अशी असंख्य उदारहरणं आहेत. सगळ्या ख्रिस्ती मुली आपल्या लग्नाचा गाऊन काही विकत घेत नाहीत. नवरात्रीसारख्या सणांमध्ये गरब्याला जाण्यापुरती घागरा चोळी भाड्याने घेणारेही अनेक आहेत. पण तरीही पार्टीत किंवा लग्नात भाड्याचे ड्रेस वापरायची संकल्पना आपल्याकडे नव्हती. अशा समारंभात महागडे कपडे मिरवणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. परंतू व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यास भाड्याने कपडे घेण्याचा पर्याय हा खिश्याला कात्रीही मारत नाही आणि आपली हौसही पूर्ण करतो. त्यामुळे तरुण वर्ग रेंटेड कॉश्च्युम हा संकल्पेनेकडे हळूहळू वळू लागले आहेत. हीच संकल्पना मांडणाऱ्या ‘सिक्रेट वॉडरोब’च्या सर्वेसर्वा जेसिका गुप्ता म्हणतात, ‘मुळात लग्नाच्या कपड्यांमध्ये आपण अवास्तव पसा वाया घालवतो. आणि त्या कपड्यांचा नंतर वापरही होत नाही. त्यापेक्षा आम्ही तुम्हाला तुमच्या मागणीनुसार उंची ब्रँडचे कपडे भाड्याने देतो. या मुळे तुमच्या खर्चातही कपात होते आणि त्या खास प्रसंगी तुमच्या आवडत्या डिझाईनरचे कपडे घालण्याची तुमची हौससुद्धा पूर्ण होते.’
आजची तरुणाईसुद्धा या संकल्पनेकडे सकारात्मक नजरेने पाहते. इंजिनिअर अपूर्वा जोशीच्या म्हणण्यानुसार, ‘मुळात असं काही करता आलं तर माझ्या लग्नात मी खरंच करीन. कारण आज लग्नाच्या शालू, साड्या यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा वेळेस त्या दिवसासाठी फक्त साडी भाड्याने घेऊन नंतर परत करण्याची संकल्पना मस्त आहे. कदाचित वाचलेल्या पश्यात मी माझ्यासाठी उपयोगाच्या दोन गोष्टी जास्त घेईन.’ असंच काहीसं मत पूजा प्रसादच होतं. ‘आम्ही उत्तर भारतीय आहोत आणि आमच्या लग्नात पसा पाण्यासारखा वाहतो. हे मला पटत नाही. आणि अशा नवीन संकल्पनेमुळे मला माझी हौस पण पूर्ण करता येईल आणि पसेदेखील वाचवल्याच समाधान मिळेल.’
संकल्पना कितीही सकारात्मक वाटली तरी त्या मागून खूप प्रश्न येतात. पहिला म्हणजे त्या कपड्यांची प्रत, स्वछता. या बद्दल सांगताना जेसिका म्हणाल्या, ‘स्वछतेची सगळी काळजी आम्ही घेतो. प्रत्येक ड्रेस आमच्याकडे आल्यावर आम्ही ड्राय क्लिनिंग करून घेतो. ग्राहकांकडून कपडे परत घेताना आम्ही ते नीट तपासतो. जर ड्रेस जास्त खराब झाला असेल तर आम्ही त्यांना फाईन लावतो. त्यामुळे कपड्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न सहसा येत नाही.’
दुसरी गोष्ट म्हणजे ड्रेसच्या फिटिंगची तर त्याबाबतही त्या म्हणतात की, तुम्हाला प्रत्येक ड्रेस तुमच्या मापात फिटिंग करून मिळतो. साडीच्या फिटिंगचा प्रश्न येत नाही आणि साडीचा ब्लाउज तुम्ही तुमच्या कलेक्शनमधला घालू शकता.
हे सगळं जरी असलं पटत असलं तरी मुळात लग्नात भाड्याची साडी घातली हि गोष्ट चारचौघांना कशी सांगावी हा प्रश्न येतोच. या बाबत अपूर्वा म्हणते, ‘मी माझ्या लग्नात कोणाला सांगणार नाही की मी भाड्याची साडी नेसली होती. आणि नंतर कोणी विचारलंच तर त्यांना सांगीन मी ती साडी मत्रिणीला विकली म्हणून.’
संकल्पना जरी नवीन असली तरी विचार करण्यासारखी आहे. लग्नाच्या महागड्या शॉपिंगमध्ये हा पर्याय अनुकूल ठरू शकतो.  जाताजाता एक गुपित सांगते, तुमच्या आवडत्या अनेक सिलेब्रिटीज सुद्धा अनेक समारंभात डिझाईनर्सचे भाड्याने घेतलेले ड्रेसच घालतात.
ऑनलाईन भाड्याने कपडे पुरवणारया काही साईट्स –
http://www.dialadress.com
http://www.secretwardrobe.com
http://www.theclothingrental.com
http://www.wwrapd.com