रेट्रो स्टाइलच्या कपडय़ांबरोबरच केसांत फुलं माळण्याची फॅशनही पुन्हा एकदा ‘ट्रेण्डी’ मानली जाऊ लागली आहे. यंदा फॅशन रॅम्पवरही गुलाब, मोगरा, अबोलीनं हजेरी लावलेली दिसली.
रेट्रो जमान्यातील काही फॅशन ट्रेण्ड्स नाव बदलून पुन्हा एकदा आपल्याला नव्याने दिसून येताहेत त्याचप्रमाणे अ‍ॅक्सेसरीजदेखील जुन्या जमान्यातल्याच हिट होताहेत. हेड गीअर्समध्ये खऱ्या फुलांना पुन्हा एकदा बहर आला आहे. केसांत गजरे आणि फुले माळण्याची पारंपरिक पद्धत सध्या ‘इन थिंग’ झाली आहे. केसांचा अंबाडा (म्हणजे आजच्या काळातील बन) जसा सध्याच्या नवनवीन हेअर स्टाइल्समध्ये पुन्हा एकदा विसावला तसाच त्याला सजवण्यासाठी फुलांचे गजरे, गुलाब, चाफा अशी फुलं ‘हेड गीअर’ म्हणून सध्या पुन्हा एकदा वापरात येत आहेत.
8 नैसर्गिक आकार, पाना-फुलांची डिझाइन्स यांचा वापर कपडय़ांवर डिझाइन्स म्हणून करण्याची हल्ली पद्धत आहेच. फ्लोरल प्रिंट्स ट्रेण्डमध्ये आहेतच. त्याच्या जोडीला आता खऱ्या फुलांचा वापर हेड गीअर म्हणून होऊ लागला आहे. आई-आजीच्या काळात गजरा माळण्याची पद्धत होती, हा समज आता बाद करायला हवा, कारण केसांतील फूल ही आधुनिक ‘हाय फॅशन’ बनते आहे. केवळ पारंपरिक नऊवारी किंवा पाचवारी साडीवरच गजरा किंवा फुलं घालावीत, असं नाही. लेहंगा, कुर्ता, पलाझो अशा फ्युजन वेअरवर बन किंवा वेणीची हेअरस्टाइल असेल तर त्यासोबत फुलं माळायला काहीच हरकत नाही. ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात दीपिका पदुकोण हिने आपल्या मैत्रिणीच्या लग्नात लेहेंगा आणि त्याला साजेसा बन घातला होता. बन सजवण्यासाठी दोन गुलाबाची फुले घातली होती. चित्रपट हिट झाल्यानंतर त्यातील ही हेअर स्टाइलदेखील खूप गाजली. गुलाबाची फुले पुन्हा एकदा माळण्याची सुरुवात याच चित्रपटामुळे झाली. त्यानंतर मग खोटी गुलाबाची फुलेसुद्धा बाजारात मिळू लागली. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातलं ‘पिंगा’ गाणं गाजलं. त्यातला दीपिका आणि प्रियांका चोप्राचा मराठमोळा ‘लुक’ही गाजला. केसांच्या खोप्यात माळलेले लाल गुलाब हा या ‘लुक’चा महत्त्वाचा भाग होता.
7
चित्रपटातील ही फॅशन रॅम्पवरदेखील दिसू लागली. या हंगामातील लॅक्मे फॅशन वीकमध्ये भारतीय शैलीतील आधुनिक डिझाइन्स सादर करताना डिझायनर्सनी मॉडेल्सच्या केशभूषेकडे विशेष लक्ष दिलेले दिसले. त्यामध्येदेखील फुलांचा वापर आवर्जून केला गेला. डिझायनर गौरांगसाठी रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स तर मोगरा आणि अबोलीचे गजरे घालून रॅम्पवर आल्या होत्या. विशेष म्हणजे घोळदार वेस्टर्न गाउन्स परिधान करतानाही हेड गीअर्स म्हणून गजरा वापरला गेला. पिनाकिन या डिझायनरने सुद्धा आपल्या हेड गीअर्ससाठी फुलांचा पुरेपूर वापर केला होता.
15