सध्याच्या तरुणाईमध्ये सर्वाधिक क्रेझ आहे ‘रोड ट्रिप’ची. बजेटनुसार प्रवासाची आखणी करत, कमीत कमी सामानासह केलेली धमाल रोड ट्रिप म्हणजे अनुभवसंपन्न आठवण. रोड ट्रिपची क्रेझ वाढतेय कारण ही सगळी मौजमजा नंतर इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या भिंती भरभरून दिसत राहते. त्यात भर या संदर्भातल्या वेबसीरीजची आणि अर्थातच चित्रपटांची. प्रवास आणि त्यातूनही रोड ट्रिप म्हटलं की, अनपेक्षित घटना आणि अजोड अनुभवांची शिदोरी आलीच. प्रवासवेडय़ा मित्रांनी सांगितलेले असेच काही किस्से, चंदेरी पडद्यावरची भुरळ पाडणारी रोडट्रिप आणि ‘कितनी हसीन है ये दुनिया’ असं सांगणारं बरंच काही..

रोड ट्रिप आण ट्रेकिंग म्हणजे माझ्यासाठी ताजंतवानं करणारं जालीम औषधच, असं सांगणारी श्वेता कुडाळकर म्हणजे वाट दिसेल तिथे जायचं आणि निसर्ग साद घालेल तेव्हा त्याला ओ द्यायची या नियमानेच जगते. मनाचा प्रवाह ज्या दिशेला नेईल त्या दिशेला निघणाऱ्यांपैकी ती एक. हृषीकेश, चंद्रशीलापासून लडाखपर्यंत रोड ट्रिप अनुभवली आहे. श्वेता सहसा प्रवासाला एकटीच निघते. नंतर मग प्रवासात इतरांच्या ओळखी होतच जातात. ‘प्रवास एकटीचा असला तरी या प्रवासात काही साथीदार भेटतातच. कधीकधी या प्रवासामध्ये स्थानिक लोक साथ देतात,’ ती सांगते. ‘कोणत्याही ट्रेकला किंवा रोड ट्रिपला जाण्यापूर्वी मी त्या ठिकाणाची रेकी करते. तेथील दळणवळणाच्या सोयींची उपलब्धता आणि एकंदर वातावरणाचा अंदाज घेते, ज्याचा फायदा मला प्रवासादरम्यान होतो. सध्या ‘वारवान व्हॅली’च्या ट्रिपचा मनसुबा आहे. त्यासाठीची तयारी मी सुरू केली आहे. काश्मीर खोऱ्यातील वारवान व्हॅली म्हणजे निसर्गाचं रौद्र आणि सुंदर रूप एकाच वेळी पाहण्याची दुर्लभ संधी असं मी ऐकलं आहे. त्यामुळे या रोडट्रिपसाठी एक्साइटमेंट आहे. आतापर्यंतच्या माझ्या प्रवासातून मला खूप काही शिकायला मिळालं आहे. मुख्य म्हणजे चांगले-वाईट असे दोन्ही अनुभव मला आले आहेत. त्यामुळे प्रवासाला निघताना प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे,’ असंही श्वेता सांगते.

गणेश शिंदे हाही एक रोड ट्रिपची आवड असणाऱ्या भटकंतीप्रेमी पंथातला. स्वत: सर्जनशील क्षेत्रात काम करत असल्याने फिरण्याची, काहीतरी नवं शोधून काढण्याची आवड आणि समोर आलेल्या परिस्थितीवर आनंदाने मार्ग काढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. त्यामुळे त्याने रोड ट्रिपचा अनुभव घ्यायचं ठरवलं. त्याच्या जुन्या मित्रांनीसुद्धा त्याला साथ दिली आणि रोड ट्रिप एन्जॉय करणारा ग्रुप तयार झाला. त्यांनी सुरुवातीच्या काळात केरळ, कोकणकिनारा, गोवा, हम्पी अशी ठिकाणे रोड ट्रिपने पालथी घातली. पण आता इच्छा होती काहीतरी हटके आणि आव्हानात्मक करून बघण्याची. आणि पुढील ठिकाण ठरलं. राजस्थान!

राजस्थानची सफर बुलेटवरून करायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे ते आणि त्यांचे मित्र रोड ट्रिपला निघाले. पुण्याहून मुंबई-अहमदाबाद करत पहिल्या दिवशी बडोद्याच्या अलीकडे १०० किमी ते पोहचले. साधारण रात्र पडू लागली की ७-८ वाजता हॉटेल शोधायला सुरुवात करायचे. प्रीप्लॅन्ड असं काही नव्हतं. जे हॉटेल मिळेल, त्यात थांबायचं आणि विविध ठिकाणचा अनुभव घ्यायचा अशी त्यांची दिनचर्या. सकाळ झाली की, पुन्हा पुढील प्रवासासाठी सज्ज. हॉटेल आधी ठरलेलं नसल्याने त्याची खासियत वगैरे माहीत असण्याचा प्रश्नच येत नव्हता. अनेकदा दुपारचं जेवण धाब्यावर व्हायचं. त्यामुळे तिथे मात्र पदार्थात विविधता पाहायला मिळाली. दाल-बाटी, शेव भाजी यासारखे अनेक पदार्थ कमी अधिक फरकाने त्यांना चाखायला मिळाले. पण संपूर्ण प्रवासात फक्त शुद्ध शाकाहारी जेवण त्यांना मिळालं. हॉटेल किंवा रस्ते शोधण्यात त्यांना गुगल मॅपचा बराच उपयोग झाला. पण त्याचसोबत स्थानिक माणसंही तितकीच महत्त्वाची ठरली. कारण सगळेच आडरस्ते ‘गुगल’ला माहीत असतील असं नाही आणि ते पदोपदी जाणवत होतं. हिंदी ही सर्वमान्य भाषा असल्याने भाषेचा कुठेच अडसर आला नाही. जैसलमेर या शहरात मात्र त्यांनी तीन दिवसांचा थांबा घेतला.

राजस्थान म्हणजे बहुतांश वाळूचा प्रदेश. अशाच एका रस्त्यावर गणेशची बुलेट घसरली आणि जवळजवळ २-३ वेळा उलट सुलट होऊन पडली. तेव्हा साधारण ८० किमी च्या वेगात गणेश चालवत होता. हेडलॅम्प, हँडल तुटून बरंच नुकसान झालं होतं. गणेशला सुद्धा जखमा झाल्या होत्या. सोबतचे इतर मित्र बुलेटवरून पुढे गेलेले असल्याने अपघात झाल्याची त्यांना खबर मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. अशा वेळी गावकरी कामी आले. त्यांनी इतर गावकरी गोळा केले, बुलेटला झालेलं नुकसान पाहिलं. वैद्यकीय गरजा पुरविल्या. एका बसवाल्याने पुढील मित्रांना गाठून अपघाताची बातमी दिली. सुदैवाने गणेशला फार गंभीर दुखापत झाली नव्हती. पण बुलेटचं मात्र नुकसान झालेलं. बुलेट दुरुस्त करण्यासाठी शोरूम १०० किमी दूर. त्या शोरूमवाल्यांचीसुद्धा वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडं ठेऊन कामगारांना जास्त वेळ थांबवून ठेऊन अपघातग्रस्त बुलेट दुकानात येईपर्यंत वाट पाहिली आणि दुरुस्त करून दिली. ‘प्रवासादरम्यान असं माणुसकीचं दर्शन अनेकदा घडतं. मग ते गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्याने जाताना दोन-तीन वेळा फिरून चकवा लागल्यासारखं एकाच रस्त्यावर फिरून येणं असो किंवा भर बाजारात अजाणतेपणी वाहनांना प्रवेश असताना बुलेट्स येऊनसुद्धा गावकऱ्यांनी शांत राहून चुकीला खुलेपणाने माफ करणं असो. या सगळ्याचं मुख्यत्वे एक कारण की, मुंबई-पुण्याकडच्या लोकांबद्दल इतर राज्यांमध्ये फार कुतूहल आणि आदर असतो. त्यामुळेसुद्धा सहकार्य मिळणं सोपं जातं. तिथल्या स्थानिक लोकांमुळे ट्रिपमध्ये न ठरलेल्या अनेक जागा शोधता आल्या. जसं ब्रह्मदेवाचं देऊळ, तारागड, अजमेर शरीफ दर्गा अशा अनेक वास्तू स्थानिकांच्या सहकार्याने बघणं शक्य झालं. अजून एक समज या प्रवासादरम्यान खोडून काढता आला – राजस्थान म्हणजे फक्त वाळवंट आणि प्रचंड ऊन’, गणेश सांगतो. खूप रंगीत-संगीत आणि माणुसकीनं भारलेले अनुभव त्यांना आले.  म्हणूनच रोड ट्रिप हा एक पूर्णानुभव असतो. एक समाज, माणूस आणि व्यवस्था कळण्यासाठी रोड ट्रिप हे उत्तम माध्यम आहे.

अक्षय खाडय़े या आणखी एका भटकंतीप्रेमीचा राजस्थानचा अनुभवही वेगळा ठरतो. कारण त्यांच्या या रोड ट्रिपदरम्यान नोटाबंदीचा निर्णय लागू झाला.

‘गाडी, गप्पा आणि गोंगाट असा धम्माल मेळ साधत आमची रोडट्रीप सुरु झाली. या प्रवासात आम्ही चक्क जीपीएसलाही मागे टाकलं. कोणत्याही रोड ट्रीपवर गेल्यावर त्या ठिकाणचे स्थानिक लोक नेहमीच तुम्हाला थक्क करतात. याचंच उदाहरण आम्हाला या रोड ट्रिपदरम्यान पाहायला मिळालं. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आम्हीही पेचाच पडलोच होतो. अर्थात टेक्नोसॅव्ही असल्याचा फायदा मात्र या दिवसांमध्ये आम्हाला झाला. काही ठिकाणी पाणीपुरीवालाही पेटीएमचा बोर्ड लावून बसलेला दिसला तेव्हा..कसलं भारी आहे हे..असेच भाव आमच्या चेहऱ्यावर होते. या रोड ट्रिपमध्ये खतरों के खिलाडी प्रमाणेच एक थरारक अनुभव आम्हाला आला. तो अनुभव म्हणजे स्थानिक जीप चालकासह जीपमधून फिरण्याचा. जीप म्हणजे अनेकांच्याच आवडीचा विषय. आमच्या चालकाने काही उडत्या चालीची गाणी लावली आणि त्याने चक्क आम्हाला नाचायला सांगितलं. बस्स..त्याने सांगायला आणि आम्ही नाचायला..पण, त्यानंतर जीप चालकाने जी काही अंगात आल्यासारखी सुस्साट जीप पळवली की, आमच्या तोंडचं पाणी पळालं. जीव मुठीत घेऊन बसणे हा वाक्प्रचार तेव्हा मला प्रत्यक्षात अनुभवल्यासारखं वाटलं.’

‘रोडट्रीपमध्ये विविध गड—किल्ले आणि आलिशान महालांना भेट देताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली. किंबहुना ती गोष्ट मनाला चटका लावून गेली. बऱ्याच ठिकाणी जतन केलेल्या ऐतिहासिक वास्तू पाहिल्या तेव्हा नकळत आपल्या महाराजांच्या गड किल्लय़ांची सध्याची परिस्थिती आठवली. रोड ट्रिप म्हणजे जाणिवा समृद्ध करणारी आठवण ठरली ती यामुळ’, अक्षय रोड ट्रिपचं समर्पक वर्णन करतो.