कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त अनेक उपक्रम सुरू आहेत. गणेशोत्सवात विधायक काम करायला तरुणाई रस्त्यावर येणार आहे. याविषयीचा लेख
सध्या सगळे दिवस साजरे करण्याची टूम निघाली आहे आणि महाविद्यालयातले सगळे जण त्यात आघाडीवर असतात. फ्रेंडशिप डे झाला, रक्षाबंधनाचा ‘डे’ही झाला आणि प्रत्येक महाविद्यालयातले त्यांचे त्यांचे डेज सुरू झालेही आहेत. फेस्ट चालू आहेत, काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. या फेस्टिवल्सची तयारी करत असतानाच आपल्या बाप्पाचाही डे आलाय. म्हणजे गणेशोत्सव आलाय आणि अनेक महाविद्यालयांमध्ये त्याची तयारीही सुरू झाली आहे. कारण काही महाविद्यालयांचे गणेशोत्सव त्यांच्या वेगळेपणामुळे सर्वांना माहीत असतात. हे सण साजरे करत असतानाच पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन हल्ली बहुतेक महाविद्यालये इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. काही महाविद्यालयांतील मुलांनी पर्यावरणप्रेमी गणेशोत्सव साजरा करण्याची म्हणे शपथही घेतली आहे. संपूर्ण गणेशोत्सव हा पर्यावरणप्रेमी पद्धतीने साजरा करायचा आणि नंतरही शहर स्वच्छ राहील याची काळजी घेण्याचे या विद्यार्थ्यांचे व्रत आहे.
महाविद्यालयात गणपती आणायचा, त्याची प्राणप्रतिष्ठा परंपरागत पद्धतीने करायची. पण हे सगळे करताना पर्यावरणाची घडी जराही विस्कटणार नाही याचीही काळजी घ्यायची. म्हणजे काय, तर गणेश मूर्ती ही शाडूच्या मातीची किंवा कागदाच्या लगद्यापासून तयार करायची. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती किंवा थर्माकोलचा वापर देखाव्यामध्ये किंवा आरासमध्ये करायचा नाही, हे बहुतेक सर्व महाविद्यालयांनी ठरवले आहे. माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुलांचा गणपती नेहमीच जरा हटके असतो. या विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून मूर्ती कशी बनवायची याची काही दिवसांपूर्वी कार्यशाळा भरवली होती. दोन वर्षांपूर्वी या मुलांनी पेपर मॅश (रद्दीपेपरचा लगदा) पासून गणपतीची मूर्ती बनवली होती आणि त्याची प्रतिष्ठापना केली होती. त्यानंतर ती मूर्ती त्यांनी विसर्जित न करता सांभाळून ठेवली. दरवर्षी याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते, यंदाही तसेच करण्यात येणार आहे.
माटुंग्याच्या रुपारेल महाविद्यालयातदेखील गणपती बसतो. या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. विसर्जनानंतर किनाऱ्यांवर होणारा कचरा कमी कसा करता येईल यासाठी जनजागृती मोहीम या विद्यार्थ्यांनी सध्या राबवली आहे. परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही हीच मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यामुळे प्राचार्याचा मिळालेला पाठिंबा यामुळे यंदा या महाविद्यालयातही पर्यावरणप्रेमी गणेश मूर्ती स्थापन होणार आहे. काही महाविद्यालयांमधले विद्यार्थी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी किनाऱ्यांवर जाऊन पालिकेच्या कर्मचाऱ्यांसमवेत स्वच्छता मोहीम राबवत असतात. त्यांच्यातील ही सामाजिक जाणीव त्यांना चांगले, सुजाण नागरिक बनण्याचे धडे देत असते.
पर्यावरणप्रेमी गणेशमूर्ती, पर्यावरणप्रेमी आरास, विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये कोणतेही प्रदूषण होणार नाही. पण त्याच उत्साहात बाप्पांना निरोप, विसर्जनासाठी कृत्रिम विहिरी आणि तलाव यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे जनजागृती करणारे संदेश या महाविद्यालयीन पिढीकडून होत आहेत, हेही एक प्रकारे विचारांचे संक्रमण नाही का?
viva.loksatta@gmail.com