एका फोटोग्राफर मैत्रिणीला असाइनमेंट मिळालेय. गणेशोत्सवातलं काहीतरी एक्स्क्लुझिव्ह हवंय.. हे नि इतकंच शॉर्ट सांगण्यात आलंय. तिची नजर भिरभिरतेय सगळीकडंच.. तेवढय़ात तिला एथनिक ड्रेस घातलेली एक मुलगी छानशा पाटावर ‘त्याला’ निगुतीनं घेऊन जाताना दिसली. फोटोग्राफरनं क्षणार्धात लेन्स रोखल्या नि ‘क्लिक’ केलं. चला, एक फोटो मिळाला. या समाधानात फोटोग्राफर मुलगी पुढं सरकली. दुसऱ्या एका ठिकाणी आणखीन एक मुलगी बाप्पाला घेऊन आपल्या घरी चालली होती. तर तिसरीकडं मुलीनं आणलेल्या बाप्पाचं औक्षण चालू होतं. चौथ्या घरातली गणेशमूर्ती आदल्याच दिवशी आणल्यानं तिथं बाप्पाची आरती चालू होती..  फोटोग्राफर मुलीला तिचे ‘एक्सक्लुझिव्ह’ फोटोज मिळाले नि ती ऑफिसच्या वाटेला लागली.
मुलींनी गणपती आणण्याचे हे क्षण ‘क्लिक’ होणं ही अजिबात कल्पनेतली गोष्ट उरलेली नाहीये. कारण प्रत्यक्षात तसं आपल्या आजूबाजूला घडताना दिसू लागलंय. आपल्याच भोवतालच्या या घरांत खूप वर्षां गणपती येतोय नि आता त्याच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते विसर्जनापर्यंतच्या सगळ्या गोष्टी मुली करताहेत. मुळात मुलींनी-स्त्रियांनी पूजा करू नये, असं कुठंही सांगितलेलं नाहीये. असं म्हणतात की, आपल्याला गणपती पूजायची इच्छा असेल तर तो स्वत: आणून त्याची पूजा करायला हरकत नसते. त्यामुळं सगळ्याच क्षेत्रांत आघाडीवर असणाऱ्या, अष्टावधानानं वावरणाऱ्या मुलींनी या गणेश पूजनात मागं राहण्याचं काहीच कारण नाहीये, अशा पद्धतीचा विचार आताशा होऊ  लागलाय.
शलाका कुरुलकरच्या एकत्र कुटुंबात गेली २० र्वष गणपती येतोय. मात्र शलाकाच्या कुटुंबाचं दुसरीकडं शिफ्टिंग झाल्यानं गेली ६ र्वष त्यांच्या घरीही गणपती आणला जातोय. गणेशमूर्तीची ऑर्डर देण्यापासून ते विसर्जनापर्यंत सारी कामं शलाकाच करते. मुली मुलांपेक्षा कोणत्याही गोष्टीत कमी नाहीत. मग गणेशोत्सवातलं पूजेचं पवित्र कामही मुलींनी जरूर करावं, असं तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांचं मत आहे. शलाका सांगते की, ‘‘सुरुवातीला गणपतीची प्रतिष्ठापना करणं, हे मला वेगळं वाटलं. आपली संस्कृती पुरुषप्रधान असल्यानं मी करतेय, ते सगळ्यांना पटेल का, असा विचार मनात आला होता. खूप एक्साइटमेंट होती नि नव्‍‌र्हसनेसही होता. पण पूजा केली मात्र.. त्या एक्साइटमेंटची रेंज १०० टक्क्यांवर गेली होती. सगळ्यांच्या सपोर्टमुळं सकारात्मक वातावरण तयार होऊन मला एनर्जी मिळाली. आता माझी बहीणही तिला पूजा नि आरास करायला मिळावी, म्हणून एक्साइटेड झालेय. पहिल्या विसर्जनाच्या वेळी बँण्डबाजा मागवला तरी नंतरच्या वर्षी साधेपणानंच विसर्जन केलं.’’
 काही वेळा मुली स्वत:हूनच मला पूजा करायची आहे, असा विचार मांडतात नि त्या गोष्टीला घरातली मंडळी लगेच परवानगी देतात. हर्षदा याडकीकरकडं गेली ४५ र्वष गणपती येतोय. तिला मुळात पहिल्यापासून गणपती आवडतोच. त्यात पूजा करायची परवानगी मिळाल्यानं तिचा उत्साह व्दिगुणितच झाला. हर्षदा सांगते की, ‘पहिल्यांदा पूजा करताना मनावर दडपण होतं. आपलं काही चुकलं तर.. अशी उगीचंच भीती वाटत होती. एकंदरीत तो अनुभव छान होता. आपण वेगळं काहीतरी करतोय, काहीतरी नवीन शिकायला मिळालंय, असं फिलिंग होतं. मूर्ती बाबा आणत असले तरी प्राणप्रतिष्ठा, पूजा नि उत्तरपूजा मी करते, नंतर विसर्जन बाबा करतात. गणेशोत्सवासाठी मी रजा घेते. सुरुवातीला आमच्या ग्रुपमध्ये मी पूजा करतेय, म्हटल्यावर असं कसं होऊ  शकतं, असं आश्चर्य व्यक्त केलं गेलं. काही मैत्रिणींना आपणही पूजा करावंसं वाटलं.
गुरुजींऐवजी मी पूजा सांगते, असं सुचवलं,तेव्हा सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर सुरळित झालं.
अंकिता गोखले
काही वेळा दरवर्षी गणपतीत गावाला जाणं शक्य होत नाही आणि आपल्याकडंही गणपती यावा, म्हणून काहीजणं गणपती आपापल्या घरी आणतात. तसाच गेली ६ र्वषे आदिती शिंपीच्या घरी गणपती आणला जातोय. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी शाडूची मूर्ती आणून दुपारी तिची प्रतिष्ठापना केली जाते. गणपतीची पूजाअर्चा नि उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी केली जाणारी सत्यनारायणाची पूजा आदिती करते. मुळात तिला गणपतीची खूप आवड आहे. मात्र तिच्या दादाला एवढी आवड नसल्यानं मग तीच याकामी पुढाकार घेते. पहिल्या वर्षी तिच्या बाबांनी, मग दादानं पूजा केली होती. आता आदिती पूजा करतेय. आदिती सांगते की, ‘मी पहिली पूजा केली तेव्हा खूपच छान वाटलं होतं. मात्र गणेश विसर्जनानंतर खऱ्या अर्थानं घर सुनंसुनं वाटतं. पाचव्या दिवशी घरीच सुगंधित पाणी भरलेल्या पिंपात थोडी रेती घालून त्यातच गणेशाचं विसर्जन आम्ही करतो.’  वर गणपतीची पूजा मुलगी करतेय यावर घरातल्या ज्येष्ठांची रिअ‍ॅक्शन काय होती, असं विचारल्यावर आदिती सांगते, ‘मी पूजा करणारेय, म्हटल्यावर घरच्यांनी खूपच सपोर्ट केला. विशेषत माझ्या आजीला छान वाटलं. माझ्या लहानपणी मला पूजा नाही करता आली, तरी आदितीला पूजा करायला मिळतेय, याचा माझ्या आजीला खूप आनंद झाला.’ आदितीच्या मते, गणपती म्हणजे पाच दिवस आनंददायी वातावरण.. जणू स्ट्रेस बस्टर.. ‘अगदी खरं सांगायचं तर हे सगळं शब्दांत नाही वर्णन करता येणार..’, ती सांगते.
मला पूजा नाही करता आली, तरी नातीला पूजा करायला मिळतेय, याचा माझ्या आजीला खूप आनंद झाला.
आदिती शिंपी
काही वेळा आजोबांपासून चालत आलेली गणेशोत्सवाची परंपरा आपल्या परीनं जतन करण्यासाठी काहीजणी धडपडतात. तशीच धडपड सध्या अंकिता गोखले करतेय. गेली ४० र्वष त्यांच्याकडं गणपती येतोय. तिचे आजोबा स्वत: पोथी-पुस्तक वाचून पूजा करायचे. ते गेल्यावर बाबा पूजा करायला लागले. आजोबा गेले त्या वर्षी त्यांनी पूजा सांगायला गुरुजी बोलावले होते, पण सकाळी नऊ वाजता आरती व्हावी, हा आजोबांनी घालून दिलेला नियम गुरुजी उशिरा आल्यानं पाळला गेला नाही. आठवीत संस्कृत शिकल्यानं मी पूजा सांगू शकेन, असं अंकितानं घरी सांगितलं तेव्हा घरून थोडासा विरोध झाला सुरुवातीला. गणेश पूजनाची कॅसेट आणून पाहिली. पण तीही ‘प्ले’ झालीच नाही. शेवटी, अंकितानंच पूजा सांगितली नि नंतर टेपरेकॉर्डर सुरू झाला. अंकिता सांगते की, ‘सुरुवातीला थोडी भीती वाटली होती. उच्चारांत चुका होत होत्या. पण सगळ्यांनी समजून घेतलं. माझ्या दोन्ही मोठय़ा बहिणींनी मला धीर दिला. सध्या मी एम.एस्सी. करत असल्यानं बाहेरगावी असले तरीही गणपतीसाठी घरी जातेच. आता संस्कृतशी तसा संबंध उरला नसल्यानं प्रतिष्ठापनेच्या एक दिवस आधी पंचांगाचा सविस्तर अभ्यास करून सगळं रिवाईज करून ठेवते. मैत्रिणींनाही या सगळ्याचं कौतुक वाटतं. अजून तरी परीक्षा नि गणेशोत्सव क्लॅश झालेला नसल्यानं अद्याप मी पूजा सांगायची ही परंपरा मोडलेली नाही.’ त्यांच्या गणेशाचं विसर्जन आधी जुहू चौपाटीवर व्हायचं. पण एकदा विसर्जनाहून परतताना एका गणेशाचं मुख अंकिताच्या पायाशी आलं. त्यामुळं आता ते कृत्रिम तलावातच गणेश विसर्जन करतात. इतरांनाही ती तसंच करायला सांगते. अंकिता म्हणते की, ‘मला गणपती हा एखाद्या मित्रासारखा वाटतो. आपलासा वाटतो. त्याच्यावर विश्वास ठेवावा असा.. कायम देवळात जाणं शक्य होत नाही, पण गणेशोत्सवात मी पाच दिवस बुद्धीच्या या देवतेची मनोभावे सेवा करते. मन कसं एकदम प्रसन्न होतं.’
महिला सहस्रावर्तन, माहिला पौरोहित्य याबरोबरच एक पुढचं पाऊल या मुली टाकताहेत. त्यातलीच ही प्रातिनिधिक उदाहरणं. मुलींच्या या गणेश पूजनात कोणताही अभिनिवेश नाही. उलट त्यात आहे सर्वसमावेशकता. ही सर्वसमावेशकता गणेशमूर्ती आणि सजावट पर्यावरणस्नेही करण्याची आहे.पुरुषप्रधान संस्कृती असल्यानं मी करतेय, ते सगळ्यांना पटेल का, ही शंका होती. पण सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. – शलाका
त्यानिमित्तानं सगळ्यांच्या भेटीगाठी होऊन स्नेह वाढण्यातली आहे. आपापली व्यवधानं सांभाळून नव्या-जुन्याची सांगड घालत, गणेशोत्सव मोठया उत्साहात नि आनंदात साजरा करण्यात आहे. गणेश विसर्जनाचा दिवस या सगळ्याजणींना अगदी नकोसा वाटतो.. काही वेळा विसर्जनाहून आल्यावर रात्री जाग येते नि रिकाम्या मखराशी जाऊन पोटभर रडून घेतलं जातं. मन एकदम रिकामं झाल्यासारखं वाटलं.. तरीही या उत्सवातल्या क्षणांमध्ये ठासून भरलाय तो प्रत्येकाचा भक्तीभाव.. गणपती या एकमेव दैवताशी आपण चटकन संवाद साधून बोलू शकतो, अगदी मनमोकळेपणानं.. असं त्यांना वाटतं. या काही जणींनी केलेल्या ‘श्रीं’च्या पूजनाचा ‘श्रीगणेशा’ अनेकींनी गिरवला तर.. मग मात्र आपल्या फोटोग्राफर मैत्रिणीला तिच्या ‘एक्स्क्लुझिव्ह’ फोटोंच्या असाइनमेंटसाठी दुसरा विषय निवडावा लागेल, हे मात्र नक्की!