vn02
शाळेत असताना ‘टीव्ही : शाप की वरदान’ या विषयावर निबंध लिहिणारी आत्ता कॉलेजमध्ये असलेली शेवटची पिढी. कारण टीव्ही बघण्याची पद्धतच हल्ली बदलतेय. आपल्या आवडत्या मालिका, चित्रपट आता त्या ‘इडिअट बॉक्स’ऐवजी हातातल्या स्मार्टफोनवर बघण्यात नवी पिढी धन्यता मानतेय. त्यामुळे सो कॉल्ड ‘प्राइम टाइम’मध्ये रिमोटवरून होणारे ताणतणाव बऱ्यापैकी नियंत्रणात आलेत. इंटरनेट टीव्ही बघणाऱ्या या नव्या पिढीचा कल लक्षात घेऊन खास त्यांच्यासाठी नवनवी वेब चॅनेल्स येत आहेत आणि या नव्या माध्यमासाठी नव्या मालिका बनताहेत.

यू टय़ूबवरून ‘हाऊ  आय मेट युवर मदर’चे सिझन्स डाऊनलोड करणारे सायली, अक्षय आणि ऋतुजा ग्रुपमध्ये सध्या सॉलिड भाव खाऊन आहेत. ग्रुपमधल्या बाकीच्यांना त्यांच्या या डाऊनलोड्सबद्दल कळलं तेव्हा ‘हाऊ  आय मेट..’ फॅन्सनी अक्षरश: या तिघांना ‘एका दिवसासाठी तरी पीडी द्या ना प्लीऽऽऽज’ (पीडी : पक्षी पेनड्राईव्ह) अशा एका सुरात दोन-दोन तीन-तीन वेळा विनवण्या केल्या. या सगळ्यात सायली, अक्षय आणि ऋतुजाने फुटेज खाऊन घेतलं आणि अखेरीस ही ‘देवाणघेवाण’ करणं मान्य केलं. नंतर सगळे जण गेले कट्टय़ावरचा कटिंग टाकायला. चहाच्या घोटाबरोबर चर्चेला ऊत आला.. छान फड रंगला. ‘यार, कसली इरिटेटिंग आहे ती ‘जान्हवी’.. ड्रामा क्वीन आहे नुसती’ इति अक्षय. त्याच्या सुरात सूर मिसळत सायलीने ‘मेघना’च्या अतिरडक्या एक्स्प्रेशन्स आणि संवादांवर एक टिप्पणी केली. ‘आईने या सीरियल्स लावल्या की मी सरळ आत निघून जाते’, रसिका म्हणाली. ‘ए यार खरंच.. या समस्त ‘आई’ वर्गाच्या सीरियलविषयक अतिप्रेमामुळे आम्हाला धड मॅचही बघता येत नाही. तिकडे कोहलीचे चौके-छक्के मिस होतात आणि इकडे हिची ‘बालिका वधू’ सुरूच, एकाचे तापट उद्गार.. थोडक्यात, ‘घरोघरी रडकी मंजिरी’ अशी परिस्थिती.
टीव्हीचा ‘प्राइम टाइम’ म्हणजे संध्याकाळची वेळ. घडय़ाळात संध्याकाळच्या ८ चा टोला पडतो आणि कामात व्यस्त असलेले हात टीव्हीचा रिमोट शोधण्यासाठी सरसावतात. मग आपण कितीही कामात असलो तरी आपल्या आवडीच्या सीरियलचा एकही सीन मिस करायचा नाही असा निश्चय केला जातो. त्यातही हा पवित्रा घेण्यात आईचा पुढाकार. तिच्यापुढे बाबांसकट सगळ्यांची बोलती बंद. घराघरांत टीव्ही बघण्यावरून धुसफुस व्हायची हीच ती वेळ असायची. कारण आई-आजीच्या त्या रडक्या सीरिअल्स, बाबांच्या बातम्या, दादाच्या मॅच हायलाइट्स आणि आमच्या ‘कॉमेडी नाइट्स..’ किंवा गाणी किंवा इंग्रजी सीरिअल्स बघायची हीच वेळ.
या सगळ्यात ‘फ्रेंड्स’, ‘बिग बँग’चे रिपिट टेलिकास्ट रात्री बघायचे असं ठरवून घरातली तरुणाई सरळ आतल्या खोलीत जाऊन बसते. हल्ली मात्र या प्राइम टाइमच्या रिमोट खेचाखेचीतून तरुणाई अलगद बाहेर पडल्याचं दिसेल. कारण त्यांच्याकडे आता टीव्ही बघण्याचा नवा पर्याय उपलब्ध झालाय. इंटरनेट, यू टय़ूबवर सीरियल्स बघण्याचा आणि ‘स्मार्ट’फोन्समुळे हे जरा अधिकच सोयीचं झालंय. ट्रेनमध्ये उभ्यानेच सीरियल बघणारी विशीतली तरुणी, ‘कॉमेडी नाइट्स’चे एपिसोड्स यू टय़ूबवर बघणारा परदेशातला तरुण ही सगळीच उदाहरणं सवयीची झाली आहेत. देशाबाहेर राहावं लागणारे अनेक जण पूर्वीपासून देशी टीव्हीशी कनेक्ट राहायला हाच पर्याय वापरायचे. पण घरातल्या घरात दोन टीव्ही असतानाही तरुणाई हल्ली स्मार्टफोनच प्रीफर करतेय.
केवढं सोयीचं झालंय ना सगळंच! आता ‘डिश’मुळे केबलचे लाइट जात नाहीत. काकांनी मॅच लावली म्हणून वैतागून आमच्या घरी त्यांचा आवडता डेली सोप बघण्यासाठी शेजारच्या काकू येत नाहीत. आई, आजी आणि आम्ही अशा तीन पिढय़ांनी एकत्र बसून टीव्ही बघणं आता दुर्मीळ झालंय. टीव्हीवरून दादाशी होणारं भांडण आणि रुसवे-फुगवे पण होत नाहीत आता. दादा-ताई काय.. नि आम्ही काय.. हल्ली त्या मोबाइलमध्येच डोकं खुपसून बसलेलो असतो. आई आणि बाबा हल्ली ठरवून त्यांना हवं ते बघायला लागलेत. बाबा सीरियलमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलेत आणि आईसुद्धा मॅच आणि बातम्या आवडीने बघायला लागलीये. नेमक्या आवडत्या सीनला लाइट गेल्यावर खट्टू होणं आणि दोन तासांनी लाइट आले की होणारा आनंद.. ही मजा हरवत चाललीये कुठे तरी. तो जुना हजार वेळा बंद पडणारा.. थोडे दिवस झाले की खरखर आवाज येणारा टीव्ही आणि तरीही आवडीने टीव्ही बघणारे ‘त्या’ टीव्हीचे ‘ते’ प्रेक्षक नाहीत आता. आमच्या पिढीनं तो ‘व्यत्यय’वाला टीव्ही पाहिलाच नाहीय, खरं तर. आताचा टीव्ही ‘स्मार्ट’ झालाय आणि त्याहून स्मार्ट आम्ही झालोय. टीव्ही बघणं ही आता खरंच प्रायव्हेट अफेअर झालंय खरं.