आपल्या भावना क्षणार्धात आणि नेमकेपणानं सगळ्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्माईलीज. हल्ली व्हच्र्युअल जगात स्माईलीजने हैदोस घातलाय. खऱ्या आयुष्यात इंट्रोवर्ट असलेली अनेक मुलं या स्माईलीजमुळे आपली व्हच्र्युअल इमेज मात्र ओपन माइंडेड आणि फ्रेंडली असल्याचं दर्शवतात.

टेक्स्टिंग करताना, ‘एफबी’वर कमेंट्स करताना धडाधड स्माईलीज वापरणं आपल्या सवयीचंच झालंय. बऱ्याचदा एखादा स्मायलींचाच मेसेज आपण पाठवतो किंवा एकाहून अधिक स्माईलीजने टेक्स्टिंगला सुरुवात होते आणि एफबी कमेंट बॉक्सेसही स्माईलीजने भरतात. आपल्या भावना क्षणार्धात पोहोचवण्याचा इझी वे म्हणजे स्माईलीज. या सगळ्याच स्माईलीज क्युट आणि एक्स्प्रेसिव्ह असल्यामुळे सध्या सगळी तरुणाई स्माईलीजवर ‘फूल टू’ फिदा झालीय. हल्ली कमेंट हलकीफुलकी व्हावी म्हणून कमेंटच्या शेवटी स्माईली वापरली जातेय एखादा फोटो आवडल्यावर कमेंट करताना दिलखुलासपणे आपण अगदी ‘हार्ट शेप’ची स्माईलीही वापरतो. या स्माईलीजमुळे निदान आपली व्हच्र्युअल इमेज तरी ओपन माइंडेड आणि फ्रेंडली झालेली असते. आता खऱ्याखुऱ्या आयुष्यात जगताना आपण तसे वागतोच असं मात्र नाही.
मेडिकलला शिकणारी प्रीती म्हणते, ‘टेक्स्टिंग करताना मी सहज कुठलीही स्माईली वापरते. पण खऱ्या आयुष्यात मात्र मी बऱ्यापकी इंट्रोवर्ट आहे. माझे जवळचे मित्रमत्रिणी सोडले तर बाकीच्यांशी मी इतकी मोकळेपणानं नाही वागू शकत. प्रत्यक्षात अलुफ नेचर असलेली ही मुलगी व्हच्र्युअली इतकी फ्री कशी, याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं बऱ्याचदा. अनेकांनी तसं बोलून दाखवलंय. कदाचित स्माईलीजमुळे वागण्यात ती सहजता येत असावी.’
कित्येक मुलींचे स्टेट्स अपडेट्स त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटी क्रशेसनी भरलेले असतात. मग अगदी रणबीर कपूरपासून ते विराट कोहलीपर्यंत सगळ्यांबद्दल वाटणारं ‘प्रेम’ व्यक्त करण्यासाठी स्माईलीजचा चिक्कार भडीमार होतो. याबाबतीत मुलंही मागे नाहीत बरं का! कॉलेज कन्फेशन पेजेसवर त्यांच्या प्रेमाला उधाण आलेलं दिसतं. ऐश्वर्या, दीपिका आणि कतरिनाच्या प्रेमात वेडे झालेले प्रेमवीर ‘तिच्या’ नावापुढे सर्रासपणे तीन-चार हार्ट शेप्स आणि किसिंग स्माईलीज टाकून आपल्या ‘भावना’ व्यक्त करतात. आजकाल एखाद्या सीरिअस पोस्टनंतर दात दाखवण्याचा (अर्थात स्माईलीच्या रूपानं) ट्रेंड नव्यानेच रुळू लागलाय. पोस्ट कितीही सीरिअस असली, तरी वाचणाऱ्याने ‘सेंटी’ होऊ नये म्हणून घेतलेली ही खबरदारी असावी.
बीकॉमच्या पहिल्या वर्गाला शिकणारा अबिर म्हणतो, ‘टेक्स्टिंग करताना पुढे काय बोलावं हे सुचलं नाही की, मी जीभ दाखवणारी स्माईली वापरतो. एखादा मित्र भंकस म्हणून उगीच खेचत असेल तर अशा वेळी ही स्माईली अत्यंत उपयुक्त ठरते. मत्रिणींशी फ्लर्ट करताना ‘आय अॅम जस्ट कििडग’ हे न सांगताही त्यांना कळतं ते याच स्माईलीमुळे. कुठली मुलगी उगीच लाडात येत असेल तर ही स्माईली वापरून एस्केप होण्यासारखा दुसरा चांगला ऑप्शन नाही.’
स्माईलीजमुळे तरुणाई अगदी नको तेवढी खुलली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आपल्या फोटोवर मित्राने कमेंट म्हणून टाकलेली ‘हार्ट शेप’ची स्मायली दिसली की, एखाद्या बुकवर्म मुलीच्या मनातसुद्धा लड्ड फुटतात आणि एखादा डरपोक मजनू स्माईलीज वापरून का होईना पण प्रेम व्यक्त करायला धजावतो.  
पण स्मायलीज वापरणारी व्यक्ती प्रत्यक्षात वेगळीच असू शकते बरं का! काही (मनुष्य?) ‘प्राणी’ थोडय़ा वेगळ्या धाटणीचे असतात. अॅटिटय़ुड दाखवणाऱ्यांच्या टाईपमधले. ते स्माईलीज वापरत असले तरी प्रत्यक्षात समोर येतात ते एरंडेल प्यायल्यासारखं तोंड करून. निदान मेसेजेसमध्ये तरी ही माणसं (?) स्माईलीज वापरतात हे भाग्यच म्हणावं लागेल. काही एक्सेप्शनल केसेसमध्ये तेही घडत नाही, हा भाग वेगळा.
काही जण नुसत्याच रडक्या स्माईलीची पोस्ट ठेवतात. तुम्ही दु:खी आत्मा आहात हे जगाने मान्यच केलेलं आहे, हे बहुदा त्यांनाच माहीत नसावं. मग अशा वेळी त्यांच्याच सारखी चार-पाच सेंटी कमेंट्स येतात आणि मग ग्रुपवर आपली दर्दभरी दास्ताँ ऐकवायला सुरुवात करतात, तीही रडक्या स्माईलीज वापरून.
सांगण्याचा मुद्दा इतकाच की, जसे तुम्ही या व्हर्चुअल वर्ल्डमध्ये स्माईलीजचा मनमुराद आनंद लुटताय, तसेच रिअल लाईफमध्येही ओपन व्हायला हवं. दिवसातून एकदा तरी खळखळून हसायला हवं. ओळखीच्या माणसांशी बोलला नाहीत तरी चालेल, पण एकदा हसलात म्हणून लगेच तुमचा इगो हर्ट होणार नाही. नुसते ‘लव्ह मेसेजे’स लिहून त्यात स्माईलीज वापरण्याचे उद्योग करण्याऐवजी बेधडकपणे प्रेम व्यक्त करून बघायला हवं. तुम्हाला आवडणारी व्यक्ती जास्त इम्प्रेस होईल. बोले तो डरने का न मामू!! चलो.. बाय फॉर नाऊ. लव यू ऑल!!! उम्म्म्हा !!!