काही एअरलाइन्स विमानात पाण्याच्या बाटल्या मोफत देतात. अगदी छोटय़ाशाच असतात त्या. पण उरलेल्या पाण्याचं आणि बाटल्यांचं हे लोक काय करतात, हा मला पडलेला कायमचा प्रश्न आहे.
अप्रतिम मेन्यू होता. जागोजागी बुफेचे स्टॉल लावले होते. प्रत्येक ठिकाणी वाढायला युनिफॉर्ममधला स्टाफ. बसायला टेबलं. काय हवं-नको विचारायला यजमान कुटुंब. इतकं सुंदर आणि आनंदी वातावरण होतं. पण खाऊन झाल्यावर मी डिश ठेवायला गेले तर काय दृश्य दिसावं? मोठय़ा-मोठय़ा प्लॅस्टिकच्या टबांमध्ये अस्ताव्यस्त फेकलेले पाण्याचे पेले आणि उरलेलं उष्टं न्न! चवच गेली तोंडाची. पानात टाकून का उठतात काही जण?
लहानपणी इंग्रजी माध्यमाच्या मराठी पुस्तकात मी एक धडा वाचला होता. शेतकरी कुटुंबातले आजोबा दुपारी शेतातलं काम संपवितात. त्यांचा नातू जेवणाची शिदोरी घेऊन आलेला असतो. ते दोघे आंब्याच्या सावलीत जेवायला बसतात. हात धुवायला उठलेल्या नातवाच्या पानात आजोबांना काही घास टाकलेले दिसतात. तेव्हा आजोबा त्याला सांगतात, ‘‘बाळा धान्याचा एकेक दाणा पिकवायला मला, तुझ्या बाबांना किती घाम गाळावा लागतो बघतोयस ना. त्यामुळे तू जेव्हा एखादा घास टाकून उठतोस तेव्हा तुझ्या लक्षात येतंय का, की तू शेतकऱ्याच्या मेहनतीचा किती अपमान करतोयस.?’’ त्या गोष्टीचं सार, तो धडा माझ्या मनावर फार परिणाम करून गेला.
लहानपणापासून आमच्या घरी कधी कुणी पानात टाकल्याचं आठवत नाही. अर्थात त्याचं मुख्य श्रेय आईच्या सुगरण असण्यालाच द्यायला हवं. तरी सगळ्या भाज्या खायच्या, पानात वाढलेलं सगळं संपवायचं हा एक अलिखित नियमच होता घरी. जेवण झाल्यावर आपापलं ताट घासायला टाकणं आणि पाणी पिण्याचं भांडं धुवून ठेवणं याची आता सवयच लागली आहे हाताला. त्यामुळे कुणी पानात काही टाकून उठलं किंवा पाणी जरी अर्धवट पिऊन उठलं तर बेचैन व्हायला होतं. वाया जाणार ना ते पाणी.? आमची एक रोहिणी वहिनी जेवायला बसलेल्या लहान मुलांना अर्ध फुलपात्रच पाणी वाढायची. भरून दे ना, म्हटलं की ती म्हणायची, आधी एवढं संपव. तेव्हा तिची पाणी वाढायची कंजुषी पाहून हसू यायचं. पण आता ते बरोबरच वाटतं. पाणी का म्हणून फेकून द्यायचं? अतिरेक वाटेल कुणाला, पण मला ना रडूच येतं. पाणी वाया घालवायला नको म्हणून अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये त्या प्रोग्रॅमपेक्षा कमीच वॉटर लेव्हल ठेवते मी. फक्त बाथरूमला जाऊन आलो तर पाण्याचा फ्लश निम्म्यावरच दाबून उचलते. तीन-चार तांबे पाणी बास झालं की शू करून आल्यानंतर. जेव्हा तेव्हा बादलीभर पाणी कशाला ओतलं गेलं पाहिजे. काही फ्लशना कमी आणि जास्त पाण्याची बटणं असतात. ती फार सेन्सिबल वाटतात.
हायजिनिक हायजिनिक म्हणून हल्ली मिनरल वॉटरच्या ज्या बाटल्या आल्या आहेत. त्यांनी सोय होत असेल. पण नासाडीही फार होते. प्लॅस्टिकची निर्मिती वाढते. काही कार्यक्रमांमध्ये स्टेजवरच्या प्रत्येक वक्त्यासाठी पाण्याची बाटली ठेवतात. त्यातले काही जण उगीचच बाटलीचं सील उघडतात, काही जण तोंड लावून पाणी पितात. एकदा मी एका संयोजकांना अशा बाटल्यांचं, पाण्याचं काय करता म्हणून विचारलं. ते म्हणाले, ‘‘काय करणार उष्टय़ा बाटल्यांचं आणि पाण्याचं? देतो फेकून!’’ हल्ली कुणी चकीत होऊन पाहायला लागलं तरी मी न लाजता माझी पाण्याची बाटली घेऊन निघते कार्यक्रमानंतर. नंतर किमान पिता येईल माझं मला तरी म्हणून. नाही तर अध्र्या-एक लीटरमधले दोन घोट आपल्या घशात आणि बाकी पाण्याचा शुद्ध अपव्यय! थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आपल्याच संस्कृतीतली ना? मग ही नवी ‘फेका संस्कृती’ आपण का अवलंबू लागलो आहोत? तीच तऱ्हा पाण्याच्या पेल्यांची. ते नवे सीलबंद असलेले प्लॅस्किटचे पाण्याचे पेले! लग्नकार्यामध्ये मुबलक प्रमाणावर फेकलेले दिसतात. सगळे जण काही पाणी संपवत नाहीत. अनेकदा वाटतं की, वरून पिऊन सोबतच्या माणसाबरोबर शेअर तरी करावं. इतस्तत: विखरून पडलेले, अर्धवट भरलेले शेकडो ग्लास बघून अक्षरश: हळहळायला होतं.
बुफे पद्धती बघून कधी कधी जुन्या पंगती बऱ्या, असं वाटतं. वाढपी वाढताना विचारायचे. जास्त-कमी-पुरे सांगता यायचं किंवा आग्रहाच्या मॅडपणामुळे अति वाढलं गेलं तर नाइलाजानं संपवावं किंवा सोडून द्यावं लागायचं. तेव्हा दोष तरी यजमान किंवा वाढणाऱ्यावर ढकलता यायचा. पण आजकाल स्वत:च्या हाताने वाढून घेतल्यावर जे टाकून उठतात त्यांच्या जाणिवेची कीव करावीशी वाटते. एक मैत्रीण एकदा म्हणाली, ‘‘मैनें बस टेस्ट करने के लिए लिया था. अच्छा नहीं लगा इसिलिए छोड दिया.’’ अरे चव बघायची होती तर चमचाभरच घ्यायचा ना पदार्थ! आख्खी वाटी ओसंडून जाईपर्यंत कशाला भरून घेतली? एक जण म्हणाले, ‘‘लायनीत उभं राहिल्यावर एकदाच होतं ते सगळं वाढून घेतलं. पुन:पुन्हा कोण जाणार रिफिल करायला. मग उरणारच ना काही तरी?’’ म्हणजे उरण्याचा अपरिहार्यतेचं समर्थन! याला पर्याय शोधलेच पाहिजेत. आता आपण सगळे हेल्थ कॉन्शस झालो आहोत. कोशिंबीर नव्हती. दही किंवा ताक चाललं असतं- असं आपण आवर्जून म्हणतो. मग पानात टाकून उठण्याचा असभ्यपणा बंदच केला पाहिजे. बरोबरच्या नातेवाईक/ मित्र/ त्यांच्या तरुण मुलांना- जरा आणून देणार का- असं म्हणायला किती कष्ट पडतात? एक घास कमी खाल्ला तरी चालेल, पण पाणी किंवा अन्न वाया घालवणार नाही, अशी शपथ घ्यायला पाहिजे आपण. नाही तर आपण ‘मिष्टन्नम् इतरेजन:’सारखे हपापलेले- गर्दीमधले एक होऊ..